Thursday, May 18, 2017

संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी
सतर्कता, समन्वय, तत्परतेने प्रयत्न करावेत
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 18 :-  आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रणासाठी संघटीत आणि वेळेत प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी अधिक सतर्कता, समन्वय व तत्परतेने प्रयत्न करावेत, अशा सूचना नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे दिल्या.  
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात मान्सून 2017 पूर्व तयारी आढावा बैठक श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महानगरपालिका, पोलीस, आरोग्य आदी विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनात तातडीने माहिती उपलब्ध होणे आणि त्यावर लगेच कार्यवाही करणे अपेक्षित असते. त्यासाठी संपर्क व दळणवळणाच्या अनुषंगाने सशक्त यंत्रणा कार्यान्वीत करावी. पुरेशा मनुष्यबळ व साधनसामग्री सज्ज ठेवावी. आपत्ती काळात वित्त व जिवीत हानी टाळता आली पाहिजे. यासाठी तालुका व गावस्तरावर सर्वंकष कृती आराखडे तयार करावीत. हे कृती आराखडे तयार करताना मागील घटनांचा अभ्यास करावा. सामाजिक बदलाचे प्रतिबिंबाबरोबर आपत्तीच्या अनुषंगिक इतर घटनांचा विचार करुन हे आराखडे सर्व विभागाने वेळेत करावेत. प्रशिक्षीत व्यक्तींच्या नावांची यादी तयार करावी. नियंत्रण कक्ष स्थापन करावेत,  असे निर्देश त्यांनी दिले.
येत्या मान्सुनच्यादृष्टीने नाले सफाई दुरुस्तीवर भर देण्यात यावा. धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करावे, धोकादायक पुलावरील वाहतूक बंद करावी. नदी, नाले, खोल पातळीचे डोह निर्माण झाले आहे अशा ठिकाणी धोक्याच्या इशाऱ्याचे फलक लावावेत. जिल्ह्यात पाऊस झाल्याने परिस्थिती निर्माण होते असे नाही तरी वरील भागात अतिवृष्टी झाल्याने तेथील धरणातून पाणी सोडल्याने जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होते. याचा विचार करुन योग्य नियोजन व सतर्कता बाळगली पाहिजे असेही श्री. डोंगरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख, विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र. 2 चे कार्यकारी अभियंता डी. के. शेटे यांनी ही जिल्ह्यातील आपत्तकालीन परिस्थिती नियंत्रणासंबंधी माहिती देवून करावयाच्या उपाययोजना संबंधी माहिती दिली.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाबाबत व केल्या जाणाऱ्या उपाययोजना संबंधी सादरीकरणातून माहिती देतांना नियंत्रण कक्ष स्थापन करुन 24 तास कार्यांन्वीत राहणार आहेत, असे सांगितले. संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनासंबंधी केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...