Thursday, July 11, 2024

 वृत्त क्र. 578

एक रुपयात पीक विमा योजना

काढण्याचे शेवटचे 4 दिवस बाकी

शेतकऱ्यांनी तातडीने लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

नांदेड, दि. 11 जुलै :- केवळ 1 रुपयामध्ये शेतातील पिकाचा पीक विमा काढला जातो. केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणात यासाठी आर्थिक तरतूद करते. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक संरक्षित केले नसतील त्यांनी तातडीने पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

यासंदर्भात आज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी व्हिडिओ संदेश जारी करतांना स्पष्ट केले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ यावर्षी घेतला आहे. यावर्षी 97 टक्के पाऊस आतापर्यंत आला असून पिके संरक्षित करणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी पीक विमा योजनेमध्ये 11 लाख शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. मात्र यावर्षी गुरूवार 11 जुलै पर्यंत 7 लाख 45 हजार शेतकऱ्यांनीच पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेतून नांदेड जिल्ह्यामध्ये 400 कोटीपेक्षा अधिक लाभ शेतकऱ्यांना झाला आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी लक्षात घेता प्रत्येक गावागावात यासंदर्भात जनजागृती व्हावी. केवळ 1 रुपयामध्ये सेवाकेंद्र,  सेतूकेंद्र व बँकेत जाऊन प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेता येतो.

शेवटच्या तारखेची वाट बघू नका
पीक विमा योजनेसाठी 15 जुलै शेवटची मुदत आहे. परंतू शेवटच्या तारखेला पीक विमा भरतांना पोर्टलवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्यापूर्वीच आपल्या सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये वेळेला महत्त्व असते त्यामुळे मुदतवाढ दिली जाणार नाही, हे लक्षात घेऊन सर्व शेतकऱ्यांनी याबाबत तातडीने पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
00000




No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...