Wednesday, August 15, 2018

"युवा माहिती दूत" उपक्रमातून   
शासनाच्या विविध योजना दुर्गम भागातील
लाभार्थ्यांपर्यंत पोहचविल्या जाणार   
- पालकमंत्री रामदास कदम  
           
नांदेड, दि. 15 :- "युवा माहिती दूत" हा राज्य शासनाचा एक अत्यंत महत्वाचा उपक्रम असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध महत्वपूर्ण 50 शासकीय योजना दुर्गम भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविल्या जाणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.  
शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच युनिसेफच्या सहकार्याने "युवा माहिती दूत" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पालकमंत्री श्री. कदम यांच्या हस्ते "युवा माहिती दूत" बोधचिन्हाचे अनावरण करुन या उपक्रमाचा नांदेड जिल्ह्यातील शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.    
यावेळी आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, पोलीस अधीक्षक संजय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. शैला सारंग, धोंडू पाटील, भुजंग पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.   
पालकमंत्री श्री. कदम म्हणाले, "युवा माहिती दूत" या उपक्रमातून महाविद्यालय विद्यार्थ्यांनी जनसंपर्क साधून शासकीय योजनांची माहिती दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम केले पाहिजे. प्रत्येक गावात ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक डॉक्टर, कृषि अधिकारी असले तरी या उपक्रमातून शासन लाखो लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून त्यांना विविध योजनांची माहिती देईल व योजनांच्या अंमलबजावणीबाबत लाभार्थ्यांची मतेही जाणून घेतली जाणार आहेत. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी आपले शिक्षणासोबत या उपक्रमात योगदान द्यावे. वंचित लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधावा. यातूनही राज्यात चांगले काम होऊ शकेल. येत्या काळात विविध विभागात 72 हजार पदांसाठी भरती होणार आहे. तसेच विविध विभागाने शासकीय योजनांची माहिती बेरोजगारांना दिली तर याद्वारे अनेकांना दिलासा मिळेल, असे सांगून त्यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.  
प्रास्ताविकात उच्च शिक्षण विभागाचे वरिष्ठ लेखाधिकारी निळकंठ पाचंगे यांनी महाविद्यालयातील युवकांमार्फत "युवा माहिती दूत" उपक्रम राबविला जात असून किमान एक लाख युवक राज्य शासनाच्या किमान 50 योजनांच्या माहितीशी जोडले जाणार आहे. या युवकामार्फत किमान 50 लाख प्रस्तावित लाभार्थ्यांशी म्हणजेच 2 ते 2.50 कोटी व्यक्तीशी शासन जोडले जाईल, असे सांगितले.
सुरुवातीला "युवा माहिती दूत" उपक्रमाच्या माहितीवर आधारीत चित्रफीत दाखविण्यात आली. सुत्रसंचलन डॉ. अशोक सिद्धेवाड यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजन कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. डी. डी. पवार यांनी मानले.
यावेळी सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. यू. गवई, प्राचार्य श्री. चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी, जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी विवेक डावरे, अलका पाटील, के. आर. आरेवार, महमंद युसूफ, अंगली बालनरस्या, तसेच उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील दिपक देशपांडे, सुभाष धोंडगे आदींची उपस्थिती होती.   
000000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...