Tuesday, November 21, 2023

 वृत्त

रेशीम शेतीसाठी नाव नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन  

 

·         20 डिसेंबर पर्यंत जिल्ह्यात महा-रेशीम अभियान-2024   

·        3 लाख 97 हजार रूपये तीन वर्षासाठी अनुदान

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळावे यादृष्टीने जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत महा-रेशीम अभियान-2024 हे गावोगावी जाऊन प्रचार व प्रसिद्धी करणार आहे. या अभियानाचा शुभारंभ अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी रेशीम विभागाच्या फिरत्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी रेशीम विकास अधिकारी एन.बी. बावगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

सदर योजना यापूर्वी जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत राबविण्यात येत होती. याची व्यापकता अधिक वाढावी यादृष्टीने आता ही योजना शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद, कृषि विभाग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनाअंतर्गत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हवामान रेशीम उत्पादनासाठी पोषक असून शेतकऱ्यांना आपल्या मर्यादित शेतीमध्ये याचे उत्पादन घेणे सहज शक्य केले आहे. या योजनेनुसार जिल्ह्यात मनरेगा निकषाअंतर्गत खुल्या प्रवर्गातील अल्पभूधारक असलेले शेतकरी पात्र ठरणार आहेत. याचबरोबर एस व एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना इतर सवलती नियमाप्रमाणे देण्यात आल्या आहेत.

 

या उद्योगातून वर्षातून 4 ते 5 पिके घेता येतात. त्यापासून अंदाजे दीड ते दोन लाख रूपय उत्पन्न घेता येऊ शकते. एकदा केलेली तुती लागवड 10 ते 15 वर्षे टिकते. पर्यावरण पूरक असलेल्या रेशीम उद्योगाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याची माहिती रेशीम विकास अधिकारी एन. बी. बावगे यांनी दिली. यावर्षी रेशीम उत्पादनासाठी एकुण 1 हजार एकर क्षेत्राचे लक्ष निर्धारीत करण्यात आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना / सिल्क समग्र अंतर्गत पहिल्यावर्षी एकुण 2 लाख 86 हजार 135, दुसऱ्या वर्षी 55 हजार 600, तिसऱ्यावर्षी 55 हजार 600 असे एकुण 3 लाख 97 हजार 335 रुपये अनुदानाचे स्वरूप असेल.

 

सिल्क समग्र-2 योजनेतून एसी/एसटीसाठी 4 लाख 50 हजार आणि इतर प्रवर्गासाठी 3 लाख 75 हजार एवढे अनुदान राहील. सद्यस्थितीत पाऊस वेळेवर पडत नसल्याने शेतकऱ्यांचा कल आता तीच पिके घेण्याकडे अधिक आहे. यादृष्टिने एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करून शेतीवर आधारीत जोडधंदा म्हणून रेशीम शेती ज्या शेतकऱ्यांकडे आठमाही पाणीपुरवठा असेल अशा शेतकऱ्यांनी प्रती एकर 500 रुपये व लागणारी कादगपत्रे संबंधित विभागाकडे जमा करावीत. याचबरोबर आपली नाव नोंदणी करावी, असेही आवाहन रेशीम विकास अधिकारी एन. बी. बावगे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय कृषि उत्पन्न बाजार समिती जवळ नवामोंढा नांदेड येथे प्रत्यक्ष अथवा मो. 9763689032, 9421551635 वर संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

000000






छायाचित्र : सदानंद वडजे, नांदेड 


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...