Tuesday, October 7, 2025

वृत्त क्रमांक  1061

आपत्ती व्यवस्थापनासाठी एनडीआरएफ मार्फत परिचयात्मक सराव सत्रास सुरुवात 

नांदेड, दि. 7 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA) यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात दिनांक ६ ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाबाबत परिचयात्मक सराव सत्र (Familiarization Exercise Program 2025-26) आयोजित करण्यात आले आहे. 

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी जिल्हादंडाधिकारी कार्यालय यांच्यावतीने करण्यात आले असून, या कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे. 

प्रशिक्षणाचे संचालन NDRF 5 बटालियन पुणे युनिट मार्फत कमांडर रवींद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली १७ सदस्यीय पथकाद्वारे करण्यात येत आहे. प्रशिक्षणाचे नियोजन व समन्वय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे आणि म. सहायक बारकुजी मोरे यांनी केले आहे. 

 दि. ६ ऑक्टोबर रोजी या प्रशिक्षणाचा प्रारंभ नांदेड तालुक्यातील विष्णुपुरी येथील जि.प. हायस्कूलमध्ये झाला. या प्रसंगी पूर, भूकंप इत्यादी आपत्ती प्रसंगी करावयाच्या उपाययोजना, CPR प्रक्रिया, आपत्ती प्रसंगी वापरायचे साहित्य व साधने, तसेच आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध साधनसामग्रीतून बचाव साहित्य तयार करण्याच्या पद्धतींचा प्रत्यक्ष सराव घेण्यात आला. 

कार्यक्रमास NDRF युनिट अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, तंटामुक्ती समितीचे सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, स्थानिक अधिकारी, गावकरी, विद्यार्थी व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षणास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कु-हे आणि सहायक गौरव तिवारी हे उपस्थित राहिले. 

पुढील प्रशिक्षण सत्र दि. ७ ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता जवाहर नवोदय विद्यालय, शंकरनगर (बिलोली) येथे आयोजित करण्यात येणार असून, यामध्ये शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच महसूल, नगरपरिषद, पोलीस व पंचायत विभागातील स्थानिक शोध व बचाव पथक सदस्यांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहेत.

00000









No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...