Monday, October 2, 2017

स्वच्छतेबाबत जागरुक राहणे गरजेचे
- सहायक महाप्रबंधक राजेंद्र पत्की
          
नांदेड, दि. 2 :- सोबतच्या परिसराबरोबर वैयक्तिक स्वच्छता राखणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून त्यासाठी स्वच्छतेबाबत जागरुक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भारतीय स्टेट बँकेचे सहायक महाप्रबंधक राजेंद्र पत्की यांनी केले.
            राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवाजीनगर औद्योगिक वसाहत परिसरातील भारतीय स्टेट बॅक क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयाच्यावतीने स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी नांदेड शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर, मुख्य प्रबंधक जळबा कांबळे, प्रमोद त्रिपाठी, गिरीराज जोशी, आर. आर. लेमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  
 सहायक महाप्रबंधक श्री. पत्की म्हणाले, चांगले आरोग्यातून सुदृढ पिढी निर्माण करण्यासाठी स्वच्छतेची गरज आहे. स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन भारतीय स्टेट बँकेच्या सर्व शाखेत स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून स्वच्छतेबाबत काळजी घेतली पाहिजे.   
पोलीस उपअधीक्षक श्री. नांदेडकर म्हणाले, स्वच्छता अभियानात भाग घेणारी नांदेड भारतीय स्टेट बँक अग्रस्थानी आहे. या उपक्रमाबद्दल भारतीय स्टेट बँकेचे त्यांनी कौतुक केले. प्रास्ताविकात बँक अधिकारी माधव चुकेवाड यांनी प्रत्येकांनी स्वच्छता राखली पाहिजे याबाबत स्वच्छतेचे महत्व विशद केले.  
सुरुवातीला भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय ते महत्मा फुले पुतळा परिसर व डॉक्टर लेन ते पोलीस अधीक्षक कार्यालय पर्यंतचा परिसर स्वच्छ करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वच्छता कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  
यावेळी प्रबंधक बालाजी बास्टेवाड, उपप्रबंधक प्रवीण सोनवणे, शाखा अधिकारी मंदीप सिंघ, रणवीरकर, सुनिल पटवर्धन, जसबीर सींघ टुटेजा, सहायक श्रीमती विजय लक्ष्मी अय्यर, भारतीय स्टेट बँकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...