Thursday, March 16, 2017

डिजीटल प्रदानांतर्गत 24 मार्च रोजी होणाऱ्या
डिजीधन मेळाव्याचे सुनियोजन करा - काकाणी
विविध घटकांना सहभागी होण्याचे, लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 16 :- केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमेअंतर्गत डिजीधन मेळावा शुक्रवार 24 मार्च 2017 रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे सुनियोजन करा, तसेच शासकीय, निमशासकीय संस्था, कार्यालये यांनी नाविन्यपुर्ण उपक्रमांद्वारे रोकडरहित (कॅशलेस) व्यवहाराना चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा , असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. मेळाव्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून श्री. काकाणी बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित घोषवाक्य स्पर्धेचीही घोषणा करण्यात आली.      
बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॅा. सुधीर भातलंवडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, जिल्हा सहकार उपनिबंधक विनायक कहाळेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे (एनआयसी) चे  माहिती अधिकारी सुनील पोटेकर यांच्यासह महापालिका, विविध बँकांचे, डिजिटल पेमेंटशी निगडीत संस्था आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डिजीधन मेळाव्याचा मुख्य कार्यक्रम नियोजन भवनमध्ये होणार आहे. या मेळाव्यात डिजीटल प्रदानाशी निगडीत बँका, तसेच विविध व्यापारी कंपन्या, शासकीय विभाग आदी सहभागी होणार आहेत.
 जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी मेळाव्याच्या निमित्ताने जिल्ह्यात 8 नोव्हेंबर 2016 पासून 20 मार्च 2017 पर्यंत कॅशलेस व्यवहारांच्या दृष्टीने उत्कृष्ट आणि नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून , अशा व्यवहारांत लाक्षणीकरित्या वाढ केलेल्या संस्था, बँका आदींनाही सन्मानित करण्याचे जाहीर केले. ते म्हणाले की, यापुढे रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारांशिवाय पर्याय नाही, ही बाब नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी हा डिजीधन मेळावा उत्कृष्ट संधी आहे. यामध्ये बँकांसह, शासकीय, निमशासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनीही उत्स्फुर्त सहभाग घ्यावा. जेणेकरून शासकीय व्यवहार, तसेच लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यात येणारा लाभ आणि अन्य नाविन्यपुर्ण डिजिटल उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविता येईल.
रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच डिजीटल व्यवहारांची माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात डिजीटल व्यवहार करणाऱ्यांसाठीच्या भाग्यवान बक्षीस विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. मेळाव्यात बँका, आधार क्रमांकाशी निगडीत तसेच विविध डिजीटल प्रदान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या, मोबाईल कंपन्या, खते, इंधन आदी कंपन्याही सहभागी होणार आहेत. मेळाव्यात बँका व इतर सहभागी घटक यांची विविध प्रकारची दालने असतील. याठिकाणी डिजीटल प्रदानाच्या व्यवहारांची प्रात्यक्षिके तसेच खरेदी आदीबाबत माहिती दिली जाणार आहे.
मेळाव्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित भाग्यवान विजेत्याची (लकी ड्रॅा) काढण्यात येणार आहे. या विजेत्यांना मुख्य समारंभात सन्मानितही करण्यात येणार आहे. या एक दिवसीय डिजीधन मेळाव्यात विविध दालनांद्वारे ग्राहक तसेच सामान्य नागरिकांना डिजीटल प्रदानाबाबत प्रशिक्षीत करण्याचा प्रयत्न राहणार आहे. यात बँका व्यापाऱ्यांसाठी  पीओएस  मशीन्सची  नोंदणी  करून घेतील. तसेच नवीन खाती उघडणे, आधार क्रमांकाशी  बँक  क्रमांक संलग्न करणे, विविध बँकाच्या युपीआय ॲप्सची माहिती देतील. याशिवाय खासगी मोबाईल कंपन्या, तसेच डिजीटल प्रदान क्षेत्रातील कंपन्या ई वॅालेटस्, मोबाईल वॅालेटस् यांची माहिती देतील. याशिवाय सेवा तसेच विविध वस्तू, तसेच खत, दूध, शेतकरी सोसायट्या, कृषीविषयक, बी-बियाणे, पुरवठा विभाग आदींनाही डिजीटल प्रदानांची माहिती देण्यासाठी दालन उभारण्यात येणार आहेत.
अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनीही उत्स्फुर्त सहभाग आणि नाविन्यपुर्ण उपक्रमांद्वारे मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले. सुरवातीला निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी डिजीधन मेळाव्याची रुपरेखा स्पष्ट केली, तसेच शेवटी आभारही मानले.

0000000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...