Thursday, January 30, 2020


शिक्षक, अधिकाऱ्यांनी
नवोपक्रम स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 30 :- विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या गुणवत्तेसाठी नवोपक्रम स्पर्धा सन 2019-20 ही ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे संचालक दिनकर पाटील यांनी केले आहे.   
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये झपाट्याने शाळा प्रगत होताना दिसू लागल्या आहेत. शाळा-शाळांमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व सुलभ होण्यासाठी काही नावेपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे सर्व शाळांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झ्ज्ञाले आहे. प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत सन 2019-20 या वर्षासाठी राज्यस्तरीय नावोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. समग्र शिक्षानुसार एमएससीईआरटीच्या कार्याची व्याप्ती पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशी झाली असल्याने या वर्षापासून ही स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे.
पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या / सेविका व पर्यवेक्षिका, प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक, विषय सहाय्यक व विषयक साधन व्यक्ती. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता) ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  
नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे, नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे, स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी, स्पर्धेचे नियम, नवोपक्रम अहवालाचे मूल्यांकन, राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची कार्यवाही, नवोपक्रम बँक आदी माहितीसठी येथील जिल्हा प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था श्रीनगर नांदेड येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

नांदेड लोकसभा, विधानसभा मतमोजणीला शांततेत सुरूवात #विधानसभानिवडणूक२०२४ #लोकसभापोटनिवडणूक #मतमोजणी #नांदेड #मतदान