Saturday, August 31, 2019


लोकशाही दिनाचे मंगळवारी आयोजन
नांदेड, दि. 31 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. परंतू सोमवार 2 सप्टेंबर रोजी सार्वजनिक  सुट्टी असल्यामुळे लोकशाही दिन मंगळवार 3 सप्टेंबर 2019 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे.
यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000
वृत्त क्र. 624
गणेश मंडळानी प्रसाद वाटपासाठी
आरोग्याच्या हेतूने दक्षता घावी
नांदेड दि. 31 :- श्रीगणेश उत्सवानिमित्ताने विविध गणेश मंडळाकडून प्रसाद तयार करुन भाविकांना वाटप करण्यात येतो. गणेश मंडळानी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातर्गत त्याची नोंदणी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त टि. सी. बोराळकर यांनी केले.
सर्व सार्वजनिक उत्सव मंडळे, त्याचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन वितरण करणारे अन्न व्यावसायिक यांनअन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 व त्याअंतर्गत नियम व नियमन 2011 मधल तरतुदीचे सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने पालन करणे बंधनकारक आहे.
प्रसाद उत्पादनाची जागा स्वच्छ असावी, प्रसादाला लागणारी भांडी स्वच्छ आरोग्यदायी व झाकण असलेली असावी, आवश्यक तेवढयाच प्रसादाची निर्मिती करावी,  प्रसाद बनवितांना लागणारे पाणी पिण्यास योग्य असावे, लोकांच्या आरोग्याच्यादष्टीने या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे. प्रसाद तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालाचा घटक पदार्थ परवानाधारक अन्न व्यावसायिकाकडूनच खरेदी करावेत व त्यांचे खरेदी बिल जतन करुन ठेवावेत. मिठाई, पेठे आदी प्रसादाचे पदार्थ झाकुन ठेवावेत व जंतुसंसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच प्रसादाचे वाटप करणारे स्वयंसेवक यांनी वैयक्तीक स्वच्छता ठेवावी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.  
00000
वृत्त क्र. 625
बारावी परीक्षा गुण दर्शविणारे 
अभिलेखांचे बुधवारी वितरण  
नांदेड, दि. 31 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी जुलै-ऑगस्ट 2019 पुरवणी परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे कनिष्ठ महाविद्यालय अभिलेखांचे वितरण लातूर विभागीय मंडळातर्फे बुधवार 4 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 ते सायं 5 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत केंब्रीज विद्यालय नांदेड येथील वितरण केंद्रावर वितरीत करण्यात येणार आहे.  
लातूर विभागातील नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांनी आपल्या प्रतिनधिीस लेखी पत्र देऊन परीक्षेचे साहित्य स्वीकारण्यासाठी वितरण केंद्रावर पाठवावे, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 626
     जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 31 :- जिल्ह्यात गुरुवार 12 सप्टेंबर 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 29 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते गुरुवार 12 सप्टेंबर 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000



वृत्त क्र. 627
जवाहर नवोदय विद्यालयातील
सहावी प्रवेश परिक्षेविषयी 3 सप्टेंबर रोजी बैठक  
नांदेड दि. 31 :- जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथील इयत्ता सहावीची प्रवेश परिक्षा 11 जानेवारी 2020 रोजी जिल्ह्यात तालुकानिहाय परिक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या प्रवेश परिक्षेचे मागच्या वर्षीपेक्षा जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज प्राप्त व्हावे म्हणून जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी नांदेड यांच्या उपस्थितीत 3 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 वा. स्कॉउट गाईड कार्यालय वजिराबाद नांदेड येथे बैठकीचे आयोजन केले आहे. 
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाविस्तार अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य शंकरनगर यांनी केले आहे. या परीक्षेचे ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी जे विद्यार्थी चालु शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीत शिकत आहेत त्यांचे ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत रविवार 15 सप्टेंबर 2019 असून हे अर्ज www.nvsadmissionclasssix.in या संकेतस्थळावर करावीत.  संबंधीत पालक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे शाळा मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचे छायाचित्र, पालक व मुख्याध्यापकांची स्वाक्षरीसह 15 सप्टेंबर 2019 पुर्वी ऑनलाईन अपलोड करावे, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 628
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजनेतील विद्यार्थ्यांना नुतनिकरणाचे आवाहन
नांदेड दि. 31 :-  अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये ज्या पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात लाभ घेण्यासाठी सोमवार 9 सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड येथे आवश्यक कागदपत्रासह संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.
या योजनेत नुतनिकरणासाठी लागणारे कागदपत्रे सन 2019-20 मध्ये महाविद्यालय, कॉलेजमध्ये प्रवेशित असल्याचे मुळ बोनाफाईड (बोनाफाईडवर खाडोखोड असल्यास ग्राह्य धरले जाणार नाही.), सन 2018-19 या मागील वर्षाची गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, चालु वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, भाडेकरारनामा व भाडेपावती शंभर रुपये बॉन्ड पेपरवर (खाजगी व कॉलेजच्या वसितगृहात राहत असल्यास वसतिगृहाचा पुरावा), बॅक पासबुक अद्यावत आयएफएससी कोडसह सत्यप्रती आवश्यक आहेत. 
सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेसाठी अर्ज करुन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी या सुचनेप्रमाणे कार्यालयास संपर्क करावा. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याने किमान 50 टक्के गुण मिळविलेले असावेत. 50 टक्के पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही. जे विद्यार्थी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात कोणत्याही कोर्सच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होते, उदा. बीए, बीएससी, बीकॉम, पॉली तृतीय वर्ष, एमए, एमएससी,एमकॉम द्वितीय वर्ष, इंजिनिअंरिग, मेडिकल, लॉ शेवटचे वर्ष व इयत्ता बारावी अशा विद्यार्थ्यांनी कार्यालयाशी संपर्क साधू नये. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करुन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी या सुचना गृहित धराव्यात. सोमवार 9 सप्टेंबर 2019 नंतर संपर्क झाल्यास विद्यार्थ्यांना लाभ देण्याकरीता विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. हे आवाहन नवीन अर्जासाठी नूसन केवळ नुतनिकरण विद्यार्थ्यांसाठी असून नवीन अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 629
एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत
पोषण महिन्याचे आयोजन   
नांदेड दि. 31 :- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत  सध्या राज्यात पोषण महिना सप्टेंबरमध्ये साजरा करण्यात येत असून त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ग्रामीण, आदिवासी व नागरी अशा सर्व 19 प्रकल्पांतर्गत एकूण 4 हजार 160 अंगणवाडी केंद्रामार्फत 1 ते 28 सप्टेंबर 2019 पर्यंत सर्व विभागाच्या सहकार्याने, समन्वयातून पोषण महिना साजरा करण्यात येत असून या अभियानात पूढील प्रमाणे कार्यकम, उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या अभियानाचा (कंसात कार्यक्रम, उपक्रम) कंसाबाहेर तपशील दिला आहे.
रविवार 1 सप्टेंबर 2019 रोजी (राज्यस्तरीय पोषण महिन्याचा उद्घाटन समारंभ व त्याचे वेबकास्टिंग)- सर्व विभागांनी हा कार्यक्रम पाहणे, सहभागी होणे व उद्घाटन समारोहाचे आयोजन करणे. सोमवार 2 सप्टेंबर 2019 रोजी (गणेशोत्सव देखाव्यामध्ये बॅनर्स / स्टँडीज लावणे)- ग्रामस्तर / तालूकास्तर व जिल्हास्तरावर गणेशोत्सव देखाव्यामध्ये बॅनर्स / स्टँडीज लावणे. मंगळवार 3 सप्टेंबर 2019 रोजी (बालकांचे पहिले 1000 दिवस)- सर्व अंगणवाडी केंद्रातील बालकांचे लसिकरण सत्र आयोजित करणे तसेच बालकाच्या पहिल्या 1 हजार दिवसाचे महत्व विशद करणे. बुधवार 4 सप्टेंबर 2019 रोजी (प्रभातफेरी)- जिल्ह्यातील सर्व शाळेतून / अंगणवाडी केंद्रातून प्रभातफेरी काढून पौष्टिक आहाराच्या महत्वाबाबत जनजागृती करावी. गुरुवार 5 सप्टेंबर 2019 रोजी (गृहभेटी)- सॅम व मॅम बालकांच्या घरी भेटी देवून कूटूंबियांना पोषणाबाबत तसेच त्यांच्या बालकाच्या पोषण स्थितीबाबत माहिती देवून अतिसार, परिसर स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि हात धुणे याबाबत जनजागृती करावी.शुक्रवार 6 सप्टेंबर 2019 रोजी (आरोग्य कॅम्पचे आयोजन)- जिल्ह्यातील सर्व गावात आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचयातीच्या सहकार्याने आरोग्य कॅम्पचे आयोजन करुन त्यात ॲनिमिया प्रतिबंधासाठी उपाययोजना तसेच त्याबाबतची माहिती सर्वांना द्यावी. शनिवार 7 सप्टेंबर 2019 रोजी (समुदाय आधारित (CBE) कार्यक्रम घेणे)- जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रातून समुदाय आधारित (CBE) कार्यक्रमाचे आयोजन करुन त्यात सुपोषण दिवस साजरा करुन नाटीका / पथनाटयाच्या सहाय्याने जनजागृती करण्यात यावी. सोमवार 9 सप्टेंबर 2019 रोजी (सायकल रॅली)- नांदेड जिल्ह्यातील सर्व गांवातून सायकल रॅली / फेरी काढून त्यात वैयक्तीक स्वच्छतेचे संदेश देण्यांत यांवेत. बुधवार 11 सप्टेंबर 2019 रोजी (परसबाग जनजागृती)- जिल्ह्यातील सर्व गांवातून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने अंगणवाडी सेविका यांचेमार्फत घरोघरी परसबाग करण्यांबाबत जनजागृती करुन परसबागेचे महत्व समजावून सांगणे. शुक्रवार 13 सप्टेंबर 2019 रोजी (पोषण चौपाल)- नांदेड जिल्ह्यातील सर्व गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांच्या सहभागाने पोषण चौपालाचे आयोजन करुन त्यात परिसर स्वच्छता, स्वच्छतागृहांची उपलब्धता, संतूलित आहाराचे महत्व व उपलब्धता आदी बाबत चर्चा करुन व मुद्यांच्या अनुषंगाने जनजागृती करणे. शनिवार 14 ते 21  सप्टेंबर 2019 रोजी- (विविध स्पर्धा तसेच पालक मेळावे) शाळा आधारित कार्यक्रम- जसे पोषण प्रश्नोत्तरी, पोषण विषयक वाद विवाद स्पर्धा घेणे तसेच वक्तृत्व स्पर्धा घ्याव्यात- कुपोषण, अनेमिया, बाळाचे पहिले 1 हजार दिवस, पोषक घटकांची कमतरता व आजार, संतुलित आहार आदी पालक मेळावे- शाळा आधारित व अंगणवाडी आधारित पालक मेळावे घेण्यात यावेत.
सोमवार 23 ते शनिवार 28 सप्टेंबर 2019 कालावधीत  (सामुहिक कार्यक्रम)- बचतगटांच्या बैठका / चर्चा करणे यामध्ये अनेमिया, योग्य आहार सवयी, वैयक्तिक व परिसर स्वच्छता, स्वच्छ पाणी, वैविध्यपूर्ण आहार, आहार प्रात्यक्षिके व  प्रदर्शन इत्यादी विषयांचा समावेश असावा. पथनाट्य- पोषण अभियानाशी संबंधित विषयांवर पथनाटय सादर करणे. किशोरींकरिता कौशल्य विकास केंद्राना भेटी देणे तसेच त्यांना कौशल्य विकासाबाबतचे मार्गदर्शन करणे आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत.  
या पोषण अभियान कालावधीत पुढील पाच महत्वाच्या घटकांवर लक्ष देण्यात येणार आहे. यात बालकांचे पहिले 1 हजार दिवस, अॅनेमिया,अतिसार, हात धूणे आणि स्वच्छता, पौष्टिक आहार (पौष्टिक आहार वैविध्यपूर्ण आहारासह) या बाबींच्या जनजागृतीसाठी तसेच सर्वच घटकांना आरोग्य व पोषण सेवेचा लाभ देण्यासाठी  पाणी, परिसर व वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य व पोषण सेवा उपलब्ध करून देणे या बाबींवर विशेष भर देण्यात येत आहे. याप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करुन पोषण महिना साजरा करण्यात येत आहे. महिला व बाल विकास विभागासह ग्राम विकास विभाग (पंचायत राज). सार्वजनिक आरोग्य, पाणी पूरवठा व स्वच्छता, क्रिडा, माहिती व जनसंपर्क, शालेय शिक्षण / उच्च शिक्षण, आदिवासी विकास, अन्न व औषध प्रशासन, कृषि, नगर विकास, कौशल्य विकास, समाज कल्याण या सर्व विभागांचा जिल्हा, गट व ग्रामस्तरावर पोषण विषयासह विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम व उपक्रम आयोजित करुन सहभाग राहणार आहे.
            या कार्यक्रमात गरोदर महिलांची काळजी. प्रसूतीनंतर बालकाला तात्काळ व सहा महिन्यांपर्यंत निव्वळ स्तनपान. बालकांचे वृध्दी सनियंत्रण. वयाच्या सहा महिने पूर्ण झालेल्या बालकाला वरचा आहार सूरू करणे.  बालके,महिला व किशोरवयीन मुली यांच्या मधील रक्ताल्पता. मुलींचे शिक्षण, पोषण आहार व विवाहाचे योग्य वय. वैयक्तिक स्वच्छता व परिसर स्वच्छता. आरोग्यदायी व सूक्ष्म पोषणमुल्य असलेल्या आहाराचे सेवन.
सर्व कार्यक्रम / उपक्रम राबविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील पूढील प्रमाणे अधिकारी, कर्मचारी  यांचा सहभाग आहे- ग्रामस्तरावर सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनिस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्यासह आशा, ए.एन.एम, आरोग्य कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच ग्रामसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या सर्वांचाच सक्रिय सहभाग आहे. याशिवाय तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालूका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, सां. / पंचायत व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा सहभाग असून जिल्हास्तरावर जिल्‍हाधिकारी महोदय व मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत, / ग्रा.पा.पू. / बा.वि. तसेच शिक्षणाधिकारी, प्राथ. व माध्य. यांचेसह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालविकास यांनी दिली आहे.
00000
वृत्त क्र. 630
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये
अधिकारी पदाच्या पूर्व  प्रशिक्षणाची मोफत संधी
नांदेड दि. 31 :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी 18 ते 27 सप्टेंबर या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 50 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

नांदेड जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे 12 सप्टेंबर रोजी मुलाखतीस उपस्थित  रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Google Plus पेजवरती किंवा सैनिक कल्याण विभाग पुणे यांची वेबसाईट www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध चेक लिस्टचे अवलोकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊनलोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून (किंवा प्रिंट कार्यालयाकडून घ्यावी) ते पुर्ण भरुन आणावेत.
केंद्रामध्ये एसएसबी कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवून यावेत. कंम्बाईंड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) उत्तीर्ण झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी  सी सर्टिफिकेट ए‍ किंवा बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी ‍‍शिफारस केलेली असावी.
टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.University Entry‍ Scheme साठी  एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठीशिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व  प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांचा दूरध्वनी क्र. 0253-२४५१०३१ आणि ०२५३-२४५१०३२ असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहनजिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  नांदेड यांनी केले आहे.
0000
वृत्त क्र. 631
मोटार वाहन (सुधारणा)
अधिनियम-2019 ची अंमलबजावणी
नांदेड दि. 31 :- मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 केंद्र शासनाने 9 ऑगस्ट 2019 रोजीच्या असाधारण राजपत्रामध्ये प्रकाशित केली आहे. केंद्र शासनाने अधिसूचना क्रमांक जीएसआर-3110 ई दिनांक 28 ऑगस्ट 2019 अन्वये नमुद कलमांची अंमलबजावणी रविवार 1 सप्टेंबर 2019 रोजीपासून करण्याबाबत अधिसूचित केली आहे. याबाबत सविस्तर प्रसिद्धी पत्रक व अटी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या आहेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000
इमारत बांधकाम / विस्तार नूतनीकरणासाठी
शासनमान्य ग्रंथालयांकडून अर्ज आमंत्रित
नांदेड, दि. 30 :- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी योजनेतंर्गत 'इमारत बांधकाम/विस्तार नूतनीकरण' या योजनेसाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांच्या मार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्या संदर्भातील नियम, अटी अर्जांचा नमूना www.rrrlf.nic.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी तो या संकेतस्थळावरुन उपलब्ध (download) करुन घ्यावा.
समान निधी योजना (Matching Seheme) (2018-19 साठी) :- राज्य शासनाचे 50% प्रतिष्ठानचे 50% अर्थसहाय्य देण्यात येते. सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत बांधकाम / विस्तार नूतनीकरण अर्थसहाय्य (कमाल मर्यादा 10 लक्ष) आहे. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक महितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.nic.in हे संकेतस्थळ पहावे. ग्रंथालयांनी समान निधी या योजनेंतर्गत इमारत बांधकाम / विस्तार नूतणीकरणासाठीचा प्रस्ताव (विहित नमूद पध्दतीत) आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि.16 सप्टेंबर, 2019 पर्यंत पोहोचतील अशा बेतान पाठवावेत, असे आवाहन सुभाष हि.राठोड, ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांनी राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.
00000
श्री गणेश उत्सव काळात
डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध
नांदेड, दि. 30 :- श्री गणेश उत्सव 2 ते 12 सप्टेंबर कालावधीत जिल्ह्यात कोणतेही डॉल्बी मालक, धारक, गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात, उपभोगात आण्यास जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 (1) अन्वये प्रतिबंध केला आहे. सदर डॉल्बी मशीन व यंत्रसामुग्री संबंधितांनी स्वत:च्या कब्जात सिलबंद स्थितीत ठेवावी. हा आदेश 2 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 12 सप्टेंबर रोजी श्रीचे विसर्जन होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील, असे आदेशात नमूद केले आहे.
0000
राष्ट्रीय क्रीडा दिन  
विविध कार्यक्रमाने संपन्न
नांदेड, दि. 30 :- क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑगष्ट राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधुन फिट इंडिया मुव्हमेंट शपथ कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुल, बास्केटबॉल मैदान नांदेड येथे संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित विविध क्रीडा संघटनेचे खेळाडु, शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरीक, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट गाईड राष्ट्रीय छात्र सेना यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दुपारच्या सत्रात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑगष्ट मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जनार्धन गुपिले (शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार्थी, रस्सीखेच) हे होते तर, प्रमुख पाहुणे म्हणुन ओमकार स्वामी (अल्ट्रा मॅराथॉन धावपटु), डॉ. संतोषकुमार स्वामी (होमीयोपॅथीक न्ड हर्बल मल्टिस्पेशालिस्ट), गंगालाल यादव (माजी जिल्हा क्रीडा अधिकारी), राजेश्वर मारावार (जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड), श्री गुरुदिपसिंघ संधु (क्रीडा अधिकारी), किशोर पाठक (क्रीडा अधिकारी), प्रवीण कोंडेकर (क्रीडा अधिकारी), श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक थलेटिक्स), अनिल बंदेल (राज्य क्रीडा मार्गदर्शक टेबल-टेनिस), रमेश चवरे (व्यवस्थापक, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका,नांदेड), आनंद गायकवाड (वरिष्ठ लिपीक), प्रकाश खोकले, तालुका क्रीडा संयोजक, शरद देशमुख (क्रीडा शिक्षक), संजय चव्हाण आदी उपस्थित होते.
            सर्वप्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. या कार्यक्रमात सन 2018-19 या शैक्षणीक वर्षात नांदेड जिल्हयातील राज्यस्तर (प्रथम, द्वितीय तृतिय), राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त सहभाग झालेल्या खेळाडूंचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
क्रीडादिनानिमीत्त 28 29 ऑगस्ट 2019 या कालावधीत या कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय हॉकी, फुटबॉल, टेबल टेनिस, थलेटिक्स (50 मीटर 100 मी.धावने), बॅडमिंटन, बास्केटबॉल रोलर स्केटींग या सात खेळाच्या 14 वर्षाआतील मुले-मुली यांचे प्रदर्शनी सामन्याचे आयोजन करण्यात आले. या सामन्यात प्रथम द्वितीय क्रमांक संपादन केलेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचीन्ह, प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रस्तावीक गुरुदिपसिंघ संधु (क्रीडा अधिकारी) किशोर पाठक (क्रीडा अधिकारी) यांनी केले तर प्रवीण कोंडेकर (क्रीडा अधिकारी) यांनी आभार मानले.
या स्पर्धेकरीता पंच म्हणुन श्रीमती शिवकांता देशमुख (थलेटिक्स), अनिल बंदेल (टेबल टेनिस), पुरुषोत्तमसिंग मनियास, प्रतापसिंघ शहा, विजय मंगनुळकर (हॉकी), अथर कुरेशी, जफर कुरेश (फुटबॉल), महेश वाखरडकर (बॅडमिंटन), विष्णु शिंदे (बास्केटबॉल), इम्रान खान (रोलर स्केटींग) आदीनी काम पाहिले, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.
00000
बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना आवाहन
            नांदेड दि. 30 :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड या कार्यालयाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या सेवा संस्थांन आवाहन करण्यात आले आहे की, विक्रीकर सहआयुक्त (व्हॅट प्रशा) नांदेड यांच्या कार्यालयातील स्वच्छतेचे 8 हजार रुपये  प्रति महिना, कामाचा कालावधी 11 महिने असून हे काम 11 महिन्यासाठी कामवाटप समितीतर्फे बेरोजगारांच्या सेवा सोसायटीस देण्यासाठी मागणी  प्राप्त झाली आहे.
            ज्या सेवा सोसायटयांचे कार्यक्षेत्र नांदेड जिल्हयातील आहे अशा पात्र इच्छुक सेवा संस्थांनी बुधवार 11 सप्टेंबर 2019 पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.
00000
मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड, दि. 26 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 27 ऑगस्ट 2019 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 सप्टेंबर 2019 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
00000
प्रेसनोट
उच्च उत्पन्नांचा स्त्रेात म्हणुन राज्यात शेतकरी बांधव फळबाग लागवडीकडे मोठया प्रमाणावर वळत आहेत. तथापि सुरुवातीच्या 3-5 वर्षाच्या फळधारणापुर्व कालावधीत मोठया प्रमाणावर आर्थिक गुंतवणुक करावी लागत असुन जोपर्यंत फळधारणा होत नाही तोपर्यंत वाणाच्या गुणवत्तेबाबत काहीही सांगता येत नाही.
            राज्यात अनधिकृत रोपवाटिकांमधुन कृषि विदयापीठांनी शिफारसन केलेल्या सिताफळ वाणांची कलमे/रोपे उपलब्ध करुन दिलीजात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याबाबत अवास्तव स्वरुपाची प्रचार प्रसिद्धी करुन खरेदीची भुरळ घातली जात आहे. अशा कृषि विदयापीठांनी शिफारसन केलेल्या वाणांच्या गुणवत्तेबाबत साक्षंकता असल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागु शकते.
            या पार्श्वभुमीवर सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, सिताफळ तसेच इतर सर्व फळपिकाकरिता कृषि विदयापीठांनी शिफारस केलेल्या वाणांचाच वापर करावा. सदयस्थितीत बाजारात उपलब्ध असलेल्या ज्या फळपिक वाणाची कृषि विदयापीठांनी शिफारस केलेली नाही अशा वाणांचा शेतकरी बांधवानी वापर करु नये.

*-*-*-*-*-*

मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन
विभागात 343 मि.मी. पाऊस
अनेक जिल्ह्यांत दमदार पाऊस

औरंगाबाद,दि. 31 (विमाका) :- अनेक दिवसानंतर मागील चोवीस तासांत मराठवाड्यातील अनेक तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावून सुखद धक्का दिला. विभागातील सर्वच जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यातील काही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासांत औरंगाबाद जिल्ह्यात 22.70 मि.मी. पाऊस झाला. औरंगाबाद तालुक्यातील चिते पिंपळगाव मंडळ (80.00 मि.मी.) आणि वैजापूर तालुक्यातील गारज (80 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जालना जिल्ह्यात 32.59 मि.मी. पाऊस झाला आहे. जालना तालुक्यातील जालना (75 मि.मी.), पाचनवडगाव (70.00 मि.मी.), भोकरदन तालुक्यातील भोकरदन (77.00 मि.मी.), राजूर (79.00 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परभणी जिल्ह्यात 21.63 मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यातील झरी बु.(83.00 मि.मी.) मंडळात अतिवृष्टी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात 17.83 मि.मी. पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात 25.03 मि.मी. पाऊस झाला आहे. कंधार तालुक्यातील कुरूला (70.00 मि.मी.), उस्मान नगर (80 मि.मी.), फुलवण (80.00 मि.मी.), लोहा तालुक्यातील कलंबर (92.00 मि.मी.) आणि कापशी (79.00 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात 16.15 मि.मी. पाऊस झाला आहे. बीड तालुक्यातील पिंपळनेर (95 मि.मी.) मंडळात अतिवृष्टी झाली आहे. लातूर जिल्ह्यात 28.12 मि.मी. पाऊस झाला आहे. चाकुर तालुक्यातील शेळगाव (72.00 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 13.86 मि.मी. पाऊस झाला आहे. उमरगा तालुक्यातील नारगवाडी (77 मि.मी.) मंडळात अतिवृष्टी झाला आहे.
आज सकाळी मागील चोवीस तासात तालुकानिहाय पडलेला पाऊस, कंसातील आजपर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि.मी. स्वरुपात पुढीलप्रमाणे आहे. 
 जिल्हानिहाय  आजपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. औरंगाबाद- 360.22 मि.मी, जालना -317.48  मि.मी, परभणी -312.65 मि.मी, हिंगोली - 407.96 मि.मी, नांदेड 520.83 मि.मी, बीड 202.06 मि.मी. लातूर 334.29 मि.मी, आणि उस्मानाबाद 343.29 मि.मी.
आज सकाळी मागील चोवीस तासांतील पाऊस कंसात आजपर्यंत झालेला पाऊस याची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.

औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद 34.00 (307.90), फुलंब्री 30.25 (358.50), पैठण 35.00 (268.63), सिल्लोड 6.50 (475.69), सोयगाव 8.67 (536.33), वैजापूर 28.40 (319.00), गंगापूर 23.78 (288.00), कन्नड 27.00 (387.63), खुलताबाद 10.67 (300.33). जिल्ह्यात एकूण 360.22 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 40.00 (261.19), बदनापूर 45.20 (312.80), भोकरदन 37.38 (433.75), जाफ्राबाद 19.20 (332.80), परतूर 25.16 (312.42), मंठा 18.75 (292.00), अंबड 40.00 (316.57), घनसावंगी 35.00 (278.29), जिल्ह्यात एकूण 317.48 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 26.75 (282.31), पालम 5.67 (262.33), पूर्णा 34.80 (421.40), गंगाखेड 30.75 (318.00), सोनपेठ 30.00 (309.00), सेलू 15.20 (274.00), पाथरी 11.00 (283.33), जिंतूर 26.17 (305.83), मानवत 14.33 (357.67), जिल्ह्यात एकूण पावसाची नोंद 312.65 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली 16.86 (376.86), कळमनुरी 2.17 (489.08), सेनगाव 10.83 (368.83), वसमत 18.29 (302.29), औंढा नागनाथ 41.00 (502.75). जिल्ह्यात एकूण 407.96 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्हा- नांदेड 23.13 (528.75), मुदखेड 25.00 (562.00), अर्धापूर 25.00 (445.66), भोकर 2.75 (508.25), उमरी 20.67 (513.79), कंधार 60.83 (493.83), लोहा 54.50 (452.25), किनवट 7.43 (676.76), माहूर 13.00 (666.81), हदगाव 4.86 (466.56), हिमायत नगर 14.67 (570.99), देगलूर 25.00 (387.66), बिलोली 23.80 (554.40), धर्माबाद 34.67 (539.67), नायगाव 41.40 (517.20), मुखेड 23.71 (448.71), जिल्ह्यात एकूण 520.83 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा- बीड 18.91 (210.18), पाटोदा 1.75 (222.50), आष्टी 3.80 (179.14), गेवराई 27.70 (185.00), शिरुर कासार 20.33 (149.67), वडवणी 36.00 (222.50), अंबाजोगाई 16.40 (187.60), माजलगाव 19.17 (286.70), केज 1.57 (166.29), धारुर 11.67 (166.00), परळी 20.40 (247.11), जिल्ह्यात एकूण 202.06 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्हा- लातूर 13.25 (216.25), औसा 17.86 (233.57), रेणापूर 22.50 (283.75), उदगीर 31.86 (326.00), अहमदपूर 47.67 (469.83), चाकुर 49.80 (320.60), जळकोट 20.50 (447.50), निलंगा 31.75 (375.88), देवणी 28.67 (361.50), शिरुर अनंतपाळ 17.33 (308.00), जिल्ह्यात एकूण 334.29 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद 5.75 (282.25), तुळजापूर 17.57 (382.29), उमरगा 32.00 (382.80), लोहारा 54.00 (427.33), कळंब 1.33 (216.67), भूम 0.20 (241.50), वाशी 0.00 (253.00), परंडा 0.00 (141.00), जिल्ह्यात एकूण 290.85 मि.मी. पाऊस झाला आहे.
******


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...