Tuesday, December 27, 2022

 कोरोनाच्या आव्हानाला पेलण्यासाठी

नांदेड जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

 

जिल्ह्यातील कोविड समर्पित 12 रुग्णालयांमध्ये घेतली रंगीत तालीम

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे अधिक सुरक्षित  

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जगभर कोरोनाच्या नव्या लाटेसंदर्भात अधिक काळजी केली जात असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे नांदेड जिल्ह्यात त्यादृष्टिने जिल्हा प्रशासनातर्फे युद्धपातळीवर तयारी केली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकताच जिल्हातील आरोग्य सेवा-सुविधांचा आढावा घेऊन ज्यांचे लसीकरण राहिलेले आहे त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन त्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.

 

शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाने सर्व साधन व सेवा-सुविधांची रंगीत तालीम घेऊन पूर्व तयारी केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात वैद्यकियदृष्ट्या मुबलक प्रमाणात सेवा-सुविधा उपलब्ध आहेत. मागील कोविडच्या लाटेत सर्वाधिक 35 मे. टन पर्यंत ऑक्सिजनची मागणी गेली होती. त्यावेळेसच्या मागणीच्या तीनपट पेक्षा अधिक आता जिल्ह्यातील ऑक्सिजन क्षमता झाली आहे. सद्यस्थितीत 178.99 मे. टन ऑक्सिजन सुविधा आहे. यात आणखी 45.82 मे. टन ऑक्सिजन क्षमता वाढविली जात आहे. जिल्ह्यात समर्पित कोविड रुग्णालयामध्ये सुमारे 1190 खाटा अर्थात बेडस् सुविधा आहे.

 

मागील कोविड लाटेत कोविड रुग्णांच्या उपचारासाठी बेडसची संख्या 4 हजारापर्यंत वाढविण्यात आली होती. जिल्ह्यात सर्व शासकीय रुग्णालयामध्ये सुमारे 250 व्हेंटीलेटरची सुविधा आहे. हे सर्व यंत्रणा आज रंगीत तालमीमध्ये तपासून घेण्यात आली. भविष्यात गरज जर भासलीच तर त्यात कोणतीच त्रुटी असता कामा नये यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. टेस्टींग किटस् मुबलक प्रमाणात आहेत. मुखेड येथे उपजिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर केंद्र साकारले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे 68 रुग्णवाहिका तर शासकीय रुग्णालयाकडे इतर 36 रुग्णवाहिका असा एकुण 107 रुग्णवाहिका प्रत्येक ठिकाणी तयार आहेत. याचबरोबर इतर 25 रुग्णवाहिका जिल्ह्यात तत्पर आहेत.

 

जिल्हा प्रशासनाने कोविडच्यादृष्टिने पूर्व तयारी केलेली आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे यात वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता लसीकरण, मास्क यासाठी अधिक सतर्क राहून काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000      




No comments:

Post a Comment

मंत्री आणि राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे #पालकमंत्री , #सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली ...