Wednesday, April 29, 2020


सॅनिटायझरचा साठा जप्त, दुकानदाराविरुध्द गुन्हा दाखल
अत्यावश्यक वस्तुंची साठेबाजी करुन काळाबाजार करु नका
अन्न व औषध प्रशासनाचे जिल्ह्यातील विक्रेत्यांना आवाहन
नांदेड, दि. 29 :- जिल्हयातील किराणा विक्रेते व औषध विक्रेत्यांनी अत्यावश्यक वस्तुंची साठेबाजी करून त्यांचा काळाबाजार करु नका, असे आढळल्यास संबंधिताविरूध्द अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
नांदेड शहरातील मे. फार्मा टेडर्स या दुकानात सिपला कंपनीने उत्पादीत केलेला व जास्त किंमत नमुद असलेला हॅन्ड सॅनिटायझरचा साठा आढळुन आला. दुकानदार केंद्र शासनाने निर्धारीत केलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीस सॅनिटायझरची विक्री करत असल्याचे आढळुन आले. संबंधित दुकानदाराविरूध्द अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 अंतर्गत नांदेड वजिराबाद पोलिस स्टेशनमध्ये नुकताच गुन्हा दाखल केला आहे. ही कार्यवाही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहआयुक्त औरंगाबाद श्री. काळे व सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे
राज्यासह देशात कोविड 19 चा संसर्ग वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. नांदेड जिल्हयात कोविड 19 चा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अन्न व औषध प्रशासनास फेसमास्क व सॅनिटायझर, अत्यावश्यक वस्तू यांच्या खरेदी, विक्री व साठवणुक यावर नियंत्रण ठेवण्याच्या सुचना वेळोवेळी बैठकीत दिल्या आहेत.
त्यानुसार अन्न व औषध प्रशासन नांदेड यांच्यावतीने जिल्हयातील किराणा व औषध विक्री दुकाने यांच्या नियमित तपासण्या करण्याची मोहिम हाती घेण्यात आली असून नियमित तपासण्या करण्यात येत आहे. जिल्हयातील किराणा विक्रेते व औषध विक्रेते संघटना यांच्या शहर, तालुकास्तरावर वेळोवेळी बैठका घेऊन अत्यावश्यक वस्तुचा काळाबाजार, साठेबाजी न करण्याच्या, अत्यावश्यक वस्तुचा पुरवठा मुबलक प्रमाणात व सुरळीत सुरु राहिल याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.
 प्रशासनाने किराणा विक्रेते व औषध विक्रेते यांना दैनंदिन कामकाजावेळी दुकानासमोर कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांची गर्दी होऊ न देण्याचे तसेच सोशल डिस्टन्सिंगबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले आहे. ग्राहकांना हात स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा सॅनिटायझर उपलब्ध करून ठेवण्यास सांगितले आहे. दुकानात काम करणारे कामगार यांना हातमोजे, मास्क व सॅनिटायझर पुरविण्याच्या सुचना दिल्या आहेत.
प्रशासनास सिपला कंपनीने उत्पादीत केलेले हॅन्ड सॅनिटायझर बाजारात उपलब्ध असून त्याची  छापील किंमत केंद्र शासनाने 21 मार्च 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार निर्धारीत केलेल्या किंमतीपेक्षा जास्त असुन त्याची विक्री काही विक्रेते जास्त किंमतीत करत आहेत, अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे चौकशी केली असता, पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील मे. फार्मा टेडर्स या दुकानात सिपला कंपनीने उत्पादीत जास्त किंमत नमुद असलेला हॅन्ड सॅनिटायझरचा साठा आढळुन आला. या चौकशी वेळी दुकानदार सॅनिटायझरची विक्री केंद्र शासनाने निर्धारीत केलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीस विक्री करत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे 27 एप्रिल 2020 रोजी औषध निरीक्षक श्री. निमसे यांनी 3 हजार 100 रुपये किंमतीचा सॅनिटायझरचा साठा जप्त केला आहे. संबंधित दुकानदाराविरूध्द अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 अंतर्गत वजिराबाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिसांमार्फत सुरू आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी दिली आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...