Saturday, February 18, 2017

महाराष्ट्र हरित सेनावर  विविध घटकांनी
उत्स्फुर्तपणे नोंदणी करावी - जिल्हाधिकारी काकाणी
नांदेडला आघाडीवर ठेवण्याचे आवाहन
नांदेड दि. 18 :- वन विभागाच्‍या `महाराष्‍ट्र हरित सेना` या योजनेच्‍या संकेतस्‍थळावर जिल्ह्यातील विविध घटकांनी उत्स्फुर्तेपणे सदस्‍य म्‍हणून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे. यात वैयक्तीकरित्या आणि सामुहिकरित्या सदस्यत्त्व नोंदणीत नांदेड जिल्ह्यातील घटकांनी प्रयत्न करावेत आणि जिल्ह्याला या नोंदणीत आघाडीवर ठेवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
हरितसेनेत समाविष्ट होण्यासाठी www.greenarmy.mahaforest.gov.in वर नोंदणी करता येणार आहे. याद्वारे नोंदणी केल्यानंतर संबंधितांचे प्रमाणपत्रही तयार होईल. वैयक्तीक सदस्यत्त्वात विद्यार्थी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, तसेच खासगी संस्थांचे कर्मचारी, अधिकारी, व्यावसायीक, ज्येष्ठ नागरिक यांना नोंदणी करता येईल. तर सामुहिकरित्या सदस्यत्त्वात निमशासकीय व अशासकीय संस्था, शैक्षणीक संस्था, सहकारी संस्था, औद्योगीक संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांना नोंदणी करता येते.
नियोजित 50 कोटी वृक्षारोपणाचा व संगोपनाचा कार्यक्रम लोकसहभागाद्वारे जन चळवळीत रुपांतरीत करुन यशस्‍वीरित्‍या राबविण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभागी होणे गरजेचे आहे. त्‍यासाठी `महाराष्‍ट्र हरित सेना` स्‍थापित करण्‍याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्‍या अनुषंगाने महाराष्‍ट्र हरित सेनेचे सदस्‍य म्‍हणून नोंदणी करण्‍यासाठी www.greenarmy.mahaforest.gov.in या संकेतस्‍थळाची निर्मिती करण्‍यात आली आहे. या संकेतस्‍थळावर दिनांक 31 मार्च 2017 पर्यंत किमान 1 कोटी लोकांनी, स्‍वयंस्फूर्तीने स्‍वयंसेवक म्‍हणून या उपक्रमाचे सदस्‍य म्‍हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रीन आर्मीचे सदस्‍य असलेल्‍या सभासदांना वृक्ष लागवड, संगोपन, वन व वन्‍यजीव आणि वन विभागातील संबंधित क्षेत्रामध्‍ये आपले योगदान देता येईल. तसेच या उपक्रमात उत्तम काम करणाऱ्या सभासदांना बक्षिस योजना व इतर सवलतीद्वारे सन्‍मानित करण्‍याची योजना विचाराधीन आहे. नोंदणीची पद्धत अत्‍यंत सोपी असून वर नमूद संकेतस्‍थळावर आवश्‍यक ती माहिती भरल्‍यानंतर सभासद नोंदणी झाल्‍याचे आणि त्‍यानुसार प्रमाणपत्र सिस्टिममध्‍ये तयार होऊन सदस्‍याच्‍या मेल आयडीवर आणि एसएमएस वर पाठविले जाईल.
जिल्‍ह्यातील विविध विभागांचे कर्मचारी, अधिकारी, त्‍यांचे कुटुंबिय, आप्‍तेष्‍ट, मित्र परिवार, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय आणि खाजगी संस्‍था यांनी महाराष्‍ट्र हरित सेनेमध्‍ये सदस्‍य नोंदणी केल्‍यास त्‍यांना अशा उपक्रमात काम करण्‍याची संधी मिळेल. या लोकोपयोगी आणि सध्‍याच्‍या व भविष्‍यातील पिढीला उत्तम व सुरक्षित पर्यावरण देण्‍याच्‍या दृष्‍टीने सर्वांनी `महाराष्‍ट्र हरित सेनेचे` सदस्‍य म्‍हणून नोंदणी करण्‍याबाबत आवाहन आहे. तसेच याबाबत संनियंत्रण व समन्‍वय करुन जास्‍तीत-जास्‍त सदस्‍य नोंदणी होण्‍यासाठी पुढाकार घेण्‍यात येत असल्‍याचे श्री. काकाणी यांनी सांगितले. या नोंदणीत नांदेड आघाडीवर राहील, असा विश्र्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
जागतिक तापमानातील वाढ आणि ऋतू बदल या पार्श्‍वभूमीवर आणि राज्‍यातील वनक्षेत्र 20 टक्क्यांवरुन 33 टक्‍केपर्यंत नेण्‍याचा भाग म्‍हणून, वृक्षारोपणाची गती तुटू न देता, त्‍यामध्‍ये सातत्‍य ठेवावे, असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्‍यानुसार पुढील तीन वर्षात 50 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्‍ट ठरविण्‍यात आले आहे. त्‍याबाबत कृती कार्यक्रम तयार करुन अंमलबजावणी करण्‍याबाबत आवश्‍यक सूचना करण्‍यात आल्‍या आहेत. राज्‍यामध्‍ये 1 जुलै, 2016 रोजी जनतेच्‍या सहभागाने एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लावण्‍याचे उद्दिष्‍ट सहज ओलांडले गेले. प्रत्‍यक्षात एकाच दिवशी 2.83 कोटी वृक्ष लागवड झाली. `लिमका बुक ऑफ रेकॉर्ड` या संस्‍थेने या आगळ्या वेगळ्या आणि नाविन्‍यपूर्ण कार्यक्रमाची दखल घेतली आहे.
00000000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...