वृत्त क्रमांक 1051
अनुकंपासह एमपीएससीच्या शिफारस पात्र 376 उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी
जिल्हा प्रशासनाचा पुढाकार ; शनिवारी देणार नियुक्तीपत्र
नांदेड, दि. 3 ऑक्टोबर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. शासनाने नव्याने लागू केलेल्या अनुकंपा नियुक्तीच्या सर्वसमोवशक सुधारित धोरणानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या उपक्रमास गती दिल्याने नांदेड जिल्ह्यातून अनुकंपा तत्वावर गट ‘क’ संवर्गात 70 उमेदवार व गट ‘ड’ संवर्गात 227 उमदेवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एम.पी.एस.सी.) शिफारस केलेल्या 79 उमेदवार असे एकूण 376 उमेदवारांना शासकीय नोकरीची संधी मिळाली आहे. ते लवकरच आपल्या आयुष्याची नव्याने सुरूवात करणार आहेत. शनिवार 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता कुसूम सभागृह, व्ही.आय.पी.रोड, नांदेड येथे होणाऱ्या रोजगार मेळाव्यात या उमेदवारांना पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली अनुकंपा भरतीची प्रक्रिया पार पाडण्यात आली.
शासकीय सेवेत कार्यरत असतांना अधिकारी व कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबीयांना सावरण्यासाठी कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्याचे सुधारित धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने पारित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मागील महिन्यात झालेल्या मेळाव्यात उमदेवारांना शासन निर्णय व नियुक्ती प्रकियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात अनुकंपा तत्वावर गट-‘क’ पदाकरिता यादीतील 70 उमेदवारांची, तर गट-‘ड’ पदाकरिता 227 उमेदवारांची नियुक्तीकरिता शिफारस करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही 79 उमेदवारांच्या नियुक्तीची शिफारस केली आहे.
मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेस गती आणून पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश असून या उमेदवारांना येत्या 4 ऑक्टोबर 2025 रोजीच्या कार्यक्रमात राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.
०००००
No comments:
Post a Comment