Friday, June 22, 2018


पिक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांना
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या नोटीस
खुलासा सादर न केल्यास एकतर्फी कार्यवाही  
नांदेड, दि. 22 :- सन 2018-19 खरीप पिक कर्ज वाटप उद्दिष्टाबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील बॅंक ऑफ इंडिया, इंडियन ओव्‍हरसिस बॅंक, ओरियंटल बॅंक ऑफ कॉमर्स या बँकांच्या जिल्हा समन्वयकांना भारतीय रिर्जव्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार गुरुवारी (21 जून) रोजी कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत. मुदतीत खुलासा सादर न केल्‍यास एकतर्फी कार्यवाही करण्‍यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कारणे दाखवा नोटीसमध्ये म्हटले आहे की, जिल्‍हा समन्‍वयक बॅंक ऑफ इंडिया नांदेड यांना खरीप पिक कर्जाचे 77.36 कोटी रुपयाचे उद्दीष्‍ट देण्‍यात आले असून उद्दिष्‍टपूर्ती 1.33 कोटी रुपये झाले आहे. जिल्‍हा समन्‍वयक, इंडियन ओव्‍हरसिस बॅंक, नांदेड यांना खरीप पिक कर्जाचे 6.30 कोटी रुपयाचे उद्दिष्‍ट देण्‍यात आले असून उदिष्‍टपूर्ती 0.34 कोटी रुपये झाले आहे. जिल्‍हा समन्‍वयक, ओरियंटल बॅंक ऑफ कॉमर्स नांदेड यांना खरीप पिक कर्जाचे 8.27 कोटी रुपयाचे उदिष्‍ट देण्‍यात आले असून उदिष्‍टपूर्ती केली नाही. यावरुन पिक कर्ज वाटप हे संथगतीने होत असून आपले उद्दिष्‍टपूर्तीबाबत गांभीर्य दिसून येत नाही. याचगतीने बँकेने काम केल्‍यास उदिष्‍टपूर्ती करणे असाध्‍य दिसून येते. आपल्‍या या उदासिन धोरणांमुळे कास्‍तकार / शेतक-यांचे नुकसान होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. ही बाब गंभीर असून शासन शेतक-यांप्रती कर्ज उपलब्‍ध करुन देण्यास कटिबध्‍द असतांना बॅंकेकडूनही तसा प्रतिसाद मिळणे आवश्‍यक आहे.
बँकांना वारंवार सूचना व आदेश देऊनही उदिष्‍टपुर्ती न करणे ही बाब भारतीय रिर्जव्‍ह बॅंकेने दि. 3 जुलै 2017 रोजी दिलेल्‍या मार्गदर्शक सूचनांचे उल्‍लघंन करणारी आहे. त्‍यामुळे आपले विरुध्‍द विभागीय चौकशी तथा भारतीय दंड संहिता कलम 187 अन्‍वये फौजदारी स्‍वरुपाची कार्यवाही का करण्‍यात येऊ नये याबाबतचा खुलासा ही नोटिस मिळाल्‍या पासून दोन दिवसांचे आत जिल्हाधिकारी नांदेड यांचे समक्ष सादर करावे. विहीत मुदतीत खुलासा सादर न केल्‍यास याबाबत आपले काहीही म्‍हणणे नाही असे गृहित धरुन एकतर्फी कार्यवाही करण्‍यात येईल, असेही कारणे दाखवा नोटीसमध्ये नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...