Monday, August 19, 2024

वृत्त क्र. 736                          

                              सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार

31 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 19 ऑगस्ट : राज्य शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने महाराष्ट्र उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृकतेसह जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्य, पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाणार आहे.

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा नि:शुल्क आहे. स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईचा https://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून परिपूर्ण भरलेले अर्ज 31 ऑगस्टपर्यत   mahotsav.plda@gmail.com ईमेलवर सादर करावेत.

7 सप्टेबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थाच्या उत्सव स्थळाला भेट देतील आणि  जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. नांदेड जिल्ह्यातून 1 शिफारस राज्यस्तरीय परीक्षणासाठी पाठविली जाईल. राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 2 लाख 50 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळानी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असेही प्रसिध्दीपत्रकाने कळविले आहे.

00000 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...