Saturday, June 14, 2025

 वृत्त क्रमांक 617

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई  देण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री अतुल सावे

राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठिशी 

नांदेड, दि. 14 जून :- मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, वादळी वारा सुरु आहे. यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी नुकसान झाले आहे. अर्धापूर शिवारात केळी, पपई फळबाग असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठया प्रमाणात  नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचा अहवाल शासनास त्वरीत सादर केला जाईल. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.  

आज अर्धापूर तालुक्यातील चिंचबन, अर्धापूर शिवार, लहान शिवारात नुकसान झालेल्या केळी व पिकांची पाहणी त्यांनी केली यावेळी ते बोलत होते. या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत खासदार अशोक चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत आदींची उपस्थिती होती. 

यापूर्वी पालकमंत्री अतुल सावे यांनी नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे तात्काळ करुन अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले होते. त्यानुसार येत्या मंत्रीमंडळ बैठकीत नुकसानीचा अहवाल सादर करुन नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अर्धापूर तालुक्यातील चिंचबन येथील शेतकरी ज्ञानेश्वर शेट्टे, अर्धापूर शिवारातील व्यंकटराव साखरे, लहान शिवारातील गिरीश कल्याणकर व विठ्ठल  इंगळे यांच्या शेतात जाऊन केळी व पपई या पिकांच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.   

पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला आढावा  

पालकमंत्री अतुल सावे यांनी आज नांदेड शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यात अतिवृष्टी व वादळामुळे नुकसान झालेल्या केळी व पपई या फळ पिकांचा तसेच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्वरीत अहवाल तयार करुन शासनाला सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करुन उपयुक्त सूचना दिल्या.  

जिल्ह्यातील केळी या पिकाच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती विशेष बाब म्हणून मदत मिळवून देण्याची मागणी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. यासह जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली.       

या बैठकीस खासदार अशोक चव्हाण, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत तसेच विविध विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती. 

000000











No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक  798 उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  शासकीय वसतिगृह योजना सुरू   नांदेड दि. 1 ऑगस्ट :- इतर मागास बहुजन कल्याण विभ...