Saturday, February 18, 2017

पाच दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाचे
मार्चमध्ये आयोजन ; नियोजनास प्रारंभ
नांदेड दि. 18 :- कृषि विषयक विकसीत तंत्रज्ज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसांचे जिल्हा कृषि महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्याचा कृषि महोत्सव 22 ते 26 मार्च, 2017 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवा-मोंढा येथील मैदानावर या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा समितीची नियोजनाची प्राथमिक बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
       
बैठकीस जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी पद्माकर केंद्रे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, किनवट आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे,  उपवनसंरक्षक सुजय डोडल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, कृषि विकास अधिकारी पंडितराव मोरे, डीआरडीएचे प्रकल्प संचालक डॅा. एस. बी. भातलंवडे, पशूसंवर्धन आयुक्त डॅा. स्मिता उके, सहायक प्रकल्प अधिकारी डॅा. प्रवीणकुमार घुले आदींची उपस्थिती होती.
या पाच दिवसी कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन, परिसंवाद-चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, विक्रेता खरेदीदार संमेलन आणि शेतकरी सन्मान समारंभ असे घटक राहणार आहेत. कृषी प्रदर्शनात सुमारे दोनशे दालने असतील. यात शासकीय विभागांच्या दालनांसह, विविध कंपन्याचे, खाद्यपदार्थांचे, प्रात्यक्षिके यांचा समावेश राहील. कृषी तंत्रज्ज्ञान विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, विविध कृषी महामंडळे, तसेच उद्योजक, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा सहभाग घेतला जाणार आहे. परिसंवाद-चर्चासत्रात कृषी शास्त्रज्ज्ञ, तज्त्र अधिकारी, प्रयोगशील शेतकरी, प्रक्रिया उद्योजक, यशस्वी शेतकरी-उद्योजक यांचे व्याख्यान-मार्गदर्शन यांचा समावेश राहणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्रामध्ये धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. ज्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार मालाची विक्री करण्यात येणार आहे. याशिवाय विक्रेता खरेदीदार संमेलनात सार्वजनिक खासगी भागिदारी (पीपीपी) प्रकल्प, कृषी माल प्रक्रिया उद्योजक आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यात संवाद घडवून आणण्यात येणार आहे. यातून बाजाराभिमुख कृषी विस्ताराला चालना मिळेल. शेतकरी सन्मान समारंभात जिल्ह्यातील कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी, तसेच पीक स्पर्धा विजेते शेतकरी आदींचा यथोचित सन्मान केला जाणार आहे.
            या पाच दिवसीय कृषी महोत्सवाची रुपरेखा निश्चित करण्यासाठी विविध यंत्रणांशी समन्वय साधण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. कृषी महोत्सव शेतकऱ्यांच्या सहभागाद्वारे आणि जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणा, तसेच उद्योजक, संस्था, संघटना यांच्या समन्वयातून यशस्वीरित्या आयोजित करण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी दिले.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...