Thursday, June 13, 2019

‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान’ पंधरवडा : 19 लाख शेतकऱ्यांचा सहभाग



मुंबई, दि. 13 : राज्यात ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान पंधरवडा’ नुकताच राबविण्यात आला. त्यात 36 हजार मेळावे घेण्यात आले असून सुमारे 19 लाख शेतकऱ्यांनी त्यात सहभाग नोंदविला. यावेळी शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांविषयक मार्गदर्शन करण्यात आले. राज्यात 12 हजार शेती शाळांचे आयोजन केले जात असून त्या माध्यमातून 3 लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
दि. 25 मे ते 8 जून या काळात हा पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीत अधिक सुटसुटीतपणा आणि सुसूत्रता आणण्याकरिता उन्नत शेती समृद्ध शेतकरी पंधरवडा राबविला जातो. त्या माध्यमातून अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातात.
जमीन आरोग्यपत्रिका, बियाणे-खते खरेदी करताना घ्यायची काळजी, बीज प्रक्रिया, भाऊसाहेब फुंडकर व रोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजना, ठिबक व तुषार सिंचन इत्यादी अनेक योजनांबद्दल कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या पंधरवड्यात राज्यभरात 36 हजार मेळावे आयोजित करण्यात आले.
कृषी विभागाच्या उत्पादन व उत्पादकता वाढीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्याकरिता शेतीशाळा संकल्पनेवर भर देण्यात येत आहे. त्याअंतर्गत राज्यात 12 हजार शेतीशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये भात, कापूस, सोयाबीन, मका, तूर, ज्वारी, ऊस व हरभरा या पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार शेतीशाळा आयोजित केल्या जाणार असून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती त्याद्वारे देण्यात येणार आहे, असे विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.
००००

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...