Tuesday, September 17, 2019


मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
ध्वजवंदनाचा मुख्य समारंभ उत्साहात संपन्न
पशुसंवर्धन राज्यमंत्री  खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

नांदेड, दि.17:- मराठवाड्याचे जे कांही प्रश्न आहेत, ते सोडविण्याचा प्रयत्न करु... आज मराठवाडा दुष्काळाच्या छायेमध्ये आहे, अशाही परिस्थितीमध्ये निश्चितपणे कांही भागामध्ये पाऊसाची हजेरी नाही, अशाही परिस्थितीत मराठवाड्यातील जनतेच्या शासन पाठीशी ठामपणे उभे आहे. संपूर्ण मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड ही ऐतिहासिक अशी योजना आहे. या  योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निश्चितपणे सुटेल, असेही पशुसंवर्धन राज्यमंत्री  श्री. खोतकर यांनी प्रतिपादन केले.  
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 71 वा वर्धापन दिनोत्सवानिमित्त मंगळवार, दिनांक 17 सप्टेंबर, 2019 रोजी सकाळी 08.30 वाजता माता गुजरीजी विसावा उद्यान, नांदेड येथील हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. 9-00 वाजता ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार-जवळगावकर, महापौर दिक्षाताई धबाले, स्वातंत्र्य सैनिक यांच्यावतीने स्वातंत्र्य सेनानी नारायणराव भोगावकर, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, डी.पी.सावंत, राम-पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक गृहरक्षक दल दत्ता राठोड, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण उपस्थित जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, पदाधिकारी, अधिकारी, ज्येष्ठ नागरिक आदींनी पुष्प अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.  
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छापर संदेशात राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री  अर्जुन खोतकर म्हणाले की, मराठवाड्याला निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींना वंदन करण्याचा हा क्षण आहे. मराठवाड्याच्या भुमीपुत्रांसह अनेकांनी मराठवाड्याला निजामाच्या मगरमिठीतून सोडवण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न केले. त्यांचे हौतात्म्य आपण विसरता कामा नये. मराठवाड्याने शौर्याची परंपरा कायम राखली. स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन, आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्यांची परंपरा मराठवाड्याला या मुक्तीसंग्रामातून मिळाली आहे.   
           
त्यामुळे हा दिवस मराठवाड्याच्या जनतेच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॅाफ, गंगाप्रसाद अग्रवाल यांच्यापासून ते अनेक ज्ञात आणि अज्ञात वीरांच्या समग्र प्रयत्नातून मिळालेले हे स्वातंत्र्य निश्चितच तुम्हा-आम्हांला प्रेरणा आणि स्फूर्तीदायी आहे. मुक्ती संग्रामातील या विरांना यानिमित्ताने वंदन करतो आणि त्या हुतात्म्यांनाही कृतज्ज्ञतापूर्वक अभिवादन करतो, असेही पशुसंवर्धन राज्यमंत्री  श्री. खोतकर म्हणाले.    
            मराठवाडा लढवय्यांचा आणि कष्टकरी, शेतकऱ्यांच्या मनगटावर उभा राहिलेला प्रदेश आहे. आपण प्रगतीशील आणि विकासाच्या वाटेवर अग्रेसर होऊ. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि उपस्थित सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छाही यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री  श्री. खोतकर यांनी यावेळी दिल्या.  
          
  हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभासमोर पोलीस दलाच्या पथकाने सावधान सलामी, शोकशस्त्र, सलामी शस्त्र आणि मान्यवरांनी आदरांजली वाहिल्यानंतर हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली. पोलीस वाद्यवृंद पथकानेही बिगूल धून वाजवून सलामी दिली. यावेळी सर्व उपस्थितांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. त्यानंतर राष्ट्रध्वजाचे वंदन आणि राष्ट्रीय सलामी झाली. याप्रसंगी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिकेचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री  अर्जुन खोतकर यांनी स्वातंत्र्य सेनानी व जेष्ठ नागरिकांची भेट घेवून त्यांना मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. राखीव पोलीस निरीक्षक सहदेव पोकळे यांनी परेड कमांडर म्हणून संचालन केले. तर व्यंकटेश चौधरी यांनी सुत्रसंचालन केले. या समारंभास नागरिक, विविध शाळेतील विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








 

0000  

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...