Thursday, September 19, 2024

 विशेष वृत्त क्र. 852 

नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना

25 टक्के अग्रीम देण्याच्या विमा कंपनीला सूचना 

नांदेड दि. 19 सप्टेंबर :- नांदेड जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे जिल्हास्तरीय समितीने आपले निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मोबदला देण्यासाठी असलेल्या नियमानुसार पिक विमा कंपन्यांनी 25 टक्के अग्रीम तातडीने द्यावा, अशी सूचना विमा कंपनीला करण्यात आली आहे.     

जिल्हास्तरीय समितीने नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 अंतर्गत हंगामातील प्रतिकुल परिस्थिती अर्थात मिड सेशन ॲडव्हरसिटी अशी अधिसूचना लागू केली आहे. त्यामुळे समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित आहे. त्यामुळे समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना लागू केली आहे. त्यामुळे सर्व महसूल मंडळातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना विहित मुदतीत नुकसान भरपाई अग्रीम रक्कम अदा करण्याचे निर्देश जिल्हास्तरीय समितीने विमा कंपनीस दिले आहेत. 

सद्यस्थितीत हंगामतील प्रतिकूल परिस्थिती या घटकांअंतर्गत 25 टक्के अग्रीम रक्कम मिळणार असून उर्वरीत रक्कम स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत पंचनामे व पिक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीनुसार मिळेल याची सर्व शेतकरी बंधूनी नोंद घ्यावी. मोबदला कसा मिळेल हे समजून घ्यावे. कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे.

000000 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...