Tuesday, July 2, 2024

 माहितीचा अधिकार; द्वितीय अपिलासाठी एसएमएस, ई- मेल, 

व्हॉटसॲप ग्रुप व वेबसाईटवर नोटीस, निर्णय मिळणार

  छत्रपती संभाजीनगर दि.२(जिमाका)- माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाकडे असणाऱ्या द्वितीय अपिल सुनावणीसाठीची नोटीस तसेच अपिल निर्णय इ. आता एसएमएस, ई-मेल. व्हॉट्स ॲप ग्रुप व वेबसाईटवर देण्यात येण्याची व्यवस्था खंडपीठाने केली आहे, अशी माहिती राज्य माहिती  आयोगाच्या खंडपीठ छत्रपती संभाजीनगरचे राज्य माहिती आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली आहे.

राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाद्वारे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, द्वितीय अपिलासाठी  सुनावणीची नोटीस ही टपालाद्वारे पाठविण्यात येते. मात्र बऱ्याचदा या नोटीस अपिलार्थिंना, जनमाहिती अधिकाऱ्यांना वेळेत प्राप्त होत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यासाठी द्वितीय अपिल सुनावणीसाठी अपिलार्थी, जनमाहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी यांना एसएमएस, ई- मेल, वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच त्या त्या जिल्ह्याच्या नोडल अधिकाऱ्यांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर सुद्धा ह्या नोटीस उपलब्ध करुन देण्यात येतील.  आयोगाचे संकेतस्थळ www.sic.maharashtra.gov.in वर देखील नोटीस, अपिल निर्णय पाठविण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधितांनी आयोगाच्या वेबसाईटचे नियमित अवलोकन करुन नोटीस प्राप्त  करुन घ्यावी व सुनावणीस उपस्थित रहावे. आयोगाकडे द्वितीय अपिल दाखल केलेल्या  नागरिकांनी व खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील आठही जिल्ह्यातील कार्यालयांनी याची नोंद घ्यावी असेही राज्य माहिती आयुक्त राज्य माहिती आयोग खंडपीठ छत्रपती संभाजीनगर मकरंद रानडे यांनी कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...