Tuesday, October 18, 2022

सुधारित वृत्त

सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेमागे व्यापक दूरदृष्टीचा प्रत्यय*

- इंजिनिअर भिमराव हटकर

 

सामाजिक न्याय विभागाचा स्थापना दिन उत्साहात साजरा

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- नव्वद वर्षापूर्वी याच तारखेला पुण्यामध्ये सामाजिक न्याय विभागाची स्थापना करण्यात आली. एक व्यापक दूरदृष्टी ठेऊन हा विभाग तेंव्हा सुरू केला. मुंबई इलाख्यातील असपृश्य व जंगलात राहणाऱ्या जातींची चौकशी करण्यासाठी कमिटी नेमण्यात आली होती. यात भिल्ल, गोंड व इतर जाती यांच्या सामाजिक, सांपत्तीक व शिक्षण विषयक गाऱ्हाण्याची चौकशी करण्यासाठी स्टार्ट यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी होती. सदर कमिटीसाठी आणि सामाजिक न्यायासाठी आग्रही होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तेंव्हाच्या समाज सुधारकांनी आग्रह धरला होता. स्टार्ट कमिटीने यावरून सरकारकडे अनेक शिफारशी केल्या. यात मागासवर्गाच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी एक बॅकवर्ड क्लास डिपार्टमेंटची स्थापना करावी, अशी सूचना होती. या सूचनेवरुनच 15 ऑक्टोंबर 1932 रोजी या विभागाची स्थापना झाली, असे प्रतिपादन इंजि. भिमराव हटकर यांनी केले.

 

सामाजिक न्याय विभागाच्या 90 व्या स्थापना दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, राजीव एडके, प्रा. निरंजन कौर, डॉ. कोकरे, कवी बापू दासरी, अशोक गोडबोले, लेखाधिकारी पतंगे व मान्यवर उपस्थित होते.

 

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना आपण सर्वांनी एका बाबीकडे लक्ष वेधले पाहिजे. लोक कल्याणकारी राज्याचे व्रत घेऊन महाराष्ट्र राज्य आपली भूमिका पार पाडत आहे. अनेक नाविन्यपूर्ण योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी प्रयत्नाची शर्त करीत आहेत. सामाजिक न्यायाची व्याप्ती ही केवळ योजनांपुरती मर्यादीत नसून योजनांच्या परिघा पलिकडच्यांनाही विकासाच्या प्रवाहात कसे आणता येईल याबाबत संवेदना बाळगून अधिकारी अधिक जबाबदार झाल्याचे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाने ज्या विविध योजना इथे राबविल्या आहेत, त्या पथदर्शी म्हणून पुढे आल्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.  

 

यावेळी डॉ. निरंजन कौर, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अशोक गोडबोले, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, राजीव एडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन बापू दासरी यांनी केले.  

00000  








No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   94 ​ राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघास सुवर्ण तर मुलाच्या संघास रौप्य पदक नांदेड दि २४ :- गेल्या तीन...