Wednesday, November 6, 2019


नरसी येथील भूखंडांची सोडत संपन्न
म्हाडाच्या माध्यमातून सामान्यांना
स्वस्तात दर्जेदार घरे देणार
- सभापती संजय केणेकर
       
नांदेड दि. 6 :- बेघरांना घराची स्वप्नपूर्ती करुन देण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) माध्यमातून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात सामान्यांना स्वस्तात दर्जेदार घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती औरंगाबाद म्हाडा विभागाचे सभापती संजय केणेकर यांनी दिली.
नायगाव तालुक्यातील नरसी येथील विकसीत भूंखडाची सोडत नांदेड शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आज पार पडली. जाहिरातीनुसार विविध उत्पन्न गटातील प्राप्त 55 अर्जापैकी 47 अर्जदार या सोडतीत यशस्वी झाले. याप्रसंगी सभापती संजय केणेकर बोलत होते.    
            यावेळी म्हाडाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, समाजकल्याणचे बापू दासरी, म्हाडाचे उपमुख्य अधिकारी श्री. नामेवार, मिळकत व्यवस्थापक श्री. गायकवाड, शाखा अभियंता दत्तात्रय लांबतुरे, नायब तहसिलदार श्री. वघवाड, नायब तहसिलदार मुगाजी काकडे, माध्यम प्रतिनिधी अभयकुमार दांडगे, शिवराज बिच्चेवार तसेच सोडतीस अर्ज केलेले बहूसंख्य अर्जदार उपस्थित होते.
म्हाडामार्फत राबविण्यात येत असलेल्या व राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन सभापती संजय केणेकर म्हणाले की, म्हाडा गरजू गरीबातील गरीब लोकांसाठी विविध योजनेतून दर्जेदार मुलभुत सुविधांसह स्वस्तात घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. ना नफा ना तोटा या अर्थाने गरीबांच्या घरांची स्वप्नपूर्ती कशी होईल यासाठी प्रयत्न आहे. नांदेड शहरात जमीन उपलब्ध झाल्यास म्हाडाच्यावतीने विविध घटकातील नागरिकांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्यात येईल. महानगरपालिका, नगरपालिका व म्हाडा यांनी संयुक्तपणे घरकुलासाठी काम केल्यास नागरी भागात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. म्हाडामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन अधिकृत घरे निर्माण केली जात आहे. हे काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न असून पुढील काळात नागरी भागात यामुळे अनाधिकृत वस्त्या वाढणार नाहीत, असेही ते म्हणाले.
यावेळी सभापती संजय केणेकर यांनी पत्रकारांसाठी म्हाडाच्या योजनेविषयी सविस्तर माहिती देवून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली व म्हाडा जास्तीतजास्त घरे बांधण्यासाठी कटिबध्द असल्याचे नमुद केले.
औरंगाबाद म्हाडाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या व भूसंपादनाबाबत संक्षिप्त माहिती देवून अर्जदारांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले.  
            सोडत यशस्वितेसाठी सर्वश्री. ढोले, ढगे, अरशद शेख, बाबळसुरे, ठोबंरे, दुडकीकर, ताटे, पी.एन. शेख आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन श्री. रावळे यांनी केले. 
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...