Thursday, November 7, 2019


 शेतीपिकांच्‍या नुकसानीचे 78.48 टक्के पंचनामे पूर्ण   
  स्‍वयंसेवी संघटना / युवकांनी नुकसानीचे फोटो
शासकीय यंत्रणेला द्यावे - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  
            नांदेड दि. 7 :- ऑक्‍टोबर 2019 मधील पावसामुळे झालेल्या पिकांच्‍या नुकसानीबाबत जिल्‍हाधिकरी अरुण डोंगरे यांनी आज जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था, नांदेड व जिल्‍हा प्रतिनिधी नांदेड (एआयसी विमा कंपनी) यांची आढावा बैठक घेतली.
जिल्हयात पिकांच्‍या नुकसानीचे पंचनामे करण्‍याचे काम अंतिम टप्‍प्यात सुरू असून, सद्यःस्थितीत 78.48 टक्के पंचनामे करण्‍याचे काम पुर्ण झाले आहे. प्रकरणी पीक नुकसानीचे सर्व पंचनामे प्रत्‍यक्ष जायमोक्‍याच्‍या ठिकाणी जावून शुक्रवार 8 नोव्हेंबर 2019  पर्यंत पूर्ण करण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी अरूण डोंगरे यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दिले आहे. या आढावा बैठकीत जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे यांनी ऑक्‍टोबर, 2019 मधील पावसामुळे शेतीपिकांचे 33 टक्के किंवा अधिक नुकसान झालेल्या नुकसानीबाबत शासनास सादर करावयाच्‍या विवरणपत्राची माहिती देवून, या विवरणपत्रातील माहिती तात्‍काळ सादर करण्‍याचे निर्देश  दिले. 
            ऑक्‍टोबर 2019 मधील शेतीपिकांसाठी ज्‍या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्‍यासाठी संबंधित कंपनीच्‍या प्रतिनिधीसह संयुक्‍त समितीने सर्वेक्षण करणे आवश्‍यक आहे. तथापी, पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनामा करतेवेळी उपस्थित नसल्यास शासकीय यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राहय धरण्‍यात येतील, असे कृषी आयुक्‍त पुणे यांनी कळविले आहे.
            ऑक्टोबर 2019 मधील झालेल्या नुकसानीच्‍या पंचनाम्‍या दरम्यान काढलेले फोटो शेतीपिकांच्‍या नुकसानीचा पुरावा म्‍हणून ग्राहय धरण्‍यात येणार आहे. पिक नुकसानीचे Geo tagged फोटो नसल्‍यास पिक विमा कंपनीकडुन विम्‍याचा दावा खारीज होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. सदरचे पंचनामे हे विहीत नमुन्‍यात करणे आवश्‍यक असून त्‍यासोबत प्रत्‍येक शेतकऱ्यांच्‍या पिक नुकसानीचे Geo tagged फोटो काढण्‍याच्‍या सूचना देण्‍यात येत आहेत. कृषी आयुक्‍त यांच्याकडून प्राप्‍त विहीत पंचनाम्‍याच्‍या नमुन्‍यात शेतकऱ्यांचे नाव, शेतक-यांची सही इ. बाबी नमूद असलेला पंचनामा आवश्‍यक असल्‍याचे कळविले आहे.
            ही कार्यवाही मोठया स्‍वरुपाची असल्‍याने ग्रामस्‍तरावरील स्‍वयंसेवी संघटना / युवक यांचे माध्‍यमातुन झालेल्‍या नुकसानीचे Geo tagged फोटो, पंचनामा करणा-या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकरी अरूण डोंगरे यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...