Tuesday, July 17, 2018

मतदार यादी शुध्‍दीकरण कामास वेग,
लोहा तालुक्‍यात 19 रोजी चावडी वाचन

      भारत निवडणूक आयेागाने निर्धारीत केलेल्‍या कार्यक्रमांतर्गत लोहा तालुक्‍यात मतदार यादीचे शुध्‍दीकरण व पुनरिक्षण कार्यक्रम कामास वेग आला असून मतदार यादी शुध्‍दीकरणाचे काम प्रभावीपणे होण्‍यासाठी लोहा तालुक्‍यात दिनांक 19 जुलै रोजी गावपातळीवर चावडी वाचनाचा अभिनव उपक्रम राबविण्‍यात येत आहे. अशी माहिती लोहयाचे तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी प्रसिध्‍दी पत्रकाव्‍दारे दिली आहे.
        भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्‍या कार्यक्रमान्‍वये मतदार यादीचे शुध्‍दीकरण व पुनरिक्षणाचे काम जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्‍हाधिकारी निवडणूक दिलीप कच्‍छवे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच कंधारचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांच्‍या नियोजनात करण्‍यात येत आहे. लोहा तालुक्‍यातील नियुक्‍त 211 बिएलओ यांनी मतदारांच्‍या घरोघरी भेटी देवून दुबार, मयत, कायमस्‍वरुपी स्‍थलांतरीत मतदारांची माहिती गोळा करण्‍यात आलेली आहे. सदरील काम अधिक प्रभावीपणे होण्‍यासाठी लोहा तालुक्‍यात दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 9 वाजता  गावपातळीवर चावडी वाचनाचा अभिनव उपक्रम तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी राबविला आहे. सदर चावडी वाचनाच्‍यावेळी संबंधीत गावचे ग्रामसेवक, तलाठी यांनी उपस्थित रहावे, असे निर्देश देण्‍यात आलेले आहेत.
      दरम्‍यान, मतदार यादीत एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नाव आढळून आल्‍यास लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम 1950 व 1951 अन्‍वये संबंधीत मतदारावर फौजदारी गुन्‍हा दाखल होवून 6 महिण्‍याच्‍या कारावासाची तरतूद आहे. त्‍याअनुषंगाने मतदार यादीमध्‍ये एकसारखी नावे असलेली/एकसारखे फोटो असलेली अशा एकूण 6701 दुबार नावे असलेल्‍या मतदारांना भारत निवडणूक आयोगाकडून नोटीसा बजावण्‍यात आलेल्‍या आहेत. त्‍यांची सुनावणी 28 जून व 11 जुलै 2018  रेाजी घेण्‍यात आली तसेच, पुढील सुनावणी 20 जुलै रोजी तहसिल कार्यालय लोहा येथे घेण्‍यात येणार आहे.
      लोहा तालुक्‍यातील सुजान मतदारांनी त्‍यांचे नाव मतदार यादीत एकाच ठिकाणी असल्‍याची खात्री करावी. दुबार, मयत, कायमस्‍वरुपी स्‍थलांतरीत मतदारांची नावे वगळण्‍यासाठी बिएलओ यांना सहकार्य करुन, मतदार यादीचे शुध्‍दीकरण व पुनरिक्षण कार्यक्रम यशस्‍वी करावा, असे आवाहन तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी केले आहे.
      सदर कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार एस.एम देवराये, अव्‍वल कारकून पी.पी. बडवणे, प्रशांत आपशेटे, लिपीक एन.एम.सोनकांबळे, सुर्यकांत पांचाळ, विजय मुंडे आदि परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...