प्लास्टीकपासून बनविलेल्या पिशव्या, अन्य वस्तुंच्या
उत्पादन, साठवणूक, विक्रीस निर्बंध होणार
विल्हेवाटीसाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी
नांदेड, दि. 20
:- प्लास्टीकपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या तसेच
प्लास्टीक / थर्माकॉलपासून बनविल्या जाणाऱ्या अन्य वस्तुंच्या उत्पादन, वापर,
साठवणूक, वितरण, विक्री करण्यास पर्यावरण विभागाकडून निर्बंध (बंदी) घालण्याचे
प्रयोजन आहे. त्यानुसार संबंधितांनी सर्व प्रकारचे प्लास्टीक वेष्टन इत्यादींवर
निर्बंधाच्या परिणामस्वरुप त्याची विल्हेवाट लावण्याबाबत पूर्व खबरादारी घ्यावी,
असे आवाहन राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने केले आहे.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 48 अ मध्ये विनिर्दिष्ट केल्यानुसार राज्य हे
पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे नमुद आहे. त्यानुसार
महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायदा 2006 मधील अधिकाराचा वापर
करुन, राज्य शासनाने 3 मार्च 2006 रोजी प्लास्टीकच्या पिशव्यांचे (कॅरी बॅग्ज)
उत्पादन व वापर याकरीता 2006 साली नियमांची तरतूद केली आहे. या नियमानुसार कॅरी
बॅग 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या व 8 इंच बाय 12 इंच आकारापेक्षा कमी असलेल्या
बॅगांचे उत्पादन, विक्री किंवा वितरण करण्यास बंदी आहे. या अधिनियमाच्या तरतुदींची
अंमलबजावणी विविध पातळीवर प्रयत्न करुन देखील परिणामकारक फलनिष्पती झाल्याचे दिसून
येत नाही. परिणामस्वरुप प्लास्टीक पिशव्या व प्लास्टीकची इतर उत्पादने ही नैसर्गिकदृष्ट्या
/ जैविकदृष्ट्या विघटनशील नसल्याने त्यांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून अनेकविध
पर्यावरणीय समस्या उदभवलेल्या आहेत आणि एकूणच पर्यावरणावर तसेच जैवविविधतेवर
अनिष्ट परिणाम होत आहेत. विशेषत: प्लास्टीक पिशव्यांमुळे जलनि:स्सारणास अवरोध
निर्माण होतो व पाणी तुंबून अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. जनावरांकडून
उघड्यावर टाकलेल्या प्लास्टीक पिशव्या पोटात जात असल्याने अनेक जनावरांचा मृत्यू
झाल्याच्या घटना घडतात. प्लास्टीक पिशव्यांच्या व वस्तुंच्या वापरामुळे विविध
सागरी जिवांना धोका निर्माण झाला आहे.
त्याअर्थी, संपूर्ण राज्यामध्ये प्लास्टीक पासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या
तसेच प्लास्टिक, थर्माकॉलपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तु जसे ताट, कप्स, प्लेटस,
ग्लास, काटे, वाटी, चमचे, फ्लेक्स, नॉन वोवन पॉलिप्रॉपीलेन बॅग्स, बॅनर्स, तोरण,
ध्वज, प्लास्टीक शिटस, सर्व प्रकारचे प्लास्टीक वेष्टन इत्यादीच्या उत्पादन, वापर,
साठवणूक, वितरण, विक्री करण्यास लवकरच राज्यात निर्बंध बंदी घाल्याचे प्रयोजन आहे.
यामध्ये किरकोळ विक्रीसाठी अन्य वस्तुंच्या पॅकेजींगसाठी वापरण्यात येणाऱ्या
प्लास्टीक व प्लास्टीक सीटचा समावेश आहे.
सर्व संबंधितांनी प्लास्टीक पासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या तसेच प्लास्टिक,
थर्माकॉलपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तु जसे ताट, कप्स, प्लेटस, ग्लास, काटे,
वाटी, चमचे, फ्लेक्स, नॉन वोवन पॉलिप्रॉपीलेन बॅग्स, बॅनर्स, तोरण, ध्वज,
प्लास्टीक शिटस, सर्व प्रकारचे प्लास्टीक वेष्टन इत्यादींवर निर्बंधाच्या
परिणामस्वरुप त्याची विल्हेवाट लावण्याबाबत पूर्व खबरादारी घ्यावी, असे आवाहन सर्व
संबंधितांना व जनतेस करण्यात आले आहे.
संबंधीत नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी
यांनी याबाबत त्यांच्या क्षेत्रात जनजागृती करावी. तसेच अंमलबजावणीमध्ये जनतेचा व
सेवाभावी संस्थांचा जास्तीतजास्त सहभाग करुन घेण्यात यावा. मॉल्स, दुकानदार, मोठे
व्यापारी, भाजीपाला विक्रेते, हॉटेल आदी व्यवसायिकांना, उत्पादकांना या बाबींची
नोंद घेऊन प्रस्तावित नियमांच्या अंमलबजावणीत जास्तीतजास्त सहकार्य देण्याचे आवाहन
करण्यात आले आहे. तसेच संबंधीत स्थानिक प्राधिकरणे व दुकाने, आस्थापना, मॉल्स
यांना परवाने देणाऱ्या प्राधिकरणांनी किंवा निरिक्षकांनी अशा आस्थापनांचे परवाने
नुतनीकरणाच्यावेळी वरील बाबी वापरण्यास, विक्रीस, साठा करण्यास मज्जाव करण्याबाबत
अट घालण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. अशीही माहिती पर्यावरण विभागाचे
अतिरिक्त मुख्य सचिव सतिश गवई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
000000
No comments:
Post a Comment