Monday, June 26, 2017

महान व्यक्तींच्या आचार-विचारांचे  
अनुकरण केले पाहिजे - अप्पर जिल्हाधिकारी पाटील
नांदेड दि. 26 :- छत्रपती शाहू महाराजांचे कार्य त्यांच्या राजर्षी पदवीला न्याय देणारे असून त्यांच्या जयंती निमित्त प्रत्येकांनी महान व्यक्तींच्या आचार-विचारांचे अनुकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 143 व्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनुराधा ढालकरी, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, नायब तहसिलदार एन. बी. बोलोलु यांची प्रमुख उपस्थिती होती.
अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांनी स्वत:च्या कृतीतून समाजातील शेवटच्या व्यक्तीला चांगला संदेश देण्याचे कार्य केले आहे. योग्य न्याय करण्याची भुमिकाही त्यांची होती. कृषि विकासासाठी अशिया खंडातील सर्वात मोठे राधानगरी धरण त्यांनी उभारले आहे. स्वत:च्या कार्यकाळत त्यांनी विविध क्षेत्रात भरीव कार्य केले असून त्यांना रयतेचा राजा म्हणून ओळखले जाते, असेही त्यांनी सांगितले.  
जिल्हाधिकारी कार्यालयातील सौ. स्वाती आलोले यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातून समाजाला चांगली दिशा देण्याचे कार्य होऊ शकते, असे सांगितले.
प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी केले तर आभार उपजिल्हाधिकारी (सामान्य)  सौ. ढालकरी यांनी मानले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...