Friday, March 24, 2017

डिजीटल प्रदान प्रणालीमुळे आर्थिक विकासाला
चालना मिळेल - पालकमंत्री खोतकर
नांदेडमध्ये डिजीधन मेळावा संपन्न
नांदेड दि. 24 :- डिजीटल प्रदान अर्थात डिजीटल पेमेंट प्रणालीमुळे राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. यासाठीच्या प्रयत्नात नांदेड जिल्हा सदैव पुढेच राहील, असा विश्वास  राज्याचे वस्त्रोद्योग, पशूसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी आज येथे व्यक्त केला. केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या डिजीटल प्रदान मोहिमेतर्गत आयोजित डिजीधन मेळाव्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परीषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, आमदार हेमंत पाटील, निती आयोगाच्या डिजीटल पेमेंट विभागाच्या संचालक श्रीमती मेरी बार्ला, राज्याच्या माहिती तंत्रज्ज्ञान विभागाचे अतिरिक्त आयुक्त पुण्यव्रत घटक, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील आदींची  प्रमुख उपस्थिती होती.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यास आणि त्यानिमित्त आयोजित प्रदर्शनातील दालनाला भेट देण्यासाठी दिवसभर या परिसरात मोठी गर्दी झाली. विद्यार्थी, तरूण, शेतकरी, व्यावसायीक, उद्योजक अशा विविध घटकांनी डिजीधन मेळाव्यास भेट दिल्या. नेटके आणि देखण्या स्वरुपात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यासाठी हा परिसर सुशोभितही करण्यात आला.
मेळाव्यातील मुख्य कार्यक्रमात पालकमंत्री श्री. खोतकर म्हणाले की, विकासाच्या वाटेवर वाटचाल करणारा आणि नाविन्यपुर्ण उपक्रम यशस्वी करणारा जिल्हा म्हणून नांदेड जिल्ह्याची ओळख आहे. नांदेड जिल्ह्याला प्राचीन आणि ऐतिहासीक अशी वैभवशाली परंपरा आहे. अलिकडच्या काळात शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातही नांदेडने आपली ओळख निर्माण केली आहे. कृषी आणि कृषी उद्योगावरच नांदेडची आर्थिक भिस्त आहे.  हे यूग माहिती तंत्रज्ज्ञानाचे आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाने ई-गव्हर्नन्सद्वारे लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण प्रस्थापित केले आहे. तंत्रज्ज्ञानाचा आणि आधुनिकीकरणाचा सामान्य नागरिकांना लाभ व्हावा यासाठीच रोकडरहित आणि कॅशलेस व्यवहारांचा आग्रह केला जात आहे. डिजीधन मेळाव्यातून प्रेरणा घेऊन नांदेड जिल्हा मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांसाठी मार्गदर्शकाची भुमिका बजावेल असा विश्वास आहे. यावेळी श्री. खोतकर यांनी नांदेड पुरवठा विभागाच्या ई-पीडीएमएस उपक्रमाचाही गौरवपुर्ण उल्लेख करतानाच, डिजीधन मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी आणि प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदनही केले.
आमदार हेमंत पाटील यांनी नांदेडला डिजीधन मेळाव्याच्या आयोजनाची संधी मिळाल्याची बाब गौरवपुर्ण असल्याचा उल्लेख केला. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्यानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशांचेही वाचन केले.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी रोकडरहित व्यवहार ही लोकचळवळ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच या  डिजीधन मेळाव्यात बँकीग, तसेच शासकीय-निमशासकीय आणि विविध व्यावसायीक घटकांनी हिरीरीने सहभाग नोंदविल्याचे समाधानही व्यक्त केले. तसेच कॅशलेस व्यवहारांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरापर्यंत नियोजन केल्याचेही नमूद केले.
कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. डिजीटल प्रदानाबाबतच्या निती आयोगाची चित्रफितही प्रदर्शीत करण्यात आली. राष्ट्रीय जलतरणपटू पारस यादव याच्या हस्ते डिजीटल पद्धतीने प्रत्यक्ष खरेदीचा व्यवहारही करण्यात आला. नांदेड जिल्ह्याच्या संकेतस्थळासह, आठ उपविभाग आणि तहसिल कार्यालयांच्या संकेतस्थळांचे प्रकाशनही डिजीटल पद्धतीने पालकमंत्री श्री. खोतकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नांदेड वाघाळा महापालिकेच्या वैशिष्ट्यपुर्ण अशा नांदेड- एमसी या ॲपचेही पालकमंत्री खोतकर यांनी अवतरण (लाँचींग) केले.
नॅशनल पेमेंट कार्पोरेशनचे महेंद्र जोशी यांनी नांदेडमधील हा मेळावा देशभरातील 85 वा मेळावा असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रीय स्तरावरील भाग्यवान विजेत्यांची सोडत (लकी ड्रॅा) ही काढला. यामध्ये दैनंदिन लकी ग्राहक सोडत, साप्ताहीक लकी ग्राहक सोडत, तसेच डिजीधन व्यापारी सोडत योजना अशा तीन प्रकारात सोडत काढण्यात आल्या. ज्याद्वारे पहिल्या सोडतीत पंधरा हजार, दुसऱ्या सोडतीत 7 हजार 229 ग्राहक आणि तिसऱ्या सोडतीत सात हजार व्यापारी आस्थापना असे विजेते निवडण्यात आले.
मेळाव्याच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या घोषवाक्य स्पर्धेतील विजेते अनुक्रमे प्रथम क्रमांक - रेणुका तांबोळी, व्दितीय - आम्रपाली भोसले आणि तृतीय क्रमांक - व्यंकटेश काटकर यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.  तसेच दिवसभरातील प्रदर्शनातून उत्कृष्ट दालन म्हणून अनुक्रमे प्रथम क्रमांक- एअरटेल पेमेंट बँक, द्वितीय - पेटीएम, तृतीय क्रमांक जिल्हा पुरवठा विभाग तसेच उत्तेजनार्थमध्ये सीएमएस आणि जीओ यांच्या दालनांनाही सन्मानित करण्यात आले. जिल्ह्याच्या संकेतस्थळाच्या निर्मितीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी सुनिल पोटेकर, तहसिलदार डॉ. अरविंद नरसीकर यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले. शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी आभार मानले. कार्यक्रमास डिजीधन मेळाव्यात सहभागी विविध बँका, कंपन्या, व्यावसायीक आदींचे प्रतिनिधी तसेच अधिकारी, कर्मचारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमापुर्वी पालकमंत्री श्री. खोतकर यांनी डिजीधन मेळाव्यातील विविध दालनांना भेट देऊन पाहणी केली. दालनातील संयोजकांच्यावतीने डिजीटल प्रदान तसेच त्यातील विविध उत्पादने, व्यवहार याबाबत माहिती देण्यात आली. त्यांच्या समवेत आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी काकाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी शिनगारे, आयुक्त उन्हाळे आदींनीही दालनांना भेट दिली.
तत्पुर्वी सकाळच्या सत्रात मेळाव्यात सहभागी विविध घटकांच्या दालनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, एनआयसीचे जिल्हा माहिती अधिकारी सुनिल पोटेकर आदींची उपस्थिती होती. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी काकाणी यांनी प्रदर्शनातील सर्वच दालनांना भेट देऊन, तेथील डिजीटल व्यवहार, विविध प्रकारची उत्पादने, उपक्रम आदींची माहिती घेतली.  दिवसभरात विद्यार्थी, तरूण, शेतकरी, व्यापारी, व्यावसायीक आदींनी दालनांना भेट देऊन माहिती घेतली. प्रदर्शनातील दिवसभराच्या घडामोडींबाबत नियंत्रण कक्षातून राजेश कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले.
 मेळाव्यात बँका, आधार क्रमांकाशी निगडीत पेमेंट, तसेच मोबाईल कंपन्या, खते, इंधन आदी कंपन्याही सहभागी झाल्या. त्यांच्याकडील विविध ॲप व त्यांच्या वापराबाबत याठिकाणी डिजीटल प्रदानाच्या व्यवहारांची प्रात्यक्षिके तसेच खरेदी आदीबाबत माहिती दिली गेली. आधार नोंदणी करण्यात आली, तसेच भिम ॲप आदींची माहिती देण्यात आली. खाद्य पदार्थांसोबतच ग्राहकोपयोगी वस्तूंच्या दालनात डिजीटल पद्धतीने खरेदी करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून डिजीधन मेळाव्यास शुभेच्छा संदेश
डिजीधन मेळावा आर्थिक व्यवहारातील परिवर्तनासाठी सहाय्यभूत ठरेल अशा आशयाचा शुभेच्छा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राज्य सरकारने कॅशलेस व्यवहारासाठी रोडमॅप तयार केल्याचे तसेच महावॅलेट, प्रत्येक ग्रामपंचायतीत पीओएस मशीन आणि ते चालविण्यासाठी प्रतिनीधी नियुक्ती करण्यात येत असल्याचा उल्लेख या संदेशात आहे. सामान्य ग्राहक आणि व्यापारी यांच्यासाठी डिजीटल प्रदानातील सुलभता अशा मेळाव्यातून पुढे येईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.

0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...