Monday, December 23, 2019



वृत्तपत्रे ही समाजाचा आरसा  
--- पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर

नांदेड दि. 23 :- वृत्तपत्रे ही सामाजाचा आरसा आहेत, असे जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी प्रतिपादन केले. नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
 या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक  विजयकुमार मगर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र आणि जनसंवाद विभागाचे संचालक डॉ. दिपक शिंदे यांनी महिला सुरक्षा आणि वार्तांकन या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती गायकवाड, प्रा. डॉ. पुरणशेट्टीवार, तसेच पोलीस उपनिरीक्षक संगीता खर्जुले, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलचे प्रमुख राजेश आलीवार आदि जिल्ह्यातील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थींनीची यावेळी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, वृत्तपत्रातील बातम्यांचे स्वरुप, तपास, शिक्षेचे प्रमाण यावर लक्ष देणे आवश्यक आहे. कायदे, पास्को कायदा तसेच अन्य कायद्यांच्या अंमलबजावणी करणेही सुरु आहेत. तसेच गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, याच दृष्टीने पोलीस विभाग कार्य करित असतो.
कौटूबिंक हिंसाचार, आत्महत्या, समाज माध्यमातील गुन्हे, सायबर गुन्हे कमी होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेची आणखीण आवश्यकता आहे. तसेच समाजासमोर कोणत्या गोष्टी मांडल्या पाहिजेत. पत्रकारितेतील सकारात्मकता वाढवावी.
महिला अत्याचारासंदर्भात पुढे बोलतांना श्री. मगर म्हणाले की, जनजागृती, कायद्याचे ज्ञान, अपराध कमी करण्यासाठी व अपराध थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक असतात.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र आणि जनसंवाद विभागाचे संचालक डॉ. दिपक शिंदे यांनी महिला सुरक्षा आणि वृत्तांकन करतांना पत्रकारांनी घ्यावयाची काळजी आणि भुमिका या विषयावर मार्गदर्शन करतांना  म्हणाले की, वृत्तपत्रांनी चुकीचे वृत्त प्रसिध्द करु नयेत. वृत्तपत्रांनी सामाजिक बांधिलकी समजून वृत्तपत्र क्षेत्रात कार्य करावे. माध्यम म्हणजेच समाजाचं प्रतिबिंब असल्याने ते जपायला हवं. पत्रकारिता ही सत्यावर आधारित असावी. खोटी नसावी, जबाबदारीची जाणीव, प्रामाणिकपणा व आपले उत्तरदायित्व लक्षात घेवून कार्य करावे. तसेच सोशल मिडियामध्ये प्रथम मी या स्पर्धेत बातम्या घाईत देण्याचा प्रयत्न केला जातो. आपण वृत्तपत्रात बातमी देण्याअगोदर त्याचा उद्देश विसरुन जात आहोत का ? आपण कांहीतरी समाजाचं देणं लागतो यादृष्टीने कार्य करणे आवश्यक आहे.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर आणि इतर मान्यवरांनी दिली. तसेच या कार्यशाळेत श्रीमती सुप्रिया गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे सुत्रसंचालन छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी केले. तर आभार प्र. जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मीरा ढास यांनी मानले.

00000 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...