Friday, March 24, 2023

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी

नवीन अर्ज करण्यास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2022-23 साठी पात्र विद्यार्थ्यांना नविन अर्ज करण्यासाठी  31 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपला अर्ज http://www.syn.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर भरुन त्या अर्जाची प्रत (प्रिंट) 31 मार्च 2023 पर्यत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक नांदेड येथे कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर नांदेड यांनी केले आहे.

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. यात भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 13 जून 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार थेट वितरीत करण्यात येते.

 

लाभाचे स्वरूप या योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पुढील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष पुढीलप्रमाणे राहतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये/शैक्षणिक संस्था याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम पुढीलप्रमाणे आहे. भोजन भत्ता 28 हजार रुपये, निवास भत्ता 15 हजार रुपये, निर्वाह भत्ता 8 हजार रुपये, प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम 51 हजार रुपये, वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. वरील एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल. 

 अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रे व संकेतस्थळ- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना या  http://www.syn.mahasamajkalyan.inसंकेतस्थळवर उपलब्ध आहे. गरजू विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून सदर अर्जाची एक प्रत सहाय्यक आयुक्त कार्यालयातील स्वाधार शाखेकडे जमा करावी, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...