Sunday, August 3, 2025

 वृत्त क्रमांक 799

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा 

नांदेड दि. २ ऑगस्ट :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार 4 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

सोमवार 4 ऑगस्ट रोजी मुंबई येथून विमानाने सायंकाळी 4.15 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने हिंगोलीकडे प्रयाण करतील. हिंगोली येथून रात्री 8 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

 वृत्त क्रमांक 800

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २० वा हप्ता वितरित 

कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी   येथे थेट प्रक्षेपण व तांत्रिक प्रशिक्षणाने शेतकऱ्यांमध्ये उत्साह

नांदेड दि. २ ऑगस्ट – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २० वा हप्ता वाराणसी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात वितरित करण्यात आला. या अंतर्गत देशभरातील सुमारे ९.७ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २०,५०० कोटींचा निधी जमा करण्यात आला.

उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील २.२१ लाख शेतकऱ्यांना ४८ कोटी रुपयांचा लाभ मिळाला. संपूर्ण राज्यात हा आकडा ४,६०० कोटी रूपयावर पोहोचला. कार्यक्रमात बनौली येथे ₹२,२०० कोटींच्या ५२ विकास प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास करण्यात आला.

सागरोळीत थेट प्रक्षेपण व मार्गदर्शन

या ऐतिहासिक कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण बिलोली तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे करण्यात आला. यावेळी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी हजेरी लावून कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. शेतकऱ्यांना यावेळी केंद्र शासनाच्या कृषीविषयक योजनांची माहिती मिळाली आणि त्यांचे समाधान व्यक्त झाले.

फळपिकांवरील विशेष तांत्रिक प्रशिक्षण

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आंबा आणि लिंबवर्गीय फळपिकांच्या लागवड तंत्रज्ञानावर विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. यात आधुनिक लागवड प्रणाली, उत्पादन वाढीचे उपाय, सेंद्रिय शेती पद्धती आणि विपणन साखळी यावर भर देण्यात आला. डॉ संतोष चव्हाण विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांनी अत्यंत उपयुक्त माहिती देत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी विवेक गुडुप यांच्या हस्ते झाले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नवीन कृषी धोरणांचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी मंचावर डॉ माधुरी रेवणवार, प्रमुख कृषि विज्ञान केंद्र सगरोळी, डॉ कपिल इंगळे, वेंकट शिंदे, नांदेड प्रगतीचे शिवशेटे उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशिक्षणातून लाभ मिळाल्याचे सांगत आपले अनुभवही शेअर केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी कृषि विज्ञान केंद्राच्या कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर ज्ञानवृद्धीची संधी मिळाली. PM-KISAN योजनेच्या लाभांबरोबरच आधुनिक शेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. एकंदरीत हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी दुहेरी लाभाचा ठरला.

 ०००००

 वृत्त क्रमांक 801

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन

नांदेड दि.२ ऑगस्ट:-जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते काल जागतिक स्तनपान सप्ताहाचे (World Breastfeeding Week) उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा येते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन करताना स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरोग्य विभागाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दीप प्रज्वलन करून सप्ताहाचे उद्घाटन केले.

 मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सुपोषित बाळ पुरस्कार देण्यात येणार आहे. आपल्या मार्गदर्शनात, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाल्या की, "आईचे दूध हे बाळासाठी अमृतसमान आहे. पहिल्या सहा महिन्यांत बाळाला केवळ आणि केवळ स्तनपान देणे आवश्यक आहे. यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, बाळ निरोगी राहते आणि आई व बाळ यांच्यात भावनिक नाते अधिक दृढ होते." 

याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. संगीता देशमुख यांनी आरोग्य कर्मचारी,आशा सेविका आरोग्य विभाग आणि अंगणवाडी सेविकांना स्तनपानाबद्दल समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले. तसेच, गरोदर मातांना आणि स्तनदा मातांना योग्य आहार, स्वच्छता आणि स्तनपानाचे फायदे याबद्दल माहिती देण्यावर भर देण्यास सांगितले.

हा सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत चालणार असून, या काळात विविध ठिकाणी स्तनपानाचे महत्त्व विशद करणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच आयटी बॉम्बे मधे प्रशिक्षण दिलेल्या प्रशिक्षणार्थीने कार्यक्रमाला हजर असलेल्या सर्वांना स्तनपान या विषयाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

आयटी बॉम्बेने जे प्रशिक्षण दिले ते प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व स्तनदा माता व गरोदर मातांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करावे असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कवले यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले.

कार्यक्षेत्रातील बाळंतपण सरकारी दवाखान्यात व्हाव्यात यासाठी समाजात जनजागृती करावी व शासकीय संस्थेमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढवावे असे सूचना दिल्या.

या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख , महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात , सह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी राठोड, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका दराडे, वैशाली बेरलीकर, प्रा. आ केंद्रातील अधिकारी व कर्मचारी,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा सेविका आणि स्तनदा माता मोठ्या संख्येने माता उपस्थित होत्या.

०००००


No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...