Thursday, December 28, 2023

वृत्त क्र. 906

अनाधिकृत धाबे अथवा हॉटेलमध्ये मद्य प्राशन कराल तर कारागृहात थेट रवानगी

- राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे  

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक यावर नियंत्रणासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग दक्ष आहे. नववर्षाच्या स्वागताचा आनंद साजरा करतांना कोणाच्याही हातून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी ही प्रत्येकांवर आहे. मद्याची अवैध निर्मिती व विक्री याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुढीलप्रमाणे नियोजन केले आहे.

 

अनुज्ञप्ती वेळेत शिथिलता

नववर्षाच्या स्वागताला शासनाने अनुज्ञप्त्याच्या बंद करण्याच्या वेळेत सुट देवून एफएल-2 व एफएल/बीआर-2 रात्री 1 वाजे पर्यंत, एफएल-3 म्हणजे परमीट रुम व एफएल-4 म्हणजे क्लब  पहाटे 5 वाजे पर्यंत, आणि सीएल-3 म्हणजे देशी दारु दुकान रात्री 1 वाजे पर्यंत अनुज्ञप्त्यांना मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली  आहे.

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाची सहा पथके

या पथकामध्ये एक निरीक्षक, दोन दुय्य्म निरीक्षक व इतर कर्मचारी असे असणार आहे. या पथका मार्फत अवैध मद्य निर्मिती /विक्री/ वाहतूकीवर विशेष लक्ष राहणार आहे. आक्षेपार्ह काही काढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

 

रात्रगस्त

वरील पथक कार्यक्षेत्रात गस्त घेणार आहे. विशेषत: रात्रगस्त घेवून अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.

 

नाकाबंदी

सिमावर्ती भागात व शहाराच्या मोक्याच्या ठिकाणी वरील पथके नाकाबंदी करणार आहे. ज्याव्दारे सर्व संशयीत वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अवैध मद्य वाहतूकीवर विशेष लक्ष राहणार आहे.

 

सराईत गुन्हेगारांवर पाळत

यापुर्वी बनावट व परराज्यातील मद्याच्या गुन्ह्यातील आरोपींवर व सराईत गुन्हेगारांवर पाळत ठेवून संशयास्पद हालचाल वाटल्यास अधीक लक्ष ठेवून आक्षपार्ह आढळून आल्यास कठारे कारवाई करण्यात येईल.

 

अवैध ढाबे/हॉटेल/खानावळ/रिसोर्ट/अन्य ठिकाणी होणाऱ्या पार्टीवर विशेष लक्ष

या विभागाच्या सहाही पथकाकडून विनापरवाना चालु असलेल्या अवैध ढाबे/हॉटेल/खानावळ/रिसोर्ट/अन्य ठिकाणी चालु असलेल्या सार्वजनिक दारुच्या गुत्त्यावर विशेष लक्ष ठेवून सातत्याने गस्त घेतली जाणार आहे. सदर ठिकाणी मद्य पिण्यास मालकाने परवानगी दिल्यास मालक/चालकावर तसेव मद्य प्राशन करण्याऱ्या ग्राहकावर कारवाई करण्यात येईल.

 

झालेली कारवाई

चालु वर्षात अनधिकृत ढाब्यावर, चायनीजवर किंवा हॉटेलात मद्य प्राशन करताना आढळल्यास मद्यपी आणि मालकांवर एकुण 18 प्रकरणात आता पर्यंत एकुण झालेला दंड 4 लाख 95 हजार रूपये इतका आहे.    महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (क), (ख) अन्वये अवैध हॉटेल/धाबा/क्लब इत्यादी चालक मालक यांनी अवैध हॉटेल/धाबा/क्लब इत्यादी मध्ये शासन मान्य अनुज्ञप्ती नसतांना ग्राहकांना मद्यसेवनास परवानगी दिल्यास त्यांना तीन ते पाच वर्षा पर्यंत कारावासाची शिक्षा, किंवा रु.25 हजार ते 50 हजार रुपया पर्यंत दंड  किंवा दोन्ही होऊ शकते. तसेच ग्राहकांनाही कलम 84 अन्वये 5 रुपयापर्यंत दंड होवू शकतो.

 

एक दिवसासाठी परवाना

31 डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतार्थ पार्टी अथवा मेजवानी मध्ये मद्यसेवनाचे आयोजन करावयाचे असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वतीने विशेष परवानाची तात्काळ सोय उपलब्ध आहे. नववर्ष स्वागताला हॉटेल, रिसॉर्टमध्ये पार्टीचे आयोजन केले जाते. यासाठी मद्य ठेवले जाते. हॉटेल, रिसॉर्टधारकांनी नववर्ष स्वागत पार्टीसाठी मद्य ठेवण्याबाबत एक दिवसाचा परवाना अर्ज करून घ्यावा. त्याकरिता या विभागाच्या https://exciseservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जावून आगोदर प्रस्तावित जागेची Premises Registration या पर्यायावर जावून नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

जागेची नोंदणी करण्यासाठी जागेचा पुरावा नमुना 7/12 अथवा नमुना 8 चा उतारा, बांधकाम परवाना, जागेचे नकाशे, जागामालकाचे आधार कार्ड  व इतर प्रकरण निहाय आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. जागेची नोंदणी झाल्यानंतर विहित शुल्क भरणा केल्यास तात्काळ नमुना FL-IV A अनुज्ञप्ती देण्यात येईल. अधिक माहितीसाठी वरील संकेतस्थळावर भेट द्यावी. अथवा 8379825826 या क्रमांकावर संपर्क करावा. मद्यसेवन परवाना नसतांना मद्य सेवन केल्यास किंवा मद्य बाळगल्यास कारवाई करण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

00000

वृत्त क्र. 905

 सन 2024 मधील जयंती व राष्ट्रीय दिन साजरे

करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 28  :- राष्ट्र पुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने निर्देशित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील संबंधित शासकीय कार्यालयांनी या शासन निर्देशांचे अवलोकन करावेअसे आवाहन करण्यात आले आहे. 

सन 2024 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतचे सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक दिनांक 27 डिसेंबर 2023 अन्वये दिलेल्या सुचनेनुसार सन 2024 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परिपत्रकातील परिशिष्टात दर्शविलेले कार्यक्रम सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि यासंदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावे. अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत. शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्देशीत केले आहे.

000000

वृत्त क्र. 904

 लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. सदर लोकशाही दिन सोमवार 1 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. 

 

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाकडे लोकशाही दिनातरन प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 

 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील,असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे यांनी कळविले आहे.

0000

वृत्त क्र. 903

 त्या अवैध ताडी विक्रेत्याविरुद्ध   

एमपीडीए अंतर्गत कारवाई 

 

·   राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाची पहिलीच यशस्वी कारवाई

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- शहराच्या नल्लागुट्टाचाळ येथील शाम सुरेश येन्नेली या 27 वय वर्षाच्या आरोपीला अवैध ताडी विक्री करतांना वारंवार पकडण्यात आले होते. त्याच्या विरूद्ध राज्य उत्पादन शुल्क, नांदेड ब विभागातर्फे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 93 अंतर्गत उपविभागीय दंडाधिकारी नांदेड यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. उपविभागीय दंडाधिकारी यांनी 25 हजार रक्कमेचे चांगल्या वर्तवणुकीबाबत बंधपत्र घेण्यात आले होते. आरोपीला वारंवार संधी देऊनही त्याने वर्तवणुकीत सुधारणा केली नाही. आरोपी हा पुन्हा अवैध ताडी विक्री करतांना आढळून आल्याने त्याच्याविरूद्ध 11 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. त्याअनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी एमपीडीए अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत  यांनी मंजुरी देऊन कारवाईचा बडगा उगारला. आरोपी शाम येन्नेली याला छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.  

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्याविरूद्ध विशेष मोहिम हाती घेतली आहे. याअंतर्गत एमपीडीए कायद्यानुसार झालेल्या या कारवाईमुळे सर्व गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला आहे.

 

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्यांविरूद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करून त्यांना एमपीडीए अंतर्गत थेट कारागृहात रवानगी करण्यात येईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे. या कारवाईसाठी निरीक्षक ए. एम. पठान, दुय्यम निरीक्षक दिनेश सुर्यवंशी, ए. जी. शिंदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बालाजी पवार, मो. रफी, पी. पी. इंगोले, शिवदास नंदगावे यांचा सहभाग होता.

 

अवैध मद्य निर्मिती अथवा विक्री अथवा वाहतुक यासंदर्भात कोणाचीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हॅटसॲप क्रमांक 8422001133, तसेच दूरध्वनी क्र. 02462-287616 यावर  संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

00000

वृत्त क्र. 902

 सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी

शुक्रवारी मुखेड व देगलूर येथे मेळावा 


नांदेड (जिमाका) दि. 28 :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी  शुक्रवार 29 डिसेंबर 2023 रोजी  पंचायत समिती सभागृह  मुखेड   पंचायत समिती सभागृह देगलूर येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या मेळाव्यात कर्ज मंजुरीचे प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे, मंजुरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी अनुषंगिक व आवश्यक त्या कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच कर्ज प्रस्ताव प्रलंबित असलेल्या अर्जदारांनीही आवश्यक त्या कागदपत्रासह/कारणासह पूर्ततेसाठी उपस्थित रहावेअसे कळविले आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2023-24 नांदेड जिल्हयास एकु 900 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्याचे महाराष्ट्र शासनाचे लक्षांक आहे. 

मेळाव्यास येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, दोन फोटो, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने  ही आवश्यक  कागदपत्रे सोबत आणावीत.  ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी सदर योजनेचे https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ आहे. तालुक्यातील व परिसरातील पात्र-होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

000000

वृत्त क्र.901

 ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी

खाजगी इमारत धारकांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  जिल्ह्यातील कंधार, मुखेड व लोहा येथे संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींचे प्रत्येकी 1-1 वसतिगृह मंजूर आहे. ही वसतिगृहे भाड्याच्या इमारती घेवून सुरु करण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने कंधार, मुखेड व लोहा या तालुक्याच्या ठिकाणी 100 विद्यार्थी क्षमता असलेल्या वसतिगृहासाठी सर्व सोयीयुक्त इमारती भाडयाने घेण्यात येणार आहेत. खाजगी इमारत धारकांनी आपल्या इमारती उपलब्ध सोयी-सुविधा, मालकी हक्काबाबतचे कागदपत्रे व इमारतीचे फोटोसह आपले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांच्याकडे 4 जानेवारी 2024 पर्यत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

 

कंधार, मुखेड व लोहा या तालुक्याच्या ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहे प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेची शासन निर्णय 15 जून 2021 अन्वये मंजूर करण्यात आलेली आहे. ही वसतिगृहे सुरु करण्यासाठी इमारती भाड्याने घेवून वसतिगृहे सुरु करण्याचे निर्देश आहेत. कंधार येथे मुलांचे 1 व मुलींचे 1 असे एकूण 2 आणि मुखेड तालुक्याच्या ठिकाणी मुलांसाठी 1 व मुलींसाठी 1 असे एकूण 2 वसतिगृह सुरु करण्यात येणार आहेत. तर लोहा तालुक्याच्या ठिकाणी मुलांचे 1 व मुलींचे 1 असे एकूण 2 वसतिगृह सुरु करण्यात येणार आहेत.

0000

वृत्त क्र. 900

 अनु. जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी 

तालुकास्तरावर योजनाच्या माहितीबाबत विशेष मेळाव्यांचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- कृषि विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना  अंतर्गत अनु. जाती व अनु. जमाती संवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरावर या पंधरवड्यात विशेष मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी लक्षांक उपलब्ध असून या योजनेअंतर्गत लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झालेले आहे. तरी जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.  

 

कृषि विभागामार्फत तालुकास्तरावर आयोजित मेळाव्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान  व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या विविध घटकांची माहिती देण्यात येणार आहे. प्रामुख्याने सामुहिक शेततळेवैयक्तीक शेततळे अस्तरीकरणकांदाचाळपॅक हाऊस, 20 एचपीच्या आतील छोटे ट्रॅक्टरपावर टीलरप्लास्टिक मल्चींगहरितगृहशेडनेट हाऊसशितगृहरायपनिंग चेंबर इत्यादी घटकांची तसेच ठीबक व तुषार सिंचनबाबत माहिती देण्यात येणार आहेअसे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

00000

वृत्त क्र. 899

 प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने

तालुका स्तरावर शिबीर कार्यालयाचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीकरीता जानेवारी 2024 ते जून 2024 या कालावधीत पुढीलप्रमाणे तालुका शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट ही महिना सुरू होण्याच्या दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरू करण्यात येईल. अपाईमेंट घेतलेल्या सर्व अर्जदारांनी याबाबतची नोंद घेऊन शिबीर कार्यालयास उपस्थित रहावेअसे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

 

कंधार तालुक्यासाठी जानेवारी, 2 फेब्रुवारी, 4 मार्च, 3 एप्रिल, 3 मे, 4 जून असे राहील तर धर्माबाद जानेवारी, 6 फेब्रुवारी, 6 मार्च, 5 एप्रिल, 7 मे, 7 जून 2024. किनवट तालुक्यासाठी जानेवारी, 8 फेब्रुवारी, 12 मार्च, 10 एप्रिल, 10 मे, 10 जून. मुदखेड तालुक्यासाठी 15 जानेवारी, 14 फेब्रुवारी, 14 मार्च, 16 एप्रिल, 15 मे, 14 जून. माहूर तालुक्यासाठी 17 जानेवारी, 16 फेब्रुवारी, 18 मार्च, 18 एप्रिल, 17 मे, 18 जून. हदगाव तालुक्यासाठी 19 जानेवारी, 20 फेब्रुवारी, 20 मार्च, 22 एप्रिल, 22 मे, 21 जून. धर्माबाद तालुक्यासाठी 22 जानेवारी, 23 फेब्रुवारी, 22 मार्च, 24 एप्रिल, 24 मे, 24 जून. हिमायतनगर तालुक्यासाठी 25 जानेवारी, 27 फेब्रुवारी, 26 मार्च, 26 एप्रिल, 28 मे, 26 जून. किनवट तालुक्यासाठी 30 जानेवारी, 29 फेब्रुवारी, 28 मार्च, 30 एप्रिल, 30 मे, 28 जून 2024  याप्रमाणे तालुका शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

0000

Wednesday, December 27, 2023

 वृत्त क्र. 898

  

जलजीवन मिशनचे 15 कंत्राटदार काळ्या यादीत

387 कंत्राटदारांवर दररोज 500 रुपयाचा दंड

 

· जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल

यांनी समितीच्या शिफारशीवर केले शिक्का मोर्तब

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यातील प्रत्येक घरांना नळांने पिण्याचे पाणी पोहोचावे या उद्दात्त हेतूने केंद्र व राज्य सरकारने हर घर नल से जल ही योजना सप्टेंबर 2020 पासून सुरू केली. नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या योजनेतून सुमारे 1 हजार 234 योजनांद्वारे हे काम सुरू होते. यातील सुमारे 387 योजनांचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी कामाची गती संथ व दिरंगाईने सुरू ठेवल्याने त्यांच्या विरूद्ध अटी व शर्तीनुसार कारवाई करण्याचा बडगा अखेर जिल्हा परिषदेने उचला. यात 387 कंत्राटदारांना अटी व शर्तीनुसार दिलेल्या मर्यादेपेक्षा जितका अधिक विलंब लागेल त्या कालावधीतील प्रत्येक दिवसाला 500 रुपये दंड ठोठावला जाईल. या कंत्राटदारा व्यतिरिक्त 15 कंत्राटदारांनी दिलेल्या निकषाप्रमाणे वेळेत काम सुरूच न केल्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेने काळ्या यादीत टाकले.

 

नांदेड जिल्ह्यातील जलजीवन मिशनचे हे काम दिलेल्या अटी व शर्तीनुसारच व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी एक स्वतंत्र समिती नेमली होती. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्य लेखा अधिकारी या सदस्यांची ही समिती होती. या समितीने जिल्ह्यातील योजनांचा आढावा घेतला. त्यात 387 कंत्राटदारांसह इतर 15 कंत्राटदार यांचा निष्काळजीपणा उघड झाल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाईचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना सादर केला होता.  त्यांनी तो जशास तसा स्विकारून कारवाईवर शिक्का मोर्तब केले.

 

हर घर नल से जल या संकल्पनेतून जिल्ह्यातील 1 हजार 540 गावात 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळजोडणी देऊन दर दिवशी 55 लिटर शुद्ध पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. सदर उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत रितसर प्रक्रिया पूर्ण करून हे काम कंत्राटदारांना बहाल केले होते.

0000

 वृत्त क्र. 897

 

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

 

गुरूवार 28 डिसेंबर 2023 रोजी शासकीय विश्रामगृह कळंब जि. यवतमाळ येथून मोटारीने रात्री 9.15 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन, राखीव व मुक्काम.

 

शुक्रवार 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथून मोटारीने माहूरगडकडे प्रयाण. सकाळी 8.45 वा. माहूरगड येथे आगमन व दर्शन. सकाळी 9.30 वा. माहूरगड येथून मोटारीने आर्णी मार्गे डिग्रज जिल्हा यवतमाळकडे प्रयाण करतील.  

00000

 

 कृषी सेवक पदाची ऑनलाईन परीक्षा

16 व 19 जानेवारी, 2024 रोजी

लातूर, दि.20 (विमाका) :  शासनाच्या 18 ऑक्टोबर, 2023 रोजीच्या आदेशानुसार  पेसा क्षेत्रातील  पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन-पेसा क्षेत्र विभागातील जाहिरातीत नमुद कृषी सेवकाच्या एकूण 159 पदांसाठी ऑनलाईन परीक्षा आय.बी.पी. एस या कंपनीमार्फत 16 व 19 जानेवारी, 2024 रोजी राबविण्यात येणार आहे. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र आय. बी. पी. एस संस्थेकडून संबंधीतास उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

कृषी विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील कृषी सहायकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्यासाठी सरळसेवा पेसा व नॉन पेसा क्षेत्र पदभरतीसाठीची जाहिरात 11  ते 14 ऑगस्ट, 2023 या कालावधीत विभागस्तरावरून प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने 14 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडुन अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे, असेही प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

****

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...