Tuesday, January 31, 2017

उज्ज्वल नांदेडचा ध्यास... प्रेक्षागृह भरले तुंडुंब
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाला मिळालेल्या तरुणाईच्या
प्रतिसादाने जिल्हाधिकारी काकाणीही भारावले
नांदेड दि. 31 :- तुडूंब भरलेले डॅा. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह....अगदी व्याख्यात्याच्या पायांपर्यंत बसलेले होतकरू तरुण. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित  उज्ज्वल नांदेड  उपक्रमास मिळणाऱ्या प्रतिसादाची अनोखी चुणूक आज दिसून आली. जिल्हा प्रशासनातील नांदेड सेतू समिती, नांदेड मनपा आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमातील विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग पाहून जिल्हाधिकारी सुरेश काकाणी हे भारावून गेले.

आजच्या एकदिवसीय शिबीरात चार सत्र संपन्न झाली. यामध्ये स्पर्धा परीक्षेतील इंग्रजीची तयारी या विषयावर रत्नेश अग्रवाल यांनी दोन सत्रांत मार्गदर्शन केले. याशिवाय डॅा. विलास कांबळे यांचे भुगोल विषयाची तयारी तसेच डॅा. विजय पोवार यांचे सामान्य ज्ञान या विषयावर मार्गदर्शन झाले. श्री. अग्रवाल यांच्या सत्रासाठी प्रेक्षागृहात मिळेल, त्याठिकाणी युवा विद्यार्थ्यांनी जागा पटकावली. अगदी व्यासपीठावर आणि फळ्याच्या शेजारीही. अग्रवाल यांनी तितक्यात तन्मयतेने आणि सोप्या-ओघवत्या भाषेत इंग्रजीच्या तयारीचे धडे दिले. डॅा. कांबळे यांनीही हसत खेळत भुगोल विषयाची तयारी कशी करावी यासाठी मार्गदर्शन केले. डॅा. पोवार यांनी सामान्य ज्ञान विषयाची तयारी कशी करावी याबाबत सखोल माहिती दिली.
आजच्या शिबिराचे द्घाटन जिल्हाधिकारी काकाणी यांचे हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात श्री. काकाणी म्हणाले की, उज्ज्वल नांदेड घडविण्याचा आपल्या ध्यास आहे. त्यासाठी अभ्यासिका, मार्गदर्शन शिबीर, सराव प्रश्न संच तसेच अभिरूप मुलाखती यांच्याद्वारे आपण पद्धतीशरपणे प्रयत्नशील आहोत. यातून चांगले निकालही हाती येऊ लागले आहेत. ही बाब महत्त्वपुर्ण आहे. प्रशासनाचे प्रयत्न अखंडपणे तुमच्या सोबत आहेत. याचा विद्यार्थ्यांनी चांगला विनीयोग करायला हवा. विषयांचे सखोल ज्ञान घेण्यातूनच, तुम्हाला परीक्षेत यश संपादन करता येणार आहे. तालुका स्तरावरही स्पर्धा परीक्षा तयारी आणि विविध क्षेत्रातील संधीची माहिती पोहचावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नांदेडमधील होतकरू आणि जिद्द, चिकाटीच्या जोरावर तयारी करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी यशाची जीवनमार्ग यातून आम्ही प्रशस्त करत आहोत.
उद्घाटन सत्रात जिल्हाधिकारी काकाणी यांनी मार्गदर्शक व्याख्यात्यांचे ग्रामगीता देऊन स्वागत केले. यावेळी मनपा आयुक्त समीर उन्हाळे उपस्थित होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. श्री. हुसे आणि समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी विविध सत्रांचे संयोजन केले. शिबीराच्या संयोजनात साईनाथ डहाळे, आरती कोकूलवार, अजय वट्टमवार, कोंडीबा गादेवाड, विठ्ठल यनगुलवार, लक्ष्मण शन्नेवाड, बाळू पावडे, रघुवीरसिंह यांनी सहभाग घेतला.
रविवार 5 फेब्रवारी रोजी अर्थशास्त्र विषयाचे मार्गदर्शन
उज्ज्वल नांदेड या मार्गदर्शन मालिकेत विषयांचे सखोल मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्पर्धा परीक्षा किंवा व्यक्तीमत्त्व विकासाची प्रेरक व्याख्यानांवर भर न देता, परीक्षांची तयारी करताना विषयांचे सखोल ज्ञान मिळावे, त्याद्वारे अधिकाधीक गुण मिळविता यावेत यासाठी प्रयत्न केला जातात. याच मालिकेत रविवार 5 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 यावेळेत अर्थशास्त्र विषयातील तज्ज्ञ रंजन कोळंबे यांचे मार्गदर्शन आयोजित केल्याची माहिती संयोजकांच्यावतीने देण्यात आली. डॅा. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे होणाऱ्या या शिबीरासाठी उपस्थित रहावे , असे आवाहनही करण्यात आले आहे.

0000000
जिल्हा परिषदसाठी 143 ,
पंचायत समितीसाठी 176 नामनिर्देशपत्र दाखल
नांदेड दि. 31 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यात आज मंगळवार 31 जानेवारी 2017 रोजी जिल्हा परिषद गटासाठी एकूण- 143 व पंचायत समिती गणासाठी एकूण- 176 नामनिर्देशनपत्रे दाखल झालेली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी दिली आहे.  त्यांची तालुका निहाय माहिती पुढील प्रमाणे आहे.
माहूर- जि.प.- 5  व  पं. स.- 7 ,  किनवट- जि.प.- 17  व  पं. स.- 33 , हिमायतनगर- जि.प.- 18  व पं. स.- 12. हदगाव- जि.प.- 35 व  पं.स.- 34, अर्धापूर- जि.प.- 2 व पं.स.- 1, नांदेड- जि.प.- 6 व पं. स.- 2, मुदखेड- जि.प.- 3 व पं. स.- 5, भोकर- जि.प.- 6 व पं. स.- 7, उमरी- जि.प.-1 व पं. स.-7, धर्माबाद- जि.प.-11 व पं. स.-9, बिलोली- जि.प.-9 व पं.स.-5, नायगाव- जि.प.-9 व पं. स.-11, लोहा- जि.प.-3 व पं. स.- 10, कंधार- जि. प.-2  व पं. सं.-7, मुखेड- जि.प.- 10 व पं.स.- 10, देगलूर- जि.प.-6 व पं.स.-16. असे एकूण जिल्हा परिषद गटासाठी- 143 व पंचायत समिती गणासाठी- 176 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. 

0000000
निवडणूक आचारसंहितेसाठी विविध यंत्रणांना
सतर्कतेचे निर्देश ; संनियंत्रण समिती बैठक संपन्न
नांदेड, दि. 31 :- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे , त्यामुळे या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल , यासाठी यंत्रणांनी आणखी सतर्क व्हावे , असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न  झाली. या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आगामी काळात होणारा वाहनांचा वापर, आर्थिक व्यवहार यांच्याबाबत, तसेच दारू विक्रीच्या व्यवहारांबाबतही मागोवा घेण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
बैठकीस जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय उशीर, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. कांबळे आदीं विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थिती होती.
भारत निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची तसेच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.
बैठकीत जिल्हाधिकारी काकाणी यांनी निवडणूक आचारसंहिता अंमलात आल्यापासून सुरु करण्यात आलेल्या विविध पथकांच्या अहवाल पद्धतीबाबत सूचना दिल्या. निवडणूक काळातील वाहनांचा, ध्वनीक्षेपकांचा तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या वापरांबाबत यंत्रणांनी दक्षता बाळगावी. वीज वापर तसेच अनुषंगीक परवानग्या आदींबाबत काटेकोर कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. व्यावसायीक, उद्योजकाव्यतिरिक्त अन्य काही खात्यांवरून आर्थिक व्यवहार होत असतील , तर त्याबाबत बँक आयकर-विक्रीकर यांनी संयुक्त पडताळणी करावी. सोने-चांदी तत्त्सम मौल्यवान वस्तुंच्या खरेदी-विक्रीद्वारे छुपे आर्थिक व्यवहार होत असतील, तर त्याबाबतही संयुक्तपणे कारवाई करावी लागेल. या सर्वच बाबतीत संबंधित यंत्रणांनी अहवाल द्यावेत. त्याबाबतची पद्धती विहीत केलेली आहे. त्यानुसार वेळेत अहवाल देण्याचेही निर्देश बैठकीत देण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस यांच्यासह सर्वच यंत्रणांनी अवैध प्रकारांवर नियंत्रणासाठी समन्वय राखावा. निवडणूक काळात मतदारांना आमिष दाखविण्याचे, किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या अवैध प्रकारांची वेळीच दखल घेऊन कारवाई करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. बैठकीत उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी यांनीही विविध बाबींचा तपशील सादर केला.

0000000
शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदानासाठी
मतदारांना ओळखपत्र सोबत असणे आवश्यक
नांदेड , दि. 31 :- महाराष्‍ट्र विधान परिषदेच्‍या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी शुक्रवार 3 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी मतदारांना आपली ओळख पटवून देण्‍यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या छायाचित्रासह असलेल्या विहित मतदा ओळखपत्र किंवा ते नसल्यास 13 प्रकारच्या अन्य ओळखपत्रांपैकी एक सादर करण्यास मान्यता दिली आहे. पण मतदानासाठी ओळखपत्र आवश्‍यक असल्याचे निवडणूक विभागाने कळविले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्‍या दि. 27 जानेवारी 2017 च्‍या आदेशान्‍वये ज्‍या मतदारांकडे छायाचित्र मतदान ओळखपत्र (EPIC) नसेल, त्‍यांनी त्‍यांच्‍या ओळखीचा पुरावा म्‍हणून पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, पॅनकार्ड, छायाचित्र असलेले पदवी किंवा पदवीका प्रमाणपत्र, केंद्र सरकार, राज्‍य सरकार, सार्वजनिक उपक्रम किंवा उद्योग संस्‍थेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र , बँक किंवा पोस्‍टाचे छायाचित्र असलेले पासबुक (खाते 31 डिसेंबर 2016 रोजी किंवा तत्‍पूर्वी उघडलेले असावे), जमीन किंवा प्रॉपर्टी नोंदणी छायाचित्र असलेले कागदपत्र, 31 डिसेंबर 2016 पूर्वी देण्‍यात आलेली छायाचित्र असलेली शिधापत्रिका, सक्षम अधिका-याद्वारे देण्‍यात आलेले एस.सी., एस.टी. किंवा ओ.बी.सी.चे छायाचित्र असलेले जात प्रमाणपत्र, 31 डिसेंबर 2016 पूर्वी देण्‍यात आलेला छायाचित्र असलेला शस्‍त्र परवाना, सक्षम अधिका-याने 31 डिसेंबर 2016 पूर्वी दिलेला छायाचित्र असलेला अपंगत्‍वाचा दाखला, आधार कार्ड अथवा रजिस्‍टर जनरल ऑफ इंडिया तर्फे देण्‍यात आलेले एनपीआरचे स्‍मार्ट कार्ड अशा एकूण 13 पुराव्‍यांपैकी कोणताही एक पुरावा सोबत असणे आवश्‍यक आहे. उपरोक्‍त ओळखीचा पुरावा असल्‍याशिवाय मतदान करता येणार नाही. मतदारांनी याची नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ सुरेश काकाणी यांनी केले आहे.

000000

Monday, January 30, 2017

जिल्हा परिषद, पंचायत समिती
 मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम लागू
नांदेड दि. 30 :-जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतमोजणीच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्राच्या हद्दीपर्यंत गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंधीत आदेश लागू करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टिने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, मतमोजणीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व मतमोजणीच्या कामाव्यवतीरिक्त व्यक्तीस प्रवेशास याद्वारे प्रतिबंधीत करण्यात आले आहे. 

00000000
जिल्हा परिषद, पंचायत समिती
मतदान केंद्र परिसरात 144 कलम लागू
नांदेड दि. 30 :-  जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदान केंद्रावर गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. मतदान केंद्राच्या हद्दीपर्यंत मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत प्रतिबंधीत आदेश लागू करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टिने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी नांदेड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी मतदान होणार आहे अशा मतदान केंद्राच्या हद्दीपासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यवतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्याकरीता याद्वारे प्रतिबंधीत करण्यात आले आहे.  

000000
जिल्हा परिषदसाठी 59,
पंचायत समितीसाठी 50 नामनिर्देशपत्र दाखल
नांदेड दि. 30 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यात आज सोमवार 30 जानेवारी 2017 रोजी जिल्हा परिषद गटासाठी एकूण- 59 व पंचायत समिती गणासाठी एकूण- 50 नामनिर्देशनपत्रे दाखल झालेली आहेत. त्यांची तालुका निहाय माहिती पुढील प्रमाणे आहे.
माहूर- जि.प.-2 व पं. स.- 1 ,  किनवट- जि.प.-7 व पं. स.- 5 , हिमायतनगर- जि.प.-3 व पं. स.-4. हदगाव- जि.प.-8 व  पं.स.-5, अर्धापूर- जि.प.-2 व पं.स.-1, नांदेड- जि.प.-1 व पं. स.-2, मुदखेड- जि.प.- 1 व पं. स.- निरंक, भोकर- जि.प.-3 व पं. स.-निरंक, बिलोली- जि.प.-11 व पं.स.-15, नायगाव- जि.प.- 8 व पं. स.-7, लोहा- जि.प.-2 व पं. स.-1, मुखेड- जि.प.-5 व पं.स. -2, देगलूर- जि.प.-6 व पं.स.-7. तर उमरी, धर्माबाद आणि कंधार या तीनही तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज एकही नमानिर्देशनपत्रे दाखल झालेली नाहीत.

0000000
जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज
 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
नांदेड दि. 30 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मंगळवार 31 जानेवारी 2017 रोजी सकाळी 9.30 ते सायं.5.30 या वेळे डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
या शिबिराचे द्घाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांचे हस्ते होणार आहे. मनपा आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिबिरा पुणे येथील ख्यातनाम इंग्रजीचे वक्ते प्रा. राजेश अग्रवाल हे विद्यार्थ्यांना स्पर्धा रिक्षेच्या संदर्भातील इंग्रजी विषयाची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये चार रंगाचा पेन नोटबुक यासह उपस्थित रहावे , असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, मनपा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000000
कुष्ठरोगाविषयी माहिती देणाऱ्या
जनजागृती रॅलीचा उत्साहात शुभारंभ
नांदेड दि. 30 :- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानानिमित्त जनजागृती रॅलीचा जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनी हिरवा झेंडा दाखून नांदेड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील गांधी पुतळा पासून शुभारंभ केला. यापुर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास मान्यवरांची पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, मनपा उपायुक्त रत्नाकर वाघमारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. इंगळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. श्याम नागापुरकर, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. डी. टी. कानगुले, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. परतवाघ, डॉ. आईटवार, डॉ. एच. आर. साखरे, डॉ. नईम अन्सारी आदी वैद्यकीय अधिकारी, परिचारीका उपस्थित होते.  
सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) नांदेड यांच्यावतीने आयोजित ही रॅली गांधी पुतळ्यापासून महावीर चौक, वजिराबाद, पोलीस अधीक्षक कार्यालय, शिवाजी पुतळा मार्गे श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक शासकीय रुग्णालय नांदेड येथे समारोप झाला. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी दिसता चट्टा-डॉक्टरांना भेटा , हात मिळवा कुष्ठरोग मिटवा, बहुविध औषधोपचार, केला कुष्ठरोग गेला, एमडीटीची गोळी करी कुष्ठरोगाची होळी आदी फलक हातात घेवून उत्साहात घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधले होते.  रॅलीच्या समारोपाप्रसंगी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात पथनाट्यामधून कुष्ठरोगाविषयी असणारे गैरसमज व औषधोपचार याची माहिती सादर केली.  रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी महात्मा गांधी पुतळ्यासमोर कुष्ठरोगाविषयी माहिती देणारे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.   
जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाच्या अनुषंगाने आज दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2017 या काळात आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत विशेष जनजागृती कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  दि. 6 ते 21 फेब्रवारी 2017 या दरम्यान शहरी भागात व गावामध्येही घरोघरी जावून ही विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेच्या काळात सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनी केले आहे.
0000000000


Friday, January 27, 2017

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत
जिल्ह्यात आज लसीकरण मोहिम
नांदेड दि. 28 :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत नांदेड जिल्ह्यात रविवार 29 जानेवारी 2017 रोजी 0 ते 5 वयोगटातील बालकांसाठी लसीकरण मोहिम राबविण्यात ये आहे. घरातील, घराशेजारील, परिचित 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना नजिकच्या पोलिओ बुथवर पोलीओचा डोस आवश्य पाजून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
आपण प्रवासात असाल तरी डोस पाजण्यास विसरू नका. पोलिओ बुथ सर्व रेल्वे स्टेशन, बसस्थानके येथे आयोजित केली आहेत. बाळ नुकतेच जन्माला आले असेल तरी डोस पाजून घ्या. बाळ आजारी असेल तरी डोस पाजून घ्या. बाळास यापूर्वी कितीही वेळेस डोस दिलेले असतील तरी डोस आवश्य पाजून घ्या. पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी आपले योग्य ते योगदान द्या. लस द्या बाळा, पोलिओ टाळा. लसीकरणाला साथ करा, पोलिओ वर मात करा. आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्राच्या येणाऱ्या कार्यक्षेत्रात ही मोहिम राबविण्यात येत असून सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.
000000


  जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून
एटीएम रुपे डेबीट कार्डचे वितरण  
            नांदेड, दि. 27 :-  केंद्र शासनाच्या धोरणानुसार सर्व पिक कर्जदारांना या वर्षापासून एटीएम रुपे डेबीट कार्ड देण्याचे आदेश दिलेले आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने नांदेड जिल्ह्यातील सर्व पिक कर्जदारांचे एटीएम रुपे डेबीट कार्ड तयार केले असून जिल्ह्यातील प्रत्येक शाखेत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, असे क्षेत्रीय व्यवस्थापक एम. जी. केसराळीकर यांनी कळविले आहे.
नांदेड जिल्ह्यात 44 हजार 461 पिककर्जदारांना किसान क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गत पिक कर्जाचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेने वितरण केले आहे. येथून पुढे पिककर्जाचे सर्व व्यवहार एटीएम रुपे डेबीट कार्डमार्फतच करण्यात येणार आहेत. पिककर्जदार लाभधारकांनी आपल्या शाखा कार्यालयात शाखा व्यवस्थापकाकडे आपल्या एटीएम रुपे डेबीट कार्डची मागणी करावी. मागणी करीत असताना आधार कार्डची झेरॉक्स प्रत शाखेमध्ये देऊन एटीएम रुपे डेबीट कार्ड हस्तगत करावे. या कार्डचे वितरण रविवार 5 फेब्रुवारी 2017 पर्यंतच करण्यात येणार आहे. तरी संबंधित पिककर्जदार लाभधारकांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन श्री केसराळीकर यांनी केले आहे.   

000
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
रविवारी विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा
परिक्षेविषयी उमेदवारांना सूचना  
नांदेड, दि. 27 :-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा रविवार 29 जानेवारी 2017 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील 42 शाळा, महाविद्यालयात घेण्यात येणार आहे. आयोगामार्फत दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे , असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
उमेदवारांनी परीक्षेला येतांना प्रवेशपत्र, ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणावी. उमेदवारांनी परीक्षा कक्षात भ्रमणध्वनी, कॅल्पुलेटर, ब्ल्युटूथ इत्यादी इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करु नये. परीक्षेत कॉपी, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याच्या आयोगाच्या सूचना आहेत. परीक्षा  उपकेंद्रावर उमेदवारांची पोलीस कर्मचारी यांचेकडून तपासणी करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून परिक्षा केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्त व कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000
हरभरा पिक संरक्षणासाठी कृषि संदेश  
नांदेड, दि. 27 :-  जिल्ह्यात हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे किडीपासून संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
हरभरा पिकावरील घाटेअळीसाठी इमामेक्टीन बेन्जोएट 5 टक्के 0.4 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
000


शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या
मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा
            नांदेड, दि. 27 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदारांना शुक्रवार 3 फेब्रुवारी 2017 निवडणुकीच्या दिवशी  मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर  करण्यात आली आहे. रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे, असे औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा‍ जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000
शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदानासाठी
संबंधीत गावातील आठवडी बाजार बंद
नांदेड, दि. 27 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवार 3 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होत आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदान शांततेत पार पडावे या दृष्टीकोनातून नांदेड जिल्ह्यातील ज्या गावात मतदान केंद्र आहेत त्या गावातील आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी असल्यास त्यागावचे आठवडी बाजार बंद ठेण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी काढले आहेत.
पणन संचालक पुणे यांनी दिलेल्या मान्यतेनुसार  मार्केट ॲड फेअर ॲक्टर, 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुक अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ज्या गावात मतदान केंद्र आहेत आणि त्या गावातील आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी शुक्रवार 3 फेब्रुवारी रोजी भरत असल्यास त्या गावचे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. अशा गावचे, ठिकाणाचे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी शनिवार 4 फेब्रुवारी 2017 रोजी भरविण्यात यावेत, असेही आदेशात म्हटले आहे.   

000
माहूर चेक पॉईंट मंगळवारच्या मध्यरात्री पासून बंद
नांदेड, दि. 27 :- माहूर चेक पॉईंट येथे वापरण्यात येणारी मनुष्यबळ व वाहतुकीचा विचार करता या ठिकाणी चेक पॉईट यापुढे कार्यान्वित ठेवणे अंमलबजावणीच्या दृष्टीने व्यवहार्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माहूर चेक पॉईट मंगळवार 31 जानेवारी 2017 रोजीच्या मध्यरात्री पासून बंद करण्यात येत आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
 माहूर तालुक्यातील वाई (बाजार) येथे मोटार वाहन विभागाचे चेक पॉईंट कार्यरत आहे. या ठिकाणी मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत बनविलेल्या नियमातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करुन दंडात्मक कारवाई करण्यात येते व वाहन चालक, मालकाकडून दंड, कर वसुल केला जातो.

000
शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी
3 फेब्रुवारी रोजी दारु दुकाने बंद
नांदेड, दि. 27 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी  शुक्रवार 3 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी जिल्ह्यातील दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्गमीत केले आहेत. 
मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी  जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष) एफएल-4, एफएल / बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या 3 फेब्रुवारी रोजी पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेशात नमूद केले आहेत. या आदेशाचा भंग केल्यास अनुज्ञप्तीधारका विरुद्ध कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

0000000

लेख -

 वेळेत निदान , वेळेत उपचार
यातूनच कुष्ठरोगाची मुक्ती

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व विशेष कुष्ठरोग शोध मोहिम 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2017 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तसेच 6 ते 21 फेब्रुवारी यादरम्यान कुष्ठरोग सर्वेक्षण मोहिम ही राबविण्यात येणार आहे. त्याविषयी या लेखात माहिती...
आपल्याकडे  कुष्ठरोगाची समस्या आजही दिसून येते. खरोखर कुष्ठरोग हा एक किरकोळ आजार आहे. तो मायबाक्टेरीयाम लेप्री या जीवाणुमुळे होतो. कुष्ठरोग हा काही स्पर्शाने होणारा आजार नाही. या रोगाचे निदान व उपचार सर्व सरकारी दवाखान्यात तसेच आरोग्य केंद्रामध्ये मोफत केला जातो. लवकर वेळेत निदान व उपचाराने कुष्ठरोग पुर्ण बरा होतो व पुढे निर्माण होणाऱ्या शारीरिक विकृती पासून बचाव होतो. कुष्ठरोगाच्या तीव्रतेनुसार त्याचा उपचार सहा महिने किंवा बारा महिने इतका आहे.
कुष्ठरोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे दिसून येतात. त्वचेवर फिक्कट किंवा लालसर रंगाचा एक किंवा एकापेक्षा जास्त चट्टे असतात. हा चट्टा बधीर व कोरडा असतो. चट्टा न खाजणारा, न दुखणारा, न घाम येणारा असतो. शरीरावर, चेहऱ्यावर, भुवयावर गाठी येतात किंवा चेहऱ्याची त्वचा तेलकट दिसते. हाता-पायांना कोरडेपणा, बधीरपणा तसेच अशक्तपणा येतो. रुग्णाला याबाबी आढल्यास जवळच्या शासकीय दवाखान्यात कुष्ठरोगाची तपासणी करून घ्यावी. एमडीटी हे औषध कुष्ठरोगावर चांगले प्रभावशाली ( गुणकारी ) औषध आहे. सर्व सरकारी दवाखाने व आरोग्य केंद्रामध्ये हे औषध मोफत उपलब्ध करुन दिले जाते.
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत सोमवार 26 जानेवारी 2017 रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित केली होती. त्यामध्ये कुष्ठरोग प्रतिज्ञा, कुष्ठरोगाची माहिती व नियमित विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे याची माहिती देण्यात आली. दळणवळणास कठीण दुर्गम अशा जिल्ह्यात 404 गावामध्ये 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2017 या काळात आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत विशेष जनजागृती मोहिमेतून कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
नांदेड जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षात 1 हजार 187 एवढ्या रुग्णांनी एमडीटी हा औषधौपचार घेवून कुष्ठरोग मुक्त झाले आहेत. त्यामुळे कुष्ठरुग्णांना भेदभावाची वागणूक देऊ नका. नागरिकांनी आपण, आपले शेजारी व इतर कोणालाही अशा प्रकारचे चट्टे किंवा डाग असतील तर त्यांनी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
जिल्ह्यात मागील तीन वर्षात कुष्ठरोग विकृती दर्जा-2 व नवीन बाल कुष्ठरुग्ण आढळलेल्या- 46 गावात व नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील- 16 , किनवट व देगलूर नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी तीन व हदगाव नगरपालिाका क्षेत्रातील एक असे एकुण- 69 भागामध्ये व गावामध्ये दि. 6 ते 21 फेब्रवारी 2017 या दरम्यान शहरी भागातील- 300 घरे व गावामधील संपूर्ण घरोघरी जावून ही विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहिम राबविली जाणार आहे. म्हणून सर्वाना आग्रहाची विनंती आपण आपले शेजारी व इतर कोणालाही अशा प्रकारचे चट्टे किंवा डाग असतील तर त्यांनी तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व उपचारांनी कुष्ठरोग मुक्त व्हावे.
संकलन – काशिनाथ र. आरेवार
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

*******

Wednesday, January 25, 2017

जवळगाव जि. प. हास्कुलच्या मिना वाघमारेस
राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेत पारितोषिक 
नांदेड, दि. 26 :- पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने पेट्रोलियम संवर्धन संशोधन क्षेत्रातील पेट्रोलियम कंझर्वेशन रिसर्च अशोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील निबंध स्पर्धेत हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या मिना गणेश वाघमारे हिने राष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेतील निबंधासाठीचे तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
कु. मिना वाघमारे हिच्या यशासाठी आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. यावेळी पीसीआरएचे सहसंचालक योगेश जोशी, मिनाचे शिक्षक बाळासाहेब गुंड तसेच आई , वडील गणेश वाघमारे उपस्थित होते. मिना वाघमारे जवळगावच्या जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये इयत्ता 9 वीच्या वर्गात शिकते. तिने पर्यावरण आणि आरोग्य रक्षणासाठी इंधन वाचवा या विषयावर निबंध सादर केला होता. स्पर्धेत तिला राष्ट्रीय स्तरावरील मराठी भाषेतील निबंधासाठी तिसरा क्रमांक मिळाला आहे. पारितोषिक म्हणून तिने प्रशिस्तीपत्रासह लॅपटॉपचे बक्षिस पटकाविले आहे. या यशासाठी तिचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.  

00000000
राष्ट्र  उभारणीत रचनात्मक योगदानासाठी
तरुणांनी कटीबद्ध रहावे - पालकमंत्री खोतकर
प्रजासत्ताकदिनाचा मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा दिमाखदार समारंभ

नांदेड, दि. 26 :- राष्ट्र आणि राज्याच्या सकारात्मक आणि रचनात्मक उभारणीसाठी कटीबद्ध व्हावे लागेल असे सांगतानाच त्यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुणांची शक्ती यांचा समन्वय साधणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी आज येथे केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात ते शुभेच्छापर संदेशात बोलत होते.

पोलीस कवायत मैदानावर झालेल्या या समारंभात पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शानदार संचलन आणि पोलीस दलाच्या जलद कृती दलाच्या थरारक प्रात्यक्षिकांमुळे समारंभ दिमाखदार झाला. समारंभास जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मंगलाताई गुंडले, महापौर शैलजा स्वामी, आमदार हेमंत पाटील, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदींची तसेच व्यासपीठावर जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांची उपस्थिती होती.
शुभेच्छापर संदेशात बोलताना पालकमंत्री खोतकर पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात, पुढच्या पिढ्यांमध्ये राष्ट्राभिमान द्विगणीत होईल, यासाठी प्रयत्न करावे लागतील. राष्ट्र आणि राज्याची वाटचाल प्रगतशील आहे. या वाटचालीत तरुण होतकरूंची संख्या बलस्थान आहे. त्यामुळे या तरुण लोकसंख्येचा आपल्याला खुबीने आणि प्रभावशाली उपयोग करावा लागेल. तरुणांच्या शक्तींचा वापर सकारात्मक दृष्टीने करावा लागेल. जुन्या जाणत्यांचा अभ्यास आणि नव तरुणाईचा जोष यांची सांगड घालणे आवश्यक आहे. यासाठी तरुणांनाही आव्हानांना गवसणी घालावी लागेल. नव तंत्रज्ज्ञान आत्मसात करतानाच, राष्ट्राच्या-राज्याच्या विकासासाठी शिक्षण-संशोधनाच्या क्षेत्रांना पादाक्रांत करावे लागेल.
मनन-चिंतन आणि मनगटाच्या बळावर या देशाच्या विकासात भर घालण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी जग ते स्थानिक पातळीवरील परिस्थितीचे भान राखून सकारात्मक आणि रचनात्मक उभारणीसाठी कटीबद्ध व्हावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री खोतकर यांनी यांनी उपस्थित जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांच्याशी संवाद साधून त्यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. तसेच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशीही हितगूज केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे आणि पोलीस निरीक्षक शामराव राठोड यांच्या नेतृत्वात  विविध दलांनी शानदार संचलनाने मानवंदनाही दिली. या संचलनात मुदखेडच्या केंद्रीय राखीव पोलीस दल, हिंगोलीतील राज्य राखीव पोलीस दल, नांदेड पोलिसांचे जलद कृती दल (क्युआरटी), सशस्त्र पोलीस पथक, नांदेड पोलीस मुख्यालयाचे पथक तसेच नांदेडचे सशस्त्र महिला व सशस्त्र पोलीसांचे पथक, शहर वाहतूक शाखा, नांदेड, गृह रक्षक दलाचे महिलांचे व पुरूषांचे पथक, नांदेड महापालिकेचे अग्नीशमन दल पथक, यशवंत महाविद्यालयाचे राष्ट्रीच छात्रसेनेचे पथक, महात्मा फुले हायस्कुलचे मुलांचे व मुलींचे स्काऊट गाईड पथक, ग्यानमाता विद्यालय, पोतदार विद्यालय, नागार्जूना हायस्कुल, ऑक्सफोर्ड विद्यालयांच्या या चार शाळांतून आलेले मुला व मुलींचे पथक, पोलीस वाद्यवृंद पथक, जलद कृती दलाच्या बुलेटस्वारांचे पथक, सिमा या श्वानासह असलेले पथक, बॅाम्ब शोधक व नाशक पथक, मार्कस मॅन, न्याय वैधक शाळेचे पथक, वज्र वाहन, अग्नीशमन दलाचे बुलेटस्वारांचे पथक यांनी शानदार संचलन केले. या संचलनात वन विभागाच्या जलद सुटका पथक, सामाजिक वनीकरण विभागाची हरितसेना, तसेच 108 रुग्णवाहिकेचे पथक यांनी चित्ररथाद्वारे सहभाग घेतला.  
यावेळी पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते स्काऊट गाईडसाठीचे राष्ट्रपती महोदयांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ स्वप्नील भंगाळे (राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड), सैलीनी शेख, सागर बोरगावे, पवन पटणे ( सर्व बसवेश्र्वर विद्यालय, फुलवळ, ता. कंधार ), शारदा करेवार ( महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शेकापूर, ता. कंधार ) यांना प्रदान करण्यात आले. यावेळी नांदेड पोलिस दलाच्यावतीने कराटेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.  विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत, डंबेल्स, घुंगर काठी, लेझीम, यांची प्रात्यक्षिके सादर केली. नांदेडच्या जलद कृती दलाच्यावतीनेही अपहरणातील सुटकेवर आधारीत चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते वन विभाग, नांदेड तहसीलच्या पुरवठा विभाग, पशूसंवर्धन विभाग तसेच रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या प्रदर्शन दालनांचेही उद्घाटन करण्यात आले. समारंभाचे व्यंकटेश चौधरी यांनी सुत्रसंचलन केले. समारंभास नांदेड शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरीकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...