Wednesday, November 6, 2019


कर्करोगाबद्दलचे अज्ञान दूर करुन
आरोग्याची वेळेत तपासणी करा
-         जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  
       
नांदेड दि. 6 :- कर्करोगाला आळा घालण्यासाठी कर्करोग आजाराबद्दलचे अज्ञान दूर करुन प्रत्येक व्यक्तींनी वेळेत आरोग्याची तपासणी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.   
           नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत नागरिकांमध्ये कर्करोगाबद्दल जनजागृती व्हावी, नागरिकांच्या मनात कर्करोगाबद्दल असणारी भिती दूर होऊन नांदेड जिल्हा कर्करोग मुक्त व्हावा या उद्देशाने कर्करोग जनजागृती व नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत कर्करोग निदान शिबीर व सर्वेक्षणात उत्कृष्ट काम केलेल्या आशा, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व इतर अधिकारी यांचा सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते जिल्हा नियोजन भवन येथे आज सत्कार करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, कर्करोग जनजागृती कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. नंदकुमार पानशे, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) सुरेश थोरात, श्री रेणुका देवी संस्थेचे चंद्रकांत भोपी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, कर्करोगाबद्दल मनातील भिती दूर करुन दुर्देवाने ज्या लोकांना कर्करोग झाला त्यांना त्वरीत प्राथमिक स्तरावर कर्करोगाचे निदान करुन त्यांच्यावर उपचार करण्यामध्ये जिल्ह्यातील सर्व आरोग्य आशाताईचा, आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. या उपक्रमात केलेले उत्कृष्ट काम जिल्हा कर्करोग मुक्त करण्यासाठी कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले.    
           
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काकडे यांनी कर्करोग नियंत्रणासाठी जिल्ह्यात 30 एप्रिल 2018 मध्ये संकल्प केला तो दिवस कर्करोग नियंत्रण दिवस म्हणून साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला. जनजागृती व अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे कर्करोगावर मात केली जात आहे. वेळेत आरोग्य उपचार केल्यास कर्करोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा, कर्करोग प्रकल्पाचे कर्मचारी आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात 30 आशा, 3 वैद्यकीय अधिकारी, 10 विशेष तज्ज्ञ डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.
जिल्ह्यातील 12 तालुक्यात 25 कर्करोग निदान शिबीरे घेण्यात आली. त्यात 39 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 15 लाख 99 हजार 732 लोकसंख्या असलेल्या 3 लाख 61 हजार 22 घरांमध्ये आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. एकुण 25 कर्करोग निदान शिबिरात 9 हजार 634 रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 273 रुग्णांची पॅप स्मिअर चाचणी घेण्यात आली. असे एकुण 1 हजार 744 रुग्णांना नांदेड येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. कर्करोगाची संभावणा असलेल्या 950 रुग्णांना प्रतिबंधात्मक औषधोपचार करुन आरोग्य शिक्षण देण्यात आले. बारा तालुक्यात तोंडाचा कर्करोगाचे 23, स्थनाचे कर्करोग 6 व गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचे कर्करोग 11 असे 40 कर्करोग रुग्ण आढळून आले असून त्यांचा उपचार मोनार्क कॅन्सर हॉस्पिटल येथे चालू आहे. यापैकी बरेच रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. कर्करोग नसलेल्या स्तनाच्या गाठीचे 196 रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ. माहुरे व श्रीमती दुलंगे यांनी केले. कर्करोग जिल्हा समन्वयक डॉ. जी. एच. वाडेकर यांनी शेवटी आभार मानले.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...