वृत्त क्र. 141
महासंस्कृती मेळाव्यात समृद्ध वारशांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे नंदगिरी किल्ल्यावर प्रदर्शन
• जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन
• जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ, जीवनशैली, निसर्ग, स्थापत्यकला, पर्यटन इ. छायाचित्रांचे प्रदर्शन
नांदेड (जिमाका) दि. 17 :- गोदावरी तीराच्या हजारो वर्षाच्या संस्कृतीत पराक्रमाच्या गड किल्ल्यांपासून आस्थेच्या मंदिरांपर्यंत आणि आपल्या चालीरीतींपर्यंत समृद्ध वारसा नांदेड परिसराला लाभला आहे. या समृद्ध वारशांचे जीवंत चित्रण असणारे प्रदर्शन आजपासून दोन दिवस महासंस्कृती महोत्सवात सुरू झाले आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
महासंस्कृती महोत्सवानिमित्त नांदेड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड येथील नंदगिरी किल्ल्यावर आज दोन दिवशीय भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, नायब तहसिलदार मकरंद दिवाकर, पत्रकार शंतनू डोईफोडे, सुरेश जोंधळे आदींची उपस्थिती होती.
सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेडच्या होळी परिसरातील नंदगिरी किल्ला येथे हे छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. जगदंब ढोल ताशा पथक, नांदेड यांच्यावतीने ढोल ताशाच्या गजरात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. दिनांक 17 व 18 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत हे छायाचित्र प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात नांदेड जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ, जीवनशैली, निसर्ग, स्थापत्यकला, पर्यटन इत्यादी विषयावर छायाचित्र प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेषतः शाळकरी मुले महाविद्यालयीन विद्यार्थी अभ्यासक छायाचित्रकार कलाप्रेमींनी आपल्या या वारशांच्या संदर्भात जाणून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment