वृ.वि.5560 28 वैशाख, 1939 (सायं.6.15 वा.) दि. 18 मे, 2017
एबीसीची मोहोर
लोकराज्य मराठीतील सर्वाधिक खपाचे मासिक
पुन्हा एकदा सिद्ध
मुंबई दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित 'लोकराज्य' हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे मासिक ठरले आहे. ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन (एबीसी) ने नुकताच जुलै ते डिसेंबर 2016 चा देशातील सर्व वृत्तपत्रे / नियतकालिके यांच्या अधिकृत खपाचा अहवाल प्रकाशित केला असून यात ही बाब नमूद करण्यात आली आहे. एबीसीच्या यादीत देशातील एकमेव शासकीय नियतकालिक आणि एकमेव मराठी मासिक हा मानही लोकराज्यने पटकाविला आहे. जुलै ते डिसेंबर 2016 या कालावधीत लोकराज्यचा खप 4 लाख 3 हजार 164 प्रती असा आहे.
महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे स्थान प्राप्त करतानाच 'लोकराज्य' ने देशातील सर्वाधिक खपाच्या मासिकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे. पहिल्या क्रमांकावर मल्याळम भाषेतील 'वनिथा' हे मासिक असून त्याचा खप 5 लाख 58 हजार 978 प्रती आहे. तिसऱ्या क्रमांकावर 'मल्याळम मनोरमा' हे मासिक असून त्याचा खप 3 लाख 44 हजार 573 प्रती आहेत.
'लोकराज्य' मासिकाने सातत्याने आपला पहिला क्रमांक कायम ठेवला असून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जाणारे हे एकमेव मासिक आहे. शासनाची अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहिती तसेच निर्णय, धोरणे, योजना,यशकथा, मुलाखती यांचा समावेश या मासिकात करण्यात येतो. तरुण वाचकांमध्ये या मासिकाची लोकप्रियता असून विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या स्पर्धकांना हे मासिक अतिशय उपयुक्त ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. या मासिकाचे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांनी लोकराज्यचा खप पुढील काळात आणखी वाढवून देशात पहिला क्रमांकाचे नियतकालिक करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मराठी सोबतच आता लोकराज्य उर्दू, गुजराती, हिंदी भाषेतही प्रकाशित केले जाते. त्याचबरोबर 'महाराष्ट्र अहेड' हे इंग्रजी भाषेत प्रकाशित केले जाते.
००००
No comments:
Post a Comment