Saturday, July 20, 2024


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेडच्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शिबीर
महिलांनी लाभ घेण्याचे सीईओ करणवाल यांचे आवाहन
नांदेड दि. 20 जुलै : नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कॅम्प ( शिबीर ) लावण्यात आले आहे. कार्यालयीन वेळेतील या कॅम्पमध्ये सर्व पात्र महिलांनी अर्ज दाखल करावे,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे.
जिल्हाभरातील आपल्या महिला भगिनींसाठी आज जाहीर करण्यात आलेल्या एका व्हिडिओ संदेशामध्ये त्यांनी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीच्या,मध्यस्थाच्या आमिषाला बळी न पडता कोणाला एक पैसा ही न देता सरळ सरळ ग्रामपंचायतमध्ये लागलेल्या कॅम्पमध्ये महिलांनी आपले अर्ज दाखल करावे, असे आवाहन केले आहे. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये 11 ते 2 या वेळेमध्ये अंगणवाडी सेविका सर्वांचे अर्ज स्वीकारणार आहे.त्यामुळे सर्वांनी या काळात ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आपल्या अर्ज ऑफलाइन पद्धतीने द्यावे.
अर्ज भरण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत असून आधार कार्ड, केसरी किंवा पिवळी शिधापत्रिका,पासपोर्ट फोटो,बँक पासबुक याच कागदपत्रांची आवश्यकता आहे. पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड असेल तर मात्र तहसील कार्यालयातून उत्पन्नाचा दाखला प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.त्यामुळे हे कागदपत्र घेऊन अंगणवाडी सेविकेची भेट घेण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. यासाठी कुठल्याही मध्यस्थाला न भेटता थेट ग्रामपंचायत कार्यालय मधून आपले अर्ज भरून घ्यावे,असे आवाहन त्यांनी केले आहे.
ज्या महिला ऑनलाइन पद्धतीने ॲपवर अर्ज दाखल करणार असेल त्यांनी मग ऑफलाइन अर्ज करू नये.ऑनलाइन अर्ज करताना आपल्या आधार कार्डवर जसे नाव असेल तसेच अपलोड करावे. कारण या योजनेतून दर महिन्याला दीड हजार रुपये आपल्या बँक अकाउंटमध्ये थेट जमा होणार आहे.यासाठी आधार कार्ड जोडल्या गेलेले बँक अकाउंट अधिकृत आहे.थेट बँकेत जमा होणाऱ्या या प्रक्रियेसाठी आपल्या आधार कार्डवरील नाव ऑनलाइन अर्जामध्ये असणे आवश्यक आहे.महिलांनी याची काळजी घ्यावी,असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महानगरपालिकेचे 22 केंद्र सुरू
महानगरपालिका क्षेत्रामध्ये यापूर्वीच महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी नांदेड महानगराच्या विविध भागात अधिकृत अर्ज दाखल करण्यासाठी 22 केंद्र उघडली आहेत. या केंद्रामध्येच महानगरपालिका क्षेत्रातील अडीच लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांनी अर्ज दाखल करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिकृत ठिकाणी अर्ज भरा
दरम्यान, जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत असो वा महानगरपालिका क्षेत्र अधिकृतरित्या अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण निश्चित झाले असून नागरिकांनी ग्रामीण व शहरी भागात शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या अधिकृत शिबिरांमध्येच अर्ज दाखल करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलेले आहे. महानगरपालिका व ग्रामपंचायत या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी या कार्यात महिला भगिनींना योग्य ती मदत करावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
0000


 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...