वृत्त क्र. 475
18 वर्षावरील नागरिकांचे आधार नोंदणी व
आधार कार्डचे अद्ययावतीकरण सुरु
नांदेड (जिमाका) दि. 4 :- आपल्या जवळच्या आधार केंद्रावर सर्व 18 वर्षावरील नागरिकांनी आधार नोंदणी करावी तसेच 10 वर्षापूर्वी ज्यांनी आधार कार्ड काढले आहेत त्यांचे अद्ययावतीकरण करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरु केली आहे. नागरिकांनी आपले आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करुन घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.
सर्व नागरिकांना आधार नोंदणी व आधार अद्ययावतीकरण कार्यवाही सुलभ होण्यासाठी सर्व आधार केंद्रानी आपल्या आधार केंद्रावर सर्व सूचनांचे माहिती फलक दर्शनी भागात लावावेत अशा सूचना प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. तसेच 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे आधार नोंदणी होत असल्याचे फलक सर्व ठिकाणी लावण्यात यावेत असे निर्देशही दिले आहेत. आधार नोंदणी बाबत नागरिकांच्या तक्रारी निवारण्यासाठी 1947 मदत क्रमांक व ई-मेल help@uidai.gov.in नागरिकांना दिसेल अशा दर्शनी भागात आधार केंद्र धारकांनी प्रदर्शित कराव्यात. नागरिकांना आधार नोंदणीबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांनी 1947 या क्रमांकावर कॉल करुन अथवा help@uidai.gov.in ईमेलवर तक्रार नोंदवून टोकन क्रमांक हस्तगत करावा, सदर टोकन क्रमांक व सविस्तर माहिती जिल्हा समन्वयक आधार जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे द्यावी असे कळविले आहे. तसेच आधार केंद्र धारकांनी प्रौढ नागरिकांचे आधार नोंदणी होत असल्याचे फलकही आधार केंद्रावर लावावेत अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
00000
No comments:
Post a Comment