Sunday, November 24, 2019


मुखेडला पूर्णवेळ अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय
सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार - न्यायमूर्ती सोनवणे
नांदेड दि. 25 :-  मुखेड न्यायालयाची इमारत दीड वर्षात पूर्ण झाली पाहिजे. या नूतन इमारतीत पूर्णवेळ अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू झाले पाहिजे याकरिता आगामी काळात प्रयत्न करणार आहे. लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती किशोर सोनवणे यांनी केले आहे.
मुखेड येथील न्यायालयातील नूतन इमारत भूमिपूजन सोहळा रविवारी दिनांक 24 रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नांदेड जिल्हा प्रमुख न्यायाधीश दीपक धोळकिया, कंधारचे जिल्हा न्यायाधीश अतुल सलगर, मुखेड अभियोक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. धनंजय येवतीकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
न्यायमूर्ती किशोर सोनवणे यांच्या हस्ते नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. न्यायमूर्ती किशोर सोनवणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती किशोर सोनवणे यांनी सांगितले की मुखेड येथे न्यायालयाची नूतन इमारत दोन मजली होणार आहे. या इमारतीतून न्यायदानाचे काम केले जाणार आहे. न्यायालयाची इमारत मुखेडसाठी भूषणावह  होणार आहे. म्हणून इमारतीचे बांधकाम चांगल्या प्रकारे व वेळेत पूर्ण झाले पाहिजे. मुखेड येथील अभियोक्ता संघाने अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय नियमित झाले पाहिजे म्हणून मागणी केली आहे. आगामी काळात मुखेडला पूर्णवेळ अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय झाले पाहिजे म्हणून प्रयत्न करणार आहे. लोकन्यायालय हे लोकांसाठी असल्यामुळे लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावीत. लोकन्यायालयाचा लाभ पक्षकारांना करून द्यावा असे आवाहन न्यायमूर्ती किशोर सोनवणे यांनी केले.
नांदेड जिल्हा प्रमुख न्यायाधीश दीपक धोळकिया म्हणाले, मुखेड येथे नऊ कोटी 70 लाख रुपये किंमतीची नूतन इमारत बांधकाम होत आहे. ही इमारत दोन मजली असल्यामुळे सर्व सुखसोयी युक्त बांधकाम होणार आहे. हरित इमारतीची संकल्पना राबविली जात आहे. चौदाव्या वित्त आयोगाचा मिळालेल्या निधी नुसार मुखेड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय नियमित सुरू करण्यात आले आहे. या भागातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी. न्याय देण्याचे काम करावे असे श्री धोळकिया यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा न्यायाधीश अतुल सलगर, अभीवक्तता संघाचे अध्यक्ष धनंजय येवतीकर यांनी मनोगतातून या भागातील न्यायालयातील कामकाजाची माहिती दिली आहे. प्राध्यापक संतोष देवराय यांनी सूत्रसंचालन केले तर न्यायाधीश नम्रता बिरादार यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमात जिल्हा परिषद  मुलींचे विद्यालय मुखेड येथील विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन लेझीम पथकद्वारे  मान्यवरांचे स्वागत केले आहे.
कार्यक्रमास तहसीलदार काशिनाथ पाटील, पोलीस निरीक्षक नरसिंग अकोस्कर, नगराध्यक्ष बाबूराव देबडवार, माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, आदीसह कंधार देगलूर नांदेड येथील वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुखेड न्यायालयातील वरिष्ठ स्तर न्यायाधीश एसटी शिंदे न्यायाधीश एस जी शिंदे, न्यायाधीश नम्रता बिरादार अभीवक्ता संघाचे पदाधिकारी व सदस्य न्यायालयीन कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदीसह अनेकांनी पुढाकार घेतला आहे.
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...