Saturday, January 18, 2020


होट्टल सांस्‍कृतिक व पर्यटन महोत्‍सव -2020
विविध कलाविष्काराचा संगम
   --- श्रीमती मीरा ढास,
                                                                                                     प्र. जिल्हा माहिती अधिकारी,
                                                                                                     नांदेड





17 ते 19  जाने, 2020 या तीन दिवसाच्या कालावधीत विविध कार्यक्रमांची मेजवाणी नांदेड जिल्‍ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेले व चालुक्‍यांची उपराजधानी म्‍हणून पुरातन काळात नावारूपाला आलेले ग्राम म्‍हणून होट्टलची ख्‍याती आहे. देगलूर तालुक्यातील होट्टल येथे सिध्‍देश्‍वराचे प्राचीन चालुक्‍य मंदीर स्थित असून सभोवती अनेक प्राचिन मंदिरे आहेत.
प्राचिन शिल्‍प, स्‍थापत्‍य कलेचा समृध्‍द वारसा जतन, संवर्धन करणे आणि पर्यटन वाढीच्‍या दृष्‍टीने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमात होट्टल ता. देगलूर जि. नांदेड या गावाचा पर्यटन ठिकाण म्हणून विकास करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याठिकाणी पर्यटक आणि भाविक दिवसातून किमान शेकडो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात.
 जिल्ह्यातील विकासाचा मानबिंदू म्हणून काही दिवसांत होट्टलचा उल्लेख होईल, यात शंका नाही. स्थनिक आमदार विकास निधीतून होट्टल विकास कामाला सुरवात झालेली असून या होट्टल महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी एक कोटी रुपये विकास कामांसाठी निधी देण्याचे सांगितले.
  होट्टल ता. देगलूर जि. नांदेड येथील होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवात पहिल्या दिवशी शर्वरी जेमिनीस , पुणे यांच्या संचानी आपली नृत्यकला सादर केली.  चित्र-शिल्प, कला संगीत, नृत्य या आविष्कारांचा संगम म्हणजे होट्टल महोत्सव सध्या साजरा होत आहे. याठिकाणी एकदा तरी पर्यटकाने, कलाकाराने अवश्य भेट द्यावी.  डोळ्यांचे पारणे फेडणारी येथील वास्तुकला असून हा अनुभव प्रत्येकासाठी नक्कीच आल्हाददायक आहे.
 या महोत्सवात चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गायिका ऐश्वर्या परदेशी, तबला वादक भार्गव देशमुख यांनी आपली कला सादर केली. शर्वरी जेमिनीस यांनी विविध नृत्याविष्कार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.  
 सायंकाळी 6-00 वाजता उद्धव बापू आपेगांवकर आणि एनोद्दीन वारसी व त्यांचा संच यांच्यात पखवाज वादन व बासरी वादन यांची जुगलबंदीचा कार्यक्रम रंगणार आहे. संध्याकाळी 7-00 ते 8-00 या वेळेत ऐश्वर्या बडदे यांचे लोककला लावणी नृत्य अविष्कार सायंकाळी सादर होईल.

दिनांक 19 जानेवारी,  2020 रोजी सायंकाळी समारोपाच्या कार्यक्रमानंतर गीत रामायण सादर केले जाईल. 7-00 ते 8-00 या वेळेत संजय जोशी आणि त्यांचा संच सादर करतील. त्यानंतर लोकसंगीत सादर करतील. विजय जोशी आणि त्यांचा संच सायंकाळी 7-00 ते 8-00 या वेळेत, भारुड हा कलाप्रकार निरंजन भाकरे आणि त्यांचा संच सादर करणार आहेत. संध्याकाळी 9-00 ते 10-00 या वेळेत अशा विविध कला प्रकाराची मेजवानीचा अस्वाद पर्यटकांसह स्थानिक लोकांना या होट्टल महोत्सवामध्ये घेता येणार आहे.  यासाठी सर्वांनी होट्टलला ता. देगलूर येथे भेट द्यावी.
0000

No comments:

Post a Comment

  लक्षवेध सादर निमंत्रण भारताच्या ७६ वा प्रजासत्ताक दिन समारंभ २६ जानेवारीला पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय वजीराबाद नांदेड येथे संपन्न हो...