सुधारित वृत्त
वृत्त क्रमांक 1144
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी दौडचे आयोजन
जुना मोंढा ते पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत दौड
नांदेड, दि. ३१ ऑक्टोबर : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘सरदार @ 150 एकता अभियान’ अंतर्गत 31 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात आज पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत रन फॉर युनिटी दौडचे आयोजन जुना मोंढा ते पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत करण्यात आले होते. या उपक्रमात जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या उपक्रमात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर,जिल्हाधिकारी राहुल कर्डीले,पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली,मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे,अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, आदरणीय धर्मगुरु आदीची उपस्थिती होती.
या अभियानांतर्गत भारत सरकारच्या माय भारतच्या नेतृत्वाखाली ‘सरदार@150 युनिटी मार्च’ या देशव्यापी उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. याचे उद्दिष्ट देशातील युवकांमध्ये एकता, देशभक्ती आणि नागरी जबाबदारीची भावना जागृत करणे हे आहे. या मोहिमेद्वारे युवकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि नागरी सहभागातून ‘एक भारत, आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यास प्रोत्साहित केले जाईल.
या उपक्रमाद्वारे युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट करणे, तसेच विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवा पिढीला सक्रिय योगदान देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”
000000
No comments:
Post a Comment