Monday, May 18, 2020



नांदेड जिल्ह्यात 31 मे पर्यंत मनाई आदेश लागू 
नांदेड, दि. 18 :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत नांदेड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश रविवार 31 मे 2020 पर्यंत लागू राहणार आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
            राज्य शासनाने निर्गमीत केलेल्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून लॉकडाऊनचा कालावधी रविवार 31 मे 2020 पर्यंत वाढविला आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये नांदेड जिल्ह्यात मनाई आदेश 17 मे ते 31 मे 2020 रोजी मध्यरात्री पर्यंत नांदेड जिल्ह्यात नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात नमूद नांदेड जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे समक्रमांकीत आदेश, शुद्धीपत्रक, सुधारीत आदेशानुसार निर्गत निर्दश, अटी व शर्ती जशास तसे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकारी यांनी नमूद नियमांची अंमलबजावणी, काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोणातून करावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.
सर्व संबंधीत यंत्रणांनी अत्यावश्यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी तसेच नमूद आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतूने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेश 17 मे 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...