Thursday, August 28, 2025

वृत्त क्रमांक 910 

नायगाव तालुक्यात दोन ठिकाणी पुराच्या पाण्यातून

नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे काढले बाहेर

नांदेड दि. 28 ऑगस्ट :- नांदेड जिल्ह्यात 28 ऑगस्ट 2025 रोजी 17 मंडळात अतिवृष्टी व पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. नायगाव खै तालुक्यात 5 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. नायगाव तालुक्यातील नरसी गावात अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. तसेच देगलूर उदगीर रोड बंद झाला आहे. बिलोली नरसी रोड बंद झाला आहे. या परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे जलसंपदा विभागाच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील नदी, नाल्यांना येणाऱ्या पूरपरिस्थितीचा ते आढावा घेत आहेत. नागरिकांनी सतर्क राहून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. 

या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे नायगाव तालुक्यातील दत्तनगर/शंकरनगर भागातील घरामध्ये पाणी शिरले. स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने दोन ते तीन कुटूंबातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. यानंतरही दोन कुटूंबे अडकली होती. या दोन कुटूंबातील नागरिकांना नांदेड येथील मनपाच्या अग्नीशामक बचाव पथकाने बोटीच्या सहाय्याने सुरक्षितस्थळी हलविले. यामध्ये एकनाथ वाघमारे, सोनी एकनाथ वाघमारे, प्रज्ञा एकनाथ वाघमारे, प्रशिक एकनाथ वाघमारे, अनुसया भुजंगराव वाघमारे, कवीता सुभाषराव वाघमारे, सुशांत सुभाषराव वाघमारे, चाँद पठाण, आसमा चाँद पठाण, मोहम्मद  चाँद पठाण, ऐशिया चाँद पठाण यांची सूटका या पथकाने केली. 

तसेच नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे हळदा रोडवर स्कुलबस मध्ये 18 विद्यार्थी एक शिक्षक व ड्रायव्हरसह गाडी पुराच्या पाण्यात अडकली होती. नाल्यावरुन भरपूर पाणी वाहत असल्यामुळे गावातील नागरिक, महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी यांनी मानवी साखळी निर्माण करुन या सर्वाना सुरक्षित ठिकाणी हलविले. आता परिस्थिती नियंत्रणात असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंम्बे यांनी दिली आहे.  

हवामानाचा व पावसाचा अंदाज घेवून काल संध्याकाळी एसडीआरएफची टीम देगलूर येथे पाठविण्यात आली होती. या टीमने सांगवी उमर, मेदनकल्लूर, शेळगाव, तमलूर या पूरपरिस्थीती निर्माण होणाऱ्या गावांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी 2 हजार 251 नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे कार्य या टीमने केले आहे. आज सीआरपीएफची टिम नायगावला बचाव कार्य करुन धर्माबादला गेली आहे. तसेच  एसडीआरएफची टिम कंधारला बचाव कार्यासाठी पाठविली आहे. तसेच मनपाचे शोध बचाव पथक नायगाव तालुका येथे पोहोचून दोन यशस्वी बचावकार्य केले आहेत. 

सध्या सर्व जिल्ह्यात काही मंडळात मोठया प्रमाणात पाऊस सुरु असून नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

000000













No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...