Saturday, March 30, 2024

वृत्त क्र. 285 दिनांक 29 मार्च 2024

निवडणूक खर्च निरीक्षकांची एमसीएमसी कक्षाला भेट

 

जाहिरात व पेडन्यूज खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन

 

 पेडन्यूज स्वरूपात सारख्या बातम्या आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश

 

नांदेड, दि. 29 : लोकसभा निवडणुकीमध्ये जाहिरातींवर होणाऱ्या खर्चाची माहिती नियमितपणे खर्च विभागाला सादर करणे,  न्यूज स्वरूपात माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाची जबाबदारी असून याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन नांदेड लोकसभा मतदार संघासाठी दाखल दोन्ही खर्च निरीक्षकांनी केले आहे. 

नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी ८५- भोकर, ८६- नांदेड उत्तर, ८७- नांदेड दाक्षिण या तीन विधानसभेसाठी खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांचे आगमन  दोन दिवसांपूर्वी झाले. तर ८९- नायगाव, ९०- देगलूर, ९१- मुखेड या तीन अन्य विधानसभा क्षेत्रासाठी दुसरे खर्च निवडणूक निरीक्षक मगपेन भुतिया यांचे गुरुवारी रात्री आगमन झाले. दोन्ही अधिकाऱ्यांनी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाला ( एमसीएमसी ) भेट दिली. एमसीएमसी केंद्रामध्ये माध्यम कक्षाचे प्रमुख जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवदे एमसीएमसीचे सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी त्यांचे स्वागत केले. 

एमसीएमसी समितीमार्फत वृत्तपत्रात येणाऱ्या राजकीय जाहिरातींना प्रमाणित केले जाते. याशिवाय वृत्तपत्रात, विविध वाहिन्यांवर तसेच सोशल माध्यमांवर उमटणाऱ्या जाहिराती, बातम्या, पोस्ट बघून यामध्ये पेड न्यूजच्या प्रकारात माहिती दिली तर जात नाही याचे निरीक्षण केले जाते. सोशल माध्यमांवर छुपा प्रचार सुरू तर नाही ना याची देखील पाहणी केल्या जाते. छुप्या पद्धतीने, परवानगी न घेता पेड न्यूज च्या माध्यमाने उमेदवारांनी प्रचार सुरू केला असल्यास एमसीएमसी समिती झालेला सर्व खर्च त्यांच्या खात्यामध्ये जिल्ह्याच्या खर्च विभागामार्फत दाखल करते. 

दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या बैठकीमध्ये एमसीएमसीच्या कामकाजाची पाहणी केली. अनेक वर्तमानपत्रात सारख्या बातम्या दिल्या जात असेल तर उमेदवारांना व प्रसारित करणाऱ्या वृत्तपत्रांना नोटीस जारी करा असे निर्देश यावेळी दोन्हीही खर्च निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसात वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांची पाहणी केली तसेच सारख्या बातम्या वृत्तपत्रांनी देऊ नये, अन्यथा अर्ज दाखल केल्यानंतर व एकदा उमेदवारी निश्चित झाल्यानंतर उमेदवारांच्या खर्चामध्ये ही रक्कम खर्च निरीक्षकांनी मान्यता दिल्यास येऊ शकते असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. यावेळी एमसीएमसी कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते.

00000






No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्र.   74   नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतन चा जेफ्रॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार   ·          विद्यार्थ्या...