पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी
सर्वाधिक प्राधान्य द्या
- जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी
· परस्पर हिताला जपत मोठ्या उत्साहात
गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्धार
नांदेड (जिमाका) दि. 29 :- गत दोन वर्षात इतर उत्सवासह गणेश उत्सव आरोग्याला प्राधान्य देत आपण मर्यादेत साजरा केला. यावर्षी आरोग्याचे आव्हान कमी असले तरी पर्यावरण संतुलनाचे आव्हान मात्र कायम आहे. हा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना आपण घरापासून ते गणेश उत्सव मंडळापर्यंत पर्यावरणपुरक हिताला अधिक प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन येथे आयोजित आज शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस महापौर जयश्रीताई पावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, शांतता समितीची सन्माननीय सदस्य गोविंदप्रसाद बालाप्रसाद बालानी, बाबा बलविंदर सिंघ, भदन्त पंच्चाबोधीजी थेरो, संपादक मुन्तजोबोद्यीन मुनिरोद्यीन, मो. शोएब मो. खालेद व इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील गणेश उत्सवासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक एक आठवड्यापूर्वी झाली. यात राज्य पातळीवर शासनाकडून पुरस्कार देण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागामार्फत राज्य पातळीवर उत्कृष्ट गणेश उत्सव मंडळासाठी रोख 5 लाख, 2 लाख 50 हजार आणि 1 लाख रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिली. उत्कृष्ट गणेश उत्सव निवडीसाठी शासनाने पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (प्लास्टिक आणि थर्माकोल याचा वापर नाही), ध्वनीप्रदुषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूल, सामाजिक सलोखा आदी विषयावर देखावा, सजावट या कार्यासाठी विशेष गुण शासनाने दिले आहेत. स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावा / सजावट आणि गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा याला सर्वाधिक प्रत्येकी 25 गुण देण्यात आलेले आहेत. निवडीच्या या निकषावरुन पर्यावरणपूरक गणेश उत्सवाला चालना देण्याचे शासनाचे धोरण स्पष्ट असल्याचे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले.
सोशल मिडियाचा गैरवापर झाल्यास कठोर कारवाई
- जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे
शांततापूर्ण गणेश उत्सव ही नांदेडची ओळख आहे. येथील
विविध धार्मिक स्थळातून संहिष्णुतेला अधिक प्राधान्य दिले गेले आहे. यावर्षीचा
गणेश उत्सव सर्व नांदेडकर तेवढ्याच जबाबदारीने व आनंदाने साजरा करतील. कोणीही
कायदाचा भंग करणार नाही याची मला खात्री असून सोशल मिडियावर पोलीसांचा कडा पाहरा
असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्पष्ट केले. गत एक वर्षाच्या
काळात नांदेड जिल्ह्यात किमान एक हजारावर व्यक्तींना आपण सोशल माध्यमाच्या गैर
वापराबद्दल कारवाई केली आहे. हे तरुणांनी लक्षात घेऊन अधिक सकारात्मक सामाजिक काम
करण्याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. डीजे सारख्या वाद्यांना बंदी
आहे. याचबरोबर प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणपतीच्या मूर्तींना अटकाव करण्यात आला आहे.
लोकांनीच कायदा समवेत स्वयंशिस्त पाळून प्रदूषण मुक्त व पर्यावरणयुक्त गणेश
उत्सवाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
विसर्जनाच्यावेळी मोठ्या गणेश मंडळांनी
आपली वेळ विभागून घ्यावी - महापौर जयश्रीताई पावडे
सर्वच गणेश उत्सव मंडळ एकाचवेळी विसर्जनासाठी बाहेर पडतात. प्रत्येकात उत्साह संचारलेला असतो. तथापि यावेळा जर विभागून वेगवेगळ्या घेता आल्या तर त्याची सर्वाअर्थाने जिल्हा प्रशासनाला मदत होईल व प्रत्येकाला आपला आनंद द्विगुणित करता येईल, असे महापौर जयश्रीताई पावडे यांनी सांगितले. गणतीच्या विसर्जनाच्या पावित्र्यासमवेत आपण श्रद्धेने घेतलेल्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळणाऱ्या आहेत का हेही तपासूण घेतले पाहिजे. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींना घेण्याऐवजी शाडू मातीच्या अथवा निसर्गपूरक मूर्ती लोकांनी बसविण्यावर भर दिला पाहिजे. याचबरोबर देवाला अर्पण केलेले निर्माल्य, वस्त्र हे कोणत्याही परिस्थितीत नदीत जाता कामा नयेत, अशा सूचना महापौर जयश्रीताई पावडे यांनी यावेळी केल्या. महानगरपालिकेच्यावतीने पर्यावरण गणेश उत्सवाला चालना देण्यासाठी झोननिहाय पुरस्कार देत असल्याची घोषणा त्यांनी या बैठकीत केली.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी
मनपाकडून स्वतंत्र व्यवस्था
- आयुक्त डॉ. सुनील लहाने
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार
गोदावरी, आसना नदीतील पाण्याचे प्रदुषण होऊ नये म्हणून आपली श्री गणेश मूर्ती
(पीओपी) नदीपात्रात विसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. यासाठी
महानगरपालिकेच्यावतीने सांगवी (आसना नदी) आणि पासदगाव या दोन ठिकाणी तयार करण्यात
आलेल्या कृत्रिम तलावात अशा गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. याचबरोबर नानकसर
गुरुद्वारा साहिब झरी (खदान) या तलावात मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाची
व्यवस्था करण्यात आल्याचे मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी सांगितले.
मनपाच्यावतीने क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रत्येक झोनमध्ये मूर्ती संकलन केंद्र
स्थापन करण्यात येत असून आपण प्रत्येकाने त्या-त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या
मनपाच्या कर्मचाऱ्यांकडे आपली मूर्ती सुपूर्द करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बैठकीस उपस्थित असलेल्या सन्मानिय सदस्यांनी अमूल्य सूचना केल्या.
000000
No comments:
Post a Comment