Friday, August 4, 2017

रेल्वे भूसंपादन : महसूल राज्यमंत्री संजय राठोड घेणार सुनावणी
* वर्धा-यवतमाळ-नांदेड प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी जाणून घेणार
* 25 ऑगस्टपर्यंत मागविल्या तक्रारी व आक्षेप
यवतमाळ, दि. 4 :-  वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाकरीता या तिन्ही जिल्ह्यात संपादित करण्यात आलेल्या जमिनीसंदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सामूहिकरितीने सोडविण्यासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासंदर्भात लवकरच सुनावणी घेणार आहेत.
सन 2009 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेमार्गाचे भूमिपूजन यवतमाळात झाले होते. त्यानंतर या रेल्वेमार्गासाठी या तिन्ही जिल्ह्यात भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. सध्या हे काम  प्रगतीपथावर असून अनेक गावांमधील नागरिकांनी रेल्वे भूसंपादनासंदर्भात होत असलेल्या अनियमिततेबाबत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी ना. संजय राठोड, भूसंपादन विभागाचे सचिव यांच्या उपस्थितीत यवतमाळ येथे सुनावणी होणार आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या अडचणी, तक्रारी, आक्षेप येत्या 25 ऑगस्टपर्यंत ना. संजय राठोड यांचे जनसंपर्क कार्यालय, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, गोदणी रोड यवतमाळ येथे पाठवाव्या. तक्रार अर्ज, सोबत सर्व कागदपत्रं, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी सर्व माहिती अर्जासोबत दोन प्रतित जोडून प्रत्यक्ष, पोस्टाने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0000000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...