शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिके कुजण्याची भीती,
साचलेले पाणी वेळीच शेताच्या बाहेर काढा
नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून पावसाचा जोर चालू आहे. त्यामुळे अनेक शेतात पाणी साचले आहे. यात ज्या शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने पेरणी केली आहे. अशा पेरणी केलेल्या ठिकाणी पाणथळ जमिनीत पाणी साचल्याने शेतामधील पिके कुजण्याची भीती आहे. त्यामुळे हे पाणी वेळीच शेताच्या बाहेर काढण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील 93 महसुल मंडळापैकी 80 मंडळात अतिवृष्टी झाली असून अनेक शेतात पाणी साचले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या मार्गदर्शनात घरघुती सोयाबीन बियाणे वापर , बीज प्रक्रिया करून योग्य खोलीवर पेरणी केली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ यंत्र, सरी वरंबा वर टोकन पद्धतीने लागवड तसेच बेडवर टोकन यंत्राद्वारे पेरणी केल्यामुळे पावसाचे पाणी सरीमध्ये जमा होऊन शेताबाहेर काढण्यास मदत झाली, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी पारंपारिक पेरणी यंत्राद्वारे पेरणी केलेल्या ठिकाणी पाणथळ जमिनीत पाणी साचत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. या पाण्यामुळे पिकांची मुळाद्वारे श्वसनक्रिया मंदावते व पिकाला अन्नद्रव्ये घेता येत नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटते. यात सोयाबीन,कापुस व तुर यांसारख्या पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन पीक सुकण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेऊन हा धोका टाळणे आवश्यक आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पारंपारिक पेरणी यंत्राद्वारे पेरणी केली आहे. अशा शेतकऱ्यांनी जमिनीत वापसा झाल्यानंतर दर सहा ओळींनंतर कोळप्याच्या जानोळयाला दोरी गुंडाळून मृतसरी काढून घ्यावी. मृतसरी काढून घेतल्यास पडलेल्या पावसाचे पाणी सरीद्वारे शेताबाहेर निघून जाईल व पिकांचे नुकसान टाळता येईल. तसेच साचलेले पाणी लवकर शेताबाहेर कसे काढता येईल, याबाबत उपाययोजना करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
0000
No comments:
Post a Comment