Monday, November 13, 2017

भविष्यात पाणी टंचाई भासणार नाही
यासाठी पाणी आरक्षणाचे नियोजन करावे  
- पालकमंत्री अर्जुन खोतकर
नांदेड, दि. 13 :- जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाई भासणार नाही यासाठी आवश्यक त्या ठिकाणी जलाशयातील पाणी आरक्षणाबाबत योग्य नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील पाणी आरक्षणाबाबत बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन श्री. खोतकर बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे बैठक संपन्न झाली.
यावेळी आमदार हेमंत पाटील, आमदार प्रदिप नाईक, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, मनपा आयुक्त गणेश देशमुख, उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्ह्यातील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. खोतकर म्हणाले की, जिल्ह्यात पाणी टंचाई काळात पिण्याच्या पाण्यासाठी प्रथम प्राधान्य देऊन आवश्यक त्या ठिकाणी पाणी आरक्षण करण्यात यावे. जायकवाडी पुर्ण क्षमतेने भरुन आहे. मनपाने नांदेड शहराच्या पाण्यासाठी जायकवाडी प्रकल्पातील पाणी आरक्षण मागणीचा प्रस्ताव सादर करावा. जिल्ह्यातील गेल्या वर्षीच्या पाणी टंचाई परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावेळी केलेल्या उपाययोजनांचीही माहिती श्री. खोतकर यांनी घेतली.  
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नांदेड जिल्ह्यातील पर्जन्यमान, जलाशयातील उपलब्ध पाणीसाठा, जलाशयातील पाणी आरक्षण, पाणीटंचाई याबाबत संभाव्य उपाययोजनेची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
0000000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...