Wednesday, August 10, 2022

 किनवटचे आदिवासी जेंव्हा फेर धरून अस्मिता दिन साजरा करतात


▪️एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत विविध कार्यक्रम
▪️आमदार भीमराव केराम यांच्याकडून पुजार यांचा गौरव

नांदेड (जिमाका) दि. 10 :- महाराष्ट्राच्या सिमेवर असलेल्या किनवट सारख्या आदिवासी तालुक्यात विकासाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्पाने गौरवास्पद काम केले आहे. किनवट तालुक्याला पेसामध्ये घेण्यासाठी इथल्या आदिवासी बांधवांनी दिलेला लढा हा जागरुकतेच्या दृष्टिने तेवढाच महत्वाचा आहे. शासनातर्फे मिळणाऱ्या योजनांबाबत लाभधारक जर जागरूक असेल तर त्याला मिळालेल्या योजनांचे उद्दीष्ट खऱ्या अर्थाने साध्य होते. किर्तीकिरण एच. पुजार यांनी आपल्या कारकिर्दीत योजनांच्या साक्षरतेवर दिलेला भर हा त्यादृष्टिने अत्यंत लाख मोलाचा आहे. त्यांच्या कार्यदक्षतेमुळेच आदिवासींच्या नावे विकास कामांसाठी आलेला निधी हा त्या-त्या विकास कामांवर प्रभावीपणे वापरला गेला या शब्दात आमदार भीमराव केराम यांनी पुजार यांचा गौरव केला.

जागतिक आदिवासी अस्मिता दिनानिमित्त किनवट येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमास सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, किनवटचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, राजश्रीताई हेमंत पाटील, तहसिलदार मृणाल जाधव, गटविकास अधिकारी धनवे, अनिल तिरमणवार, नारायणराव सिडाम, प्रा. विजय खुपसे, प्रा. किशन मिरासे, प्रकाश गेडाम, संतोष मरसकोल्हे, साजिद खान आदी उपस्थित होते.

आदिवासी विकासाच्या दृष्टीने शासनाने अनेक नाविन्यपूर्ण योजना हाती घेतल्या आहेत. या योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोहचविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. लाभधारकांनीही मिळालेल्या योजनांचा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने उपयोग करून विकासाची कास धरावी, असे आवाहन किर्तीकिरण एच पुजार यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.

जागतिक आदिवासी अस्मिता दिनानिमित्त सप्ताहभर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपारिक नृत्याला जपत बदलत्या संदर्भानुसार आपल्या न्याय हक्का संदर्भात नाटीका सादर केल्या. मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले
0000







No comments:

Post a Comment

 यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात आज माळेगावच्या यात्रेला प्रारंभ   आज देवस्वारी व पालखी पूजन  नांदेड दि. २८ डिसेंबर : उद्या 29 डिसेंबर रोजी...