वृत्त क्रमांक 32
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक
प्रक्रियेत सुक्ष्म निरीक्षकांचे पहिले प्रशिक्षण संपन्न
नांदेड (जिमाका) दि. 20 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी नांदेड जिल्ह्यासाठी जिल्ह्यातील 30 मतदान केंद्रावर होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेतील नवे बदल लक्षात घेऊन निवडणूक प्रक्रिया विहित पद्धतीने अधिकाधिक पारदर्शक होईल यादृष्टीने कामकाज करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांनी दिले.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या कार्यपद्धतीबाबत सुक्ष्म निरीक्षकांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात पहिले प्रशिक्षण संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संतोषी देवकुळे, निवडणूक कामकाजासाठी नियुक्त सुक्ष्म निरीक्षकांची उपस्थिती होती.
या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात 7 हजार 83 पुरुष मतदार तर 1 हजार 884 महिला मतदार असे एकुण 8 हजार 967 मतदार आहेत. सुक्ष्म निरीक्षकांना निवडणूक आयोगानी दिलेल्या कार्यपद्धतीनुसार कामकाज करावयाचे आहे. सुक्ष्म निरीक्षकांनी मतदान केंद्रावरील सर्व बाबींचे निरीक्षण करावे. कुठे चुकीचे मतदान होणार नाही, मतदार यादीतील एखादा मतदार मयत आहे का याची खात्री करणे, मतदानाची वेळ, मतदानाची दर दोन तासाला आकडेवारी नोंदवण्याची अचूक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. निवडणूक साहित्य हाताळण्याबाबत माहिती यावेळी दिली.
00000
No comments:
Post a Comment